जून २२ - परमार्थ
अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही , म्हणजे दु : ख होते . अमुक हवे असे वाटूच देऊ नये . परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे . याचेच नाव वैराग्य . आपण विषयांत बुडतो आहोत , आणि पुन : विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे . मनुष्य सुखाकरिता धडपड करतो , आणि अंती दु : खमय अशा विषयाची आशा करतो . सुख त्यागात आहे , भोगात नाही , हे पुष्कळांना पटत नाही .
परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते , पण रुप्याचे काही सोने होत नाही ; तसे आपण दीनाहून दीन , म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे , आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल . हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे , आणि ती नित्य भाकावी . एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे ? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून . हा सर्व खेळ आहे , हे मिथ्या आहे , असे जाणून , ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्यासारखी करतो , त्याप्रमाणे व्यवहार करावा . सुख , समाधान , सत्यात असते , मिथ्यात नसते . आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही ; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हांला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता , याला काय म्हणावे ? जे दु : खमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ? दोन लहान मुली भातुकली खेळल्या ; जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला , पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली . पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही , तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही . तसे प्रपंचाचे खरेपण आहे . प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही ; जो दुसर्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो . म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो . दुसर्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय . पाचजण मिळून प्रपंच बनतो . त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो . मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ?
प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत , पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे . प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुर्या पडत नाहीत , कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे . पण भगवंताचे तसे नाही . भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन : ती आणायला नको .