जून ५ - परमार्थ
पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात , त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे . आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल , त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत . आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही . रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते ; कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे . त्याचप्रमाणे , अंत : करण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो . परमार्थात मनाचे कष्ट आहेत . कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे ; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वत : पासून सुरुवात करायची असते . आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरुन वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील , त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल . आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो . मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे , विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे . साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे . म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय .
प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही . प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ . परमार्थाच्या आड काय येते ? धन , सुत , दारा , वगैरे आड येत नाहीत , तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते . वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ; ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे . एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त , असे म्हणता येणार नाही . बायको असून लंपट नसेल तो विरक्त . आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे , असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय . या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही , तो वैरागी . वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे . कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते . आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही , आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही . शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता , भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा . ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही , आपले आप्त कुणी नाहीत , जिथे आपल्याला कुणी मान देत नाही , अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा . जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते .