जून २३ - परमार्थ
मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा . हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते . हेतू हा विहिरीत असणार्या झर्याप्रमाणे आहे . झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते . म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी , आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी . माणसाला देहरक्षणापुरते अन्न , वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही . ‘ नको दैन्यवाणे जिणे भक्तिउणे ’ हेच रामरायाजवळ मागावे . पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो ; जे ज्याला पाहिजे ते तो देतो . पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करुन घेतात . जारण - मारण ही देखील पर्वकाळांत शीघ्र साध्य होतात . आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पाहावे . शुभेच्छा धरावी , भावना जागृत करावी . ‘ काहीही कर , पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस , ’ असे भगवंताजवळ मागावे . ‘ आजवर कळत न कळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर . पुढे पुन : नाही करणार , ’ असे म्हणावे , म्हणजे मागली पापे नष्ट होतात . ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत . नरकातल्या किड्यांना नाही किळस येत . विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधुसंतांची निंदा करतात . त्यांना ‘ मीच काय तो एक शहाणा , मोठा , ’ असा अभिमान असतो . पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत . ते खालच्या लोकांकडे पाहातात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात . माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल . विषयी लोकांना ‘ मला कुठे दु : ख आहे ? ’ असे वाटते . पण दारुप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो .
‘ देव आहे ’ असे खर्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात . सद्विचार , सच्छास्त्र आणि सदबुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत . प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे , पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे . तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते . पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही , त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते . तसे , ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते , त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे . भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही .
खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते , तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे . दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते , त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो . आपण ‘ मी ’ पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो .