Get it on Google Play
Download on the App Store

कृतज्ञ.

जे. डी . पराडकर

आयुष्यात ज्याला कृतज्ञ या शब्दाचा अर्थ कळतो , त्याचा जीवनप्रवास नक्कीच सुखकर आणि आनंदी होतो . कृतज्ञ असण्यासाठी आपले विचार आणि संस्कार योग्य असायला हवेत . माणूस संस्कारातून अनेक गोष्टी शिकत जातो . हे संस्कार एखाद्या फळाप्रमाणे जेंव्हा परिपक्व होतात त्यावेळी त्यातून कृतज्ञचे दर्शन होवू लागते . जीवनात कृतज्ञ होणे कधीही अभिमानास्पद , मात्र कृतघ्न होणे अत्यंत वेदनादायी आहे . सध्याच्या काळात मात्र कृतज्ञतेचे कमी आणि कृतघ्नपणाचे अनुभव अधिक येवू लागले आहेत . कृतज्ञ आणि कृतघ्न या दोन शब्दांमध्ये पहिली दोन अक्षरे सारखीच आहेत त्यामुळे शब्दात काहीसे साम्य वाटत असले तरी , तिसरे अक्षर पुढे आल्यानंतर दोन्ही शब्दातील अर्थाची खरी उकल होते. कृतज्ञता कळायला खूप वेळ लागतो तद्वत कृतघ्नपणा मात्र चटकन कळून येतो . प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या कडून कृतज्ञतेची अपेक्षा करत असते , मात्र ती आपल्यात असेल तरच आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करु शकतो .*                      कोणतीही व्यक्ती जन्मतः कृतघ्न नसते . परिस्थिती त्या व्यक्तीला कृतघ्न बनवते असे चित्र बऱ्याचदा दिसून येते . माणूस स्वतःला बंधनात ठेवत नाही , मात्र तो आपल्या जवळच्या माणसांना बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो . स्वतःवर बंधन घालून घेणे ज्यांना जमले त्यांच्यावर कृतघ्न होण्याची वेळ चुकूनही येत नाही . बंधन घालण्याचे काम संस्कार करत असतात . बालपणापासून प्रत्येकावर योग्य संस्कार करण्याचे काम प्रथम आई आणि नंतर अन्य मंडळी करतात . वय वाढत जावून मनावरचा ताबा उडाला तर , संस्कार आणि बंधनांचा टीकाव लागत नाही आणि तेथेच कृतघ्नपणाचा शिरकाव होवू लागतो . कृतघ्न होणे हे त्या व्यक्तीसाठी अथवा त्याच्या घराण्यासाठी नक्कीच शोभादायक नाही . या उलट कृतज्ञ होणे आनंदाची अनुभूती देणारे आहे . विचार आणि हेतू शुध्द असेल तर , कृतघ्न होण्यापासून स्वतःला दूर ठेवता येते . सध्याच्या काळात वाढत्या गरजा आणि कमी मिळकत या विषमतेमुळे अपेक्षित नसलेल्या विश्वासू माणसांकडूनही कृतघ्नपणाचे अनुभव येतात . अत्यंत विश्वासातील आणि जवळची माणसं ज्यावेळी स्वतःच्या स्वार्थापोटी कृतघ्न बनतात त्यावेळी विश्वास या शब्दाचीच होळी होवून जाते .                        जोडले जाणारे संबंध हे स्वार्थासाठी असू नयेत . स्वार्थच माणसाला कृतघ्न बनवतो . मन समाधानी असेल तर , स्वार्थापासून दूर राहणे सहज शक्य होते . मैत्री , विश्वास या तशा टीकणाऱ्या गोष्टी नाहीत . पवित्र आणि शुद्ध स्वरुपाची मैत्री ही अपवादानेच पाहायला मिळते . मैत्री स्वार्थावर आधारीत असेल तर , कालांतराने कृतघ्नपणाची अनुभूती आपोआप येते . सध्याच्या काळात परस्परातील नाती दुरावू लागली असतांना मैत्रीतील शुध्दता कोणत्या मापाने मोजायची ? हा खरा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे . मैत्री मैत्री असे म्हणून साहानुभूती मिळवायची आणि परिस्थिती पालटल्यावर स्नेह विसरुन जायचं अशा स्वरुपाची मैत्री अधिक क्लेशकारक असते . यातूनच कृतज्ञते ऐवजी कृतघ्नपणाचा अनुभव येतो . कृतज्ञता हा स्वभावातील नम्रपणाचा भाग आहे . सध्या सय्यमा अभावी क्रोधातीत स्वभाव मोठे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत आहे . मतभेद मनभेदापर्यंत पोहचले की , नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि अनेक वर्षे जपलेली कृतज्ञता अल्पावधीतच कृतघ्नपणात बदलते . असे कटू अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनप्रवासात येत असतात . ज्याला व्यवहार पारदर्शक , अचूक आणि विश्वासार्ह पध्दतीने ठेवता येतो त्याचे गणित कधीही चुकत नाही . या ऊलट ज्याला व्यवहाराचे गणित केवळ स्वतःच्या लाभाएवढेच सोडवता येते त्याला व्यवहाराची दुसरी बाजू कळत नाही , अथवा कळत असूनही तो ती न कळल्यासारखी दाखवतो . कृतघ्नपणाचे अनुभव येवू नयेत म्हणून अधिकाधिक व्यवहार्य वागणे उचित ठरते . आपले व्यवहार्य वागणे कदाचित समोरच्या व्यक्तीला मान्य होइलच असे नाही . मात्र भविष्यात येणारे कटू अनुभव टाळण्यासाठी व्यवहारी असणे योग्य ठरते . अनेकदा माणसाच्या स्वभावाचा देखील लाभ उठवला जातो . साधा सरळ स्वभाव योग्य खरा मात्र याला व्यवहार्यतेची जोड नसेल तर , फसगत होण्याची शक्यता अधिक असते . कृतघ्नपणाचे दुख: होते आणि कृतज्ञतेमुळे मानसिक समाधान लाभते . जीवनात काय मिळवायचे , हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते . आपली वैचारीक बैठक ठाम असेल तर , दुख: करण्याचे प्रसंग येत नाहीत . कृतज्ञतेने व्यक्तीमत्वच नव्हे तर , जग जिंकता येते . कृतज्ञतेची अपेक्षा दुसऱ्याकडून करण्याआधी तो आपल्यात किती आहे ? याचे आत्मपरीक्षण केले तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील . 

दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय दृष्टीने विचार केला की , अनेक प्रश्न सहज सुटतात . प्रश्न निर्माण करण्याऐवजी ते सोडविण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा . यासाठी नकारात्मकता संपवून टाकणे आवश्यक असते . नकारात्मक विचारांनी प्रगती ऐवजी अधोगतीच होते . सकारात्मक वृत्ती स्थैर्य , शांतता आणि समृध्दी देते . अखेरीस कोणते विचार अंगीकारायचे ? यावरच आपली पुढील वाटचाल ठरत असते . कृतज्ञ हा शब्द पत्राच्या अखेरीस अभिमानाने वापरला जातो . याऊलट कृतघ्न हा शब्द लेखनात दुसऱ्यासाठी  वापरून स्वतः मात्र कृतज्ञ असल्याचे भाव मनात ठेवले जातात . आपल्यातील कृतज्ञता आपणच सांगायची नाही तर , ती समोरच्याकडून कौतूकास पात्र व्हायला हवी .