Get it on Google Play
Download on the App Store

अर्धा संसार...

फोटोसमोरचा दिवा मिणमिण करत होता. अगदी मंद...आणी फोटोतल्या मिहीरच्या चेहर्यावर पण तसेच स्मित होते. रजनीला आठवले की हे स्मित मिहीरच्या ओठी कायम असायचे. तिला ते कधी आवडायला लागले हे तिलाही कळले नव्हते. आज पंधरा दिवस झाले मिहीरला जाऊन. अजूनही विश्वास ठेवणे कठीण जात होते. या सगळ्या विचारात असतानाच शेजारी चुळबूळ जाणवली. तीन वर्षांचा ईशान झोपेत हालचाल करत होता. तिने थोडे थोपटल्यासारखे केले आणी तो पुन्हा गाढ झोपी गेला. त्याला पाहता पाहता रजनी पुन्हा आठवणींच्या जगात हरवली...


घरी पाच भावंडे, बेताची परिस्थिती आणी मिलमधून रिटायर झालेले वडील. कशीबशी मोठ्या दोन बहिणींची लग्न लावून दिलेली. रजनी एका खाजगी शाळेत नोकरी करत होती आणी कुटूंबाला हातभार लावत होती. दोन भावंडांची शिक्षणे त्यात पार पडत होती. या सगळ्यात रजनीचे लग्नाचे वय मात्र पुढे सरकत होते. तेवढ्यात एका ओळखीतून एक स्थळ आले. सुखवस्तू कुटूंब होते. पण मुलाचे दुसरे लग्न होते. पहिली बायकोसहा महिन्यांपुर्वीच बाळंतपणात गेली होती. बाळ लहान होते. ही एक बाब सोडली तर नाही म्हणण्यासारखे काही नव्हते. रजनीच्या वडीलांची द्विधा मनस्थिती झाली. रजनीला ती कळली आणी तिने लग्नाला होकार दिला. अगदी साधेपणाने विवाह आटोपला आणी रजनी मिहीरची पत्नी म्हणून या घरी आली. घरी फक्त तीनच माणसे होती. सासुबाई, मिहीर आणी त्याचे बाळ- ईशान.


पहिल्या रात्रीच मिहीरने तिच्याजवळ मन मोकळे केले होते.

"तुझे खरंतर आभारच मानायचे होते. लग्नाआधी वेळ मिळाला नाही. एका विधुराशी लग्न हा खुप मोठा निर्णय आहे. ते सुद्धा एक मुल असताना. पण तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही असे वचन देतो मी तुला. तुझ्या दोन भावंडांच्या शिक्षणाचीही काळजी घेईन मी. तू माझी पत्नी व्हावंस यासाठी कोणतीच सक्ती नाही तुझ्यावर. पण माझ्या बाळाची आई हो. खुप स्वप्न होती माझी आणी 'तिची' या बाळासाठी. पण देवाने तिला दूर केलं बाळापासून. फक्त माझ्या बाळाचा नीट सांभाळ कर. बाकी काहीच नको आहे मला तुझ्याकडून."


रजनी काही बोलुच शकली नव्हती. तिच्यासाठी तर हा एक सौदाच होता. फक्त यात तिचे काही नुकसान नव्हते.


नवीन संसार सुरु झाला. सासु प्रेमळ होती. मिहीरसुद्धा शांत होता. खरी कसोटी होती ती ईशानसोबत नाते जोडायची. तिथे ना सौदा चालणार होता ना बळजबरी. ते नाते प्रेमाने आणी मायेनेच जोडायचे होते. त्याला आई माहितीच नव्हती. आतापर्यंत आजीच त्याला सांभाळत होती. रजनीने पहिल्यांदा ईशानला जवळ घेतले तेव्हा अगदी भरुनच आले तिला. 'आईवेगळे बाळ हे, मला खरंच आई म्हणेल का? मला खरंच जमेल का त्याची आई व्हायला?' असे अनेक प्रश्न तिला पडले होते.


दिवसामागून दिवस जात होते आणी रजनीचे प्रश्नही कमी होत होते. ईशानने तिला स्वीकारले होते आणी या घरानेही. प्रश्न होता मिहीर आणी तिच्या नात्याचा.


मिहीरने स्वतःचा शब्द पाळला होता. त्याने रजनीला आणी तिच्या घरच्यांना काही कमी पडू दिले नव्हते. पण ज्या नात्याच्या नावामधे ती दोघे बांधले गेले होते ते नातेच कुठेतरी त्यांना ऊलगडले नव्हते.


तीन वर्षे पूर्ण होत आली होती. आता कुठे ईशानचे आई-बाबा होता होता हळूहळू ती दोघे एकमेकांसोबत 'कम्फर्टेबल' होऊ लागले होते. मिहीरच्या चेहर्यावरचे स्मित रजनीला सुखावून जात होते. तिच्या प्रेमळ आणी प्रामाणिक स्वभावाने मिहीरही प्रभावित होता. लग्नाचा तिसरा वाढदिवस...तसा पहिलाच...कारण याआधी हे लग्न फक्त एक उपचार होता...त्यामुळे त्याचा वाढदिवस कुठे असणार...पण आता मिहीरने स्वतःहून विचारले होते तिला बाहेर जाण्यासाठी..तो ऑफिसमधून सुट्टी घेणार होता. ईशानला घेऊन मस्त केरळला फिरायला जायचा प्लान केला होता त्यांनी. रजनी तर त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती. निघायच्या आदल्या दिवशी मिहीर ऑफिसमधून लवकर निघाला. पण घरी पोहोचली ती त्याच्या अपघाताची बातमी.


रजनीच्या पायाखालची जमीनच सरकली. मिहीरची आई तर बेशुद्धच झाली. मिहीर या जगातून गेला होता...कायमचा...गेले पंधरा दिवस या गोष्टीवर विश्वास ठेवायला कमीच पडले होते. त्याच्या असण्याची सवय होत असतानाच त्याच्या नसण्याची बोच आता आयुष्यभर राहणार होती.


ईशानच्या चळवळण्याने ती पुन्हा भानावर आली. तो जागा झाला होता. डोळे चोळत ऊठून तिच्या कुशीत येऊन बसला. तिने त्याच्या चेहर्यावरुन हात फिरवला.

" ममा, बाबा कुठे आहेत? " त्याचा नेहमीचा प्रश्न.

पण आज तिच्याकडे उत्तर नव्हते.ती गप्प राहिली.

ईशानने तिच्याकडे बघत पुन्हा विचारले..

" ममा,आजी बोलली बाबा खुप लांब गेले...परत नाही येणार..नाही येणार?"

तिने नकारार्थी मान हलवली.

" तू पण लांब जाणार? तू नको जाऊ ममा. कधीच नको जाऊ. "

एवढे बोलून त्याच्या चिमुकल्या हातांचा वेढा तिच्या गळ्याभोवती पडला. तिचे डोळे पाण्याने भरले.

" नाही जाणार पिल्लु, ममा कुठेच नाही जाणार.."

हे ऐकून ईशानच्या चेहर्यावर एक गोड स्मित उमटले. तेच जे मिहीरच्या चेहर्यावर असायचे. रजनी अगदी तृप्त झाली. तिचा संसार अर्धा राहिले होता...पण आई म्हणून ती पूर्ण झाली होती....


...हर्षा (मी चिन्मयी)