संत तुकाराम - हाजर हुजूर पायांप सादर । ...
हाजर हुजूर पायांप सादर । नाहीं हरामखोर चाकर आम्ही ॥१॥
हरामकी केली सद्या दाखविलें । मागें भोगविले बंदिखाने ॥२॥
तुझें नाम मुखीं तेणें आम्ही सुखी । गुदस्ताची बाकी हाली साला ॥३॥
करुं नामघोष कीर्तनाच्या राशी । बाकी बकाविशीं झाडाझुडा ॥४॥
खर्चासुद्धां झाडा अदृष्टानें केला । खंडणि कसबा जाला मागिल पुढें ॥५॥
लांच लुचपती हवाली ठेवाल । त्यावरी फिरेल आमचें कांहीं ॥६॥
रसद पोंचली जामिनकी उगवली । परवानगी जाली हुजुरातीची ॥७॥
प्रारब्धाप्रमाणें जमाबंदी जाली । बेरीज पाहिली चौर्यांशींची ॥८॥
चौर्यांशींचा फर्द आणूनियां द्वारा । वरी फांटा मारा युगायुगीं ॥९॥
झाडुनियां बाकी तुका जाला सुखी । गर्जे तिहीं लोकीं कौल जाला ॥१०॥