जन्म
लुंबिनी, नेपाळ येथील महामाया विहार
सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. लोक कथेनुसार शुद्धोदन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. राजा शुद्धोदनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव 'सिद्धार्थ' असे ठेवण्यात आले.