बौद्ध धर्म
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषत: धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.