Get it on Google Play
Download on the App Store

सकारात्मक विचार - सविता कारंजकर

ईश्वराने मोराला रंगीबेरंगी पिसारा दिला..कोकिळेला कंठ दिला..मात्र बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती फक्त माणसाला दिली.विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात.विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात.तुम्ही कामात गुंतलेले असा अथवा रिकामे असा..मन सतत विचार करत असते.मानसशास्त्र असे सांगते, दिवसभरात मानवी मनात साधारण साठ हजार विचार येतात.त्यातील काही विचार आपण जाणीवपूर्वक करतो..काही विचार संगतीनुसार तर काही संस्कारांमुळे येत असतात.

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येती पिकावर...

बहिणाबाईनी केलेले हे मनाचे अत्यंत चपखल वर्णन.

या विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.आपण चांगला विचार केला तर जीवन चांगल्या गोष्टींनी बहरून येते.वाईट विचार केला तर अर्थातच त्याचप्रमाणे जीवन घडत जाते.विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते. मन आणि विचारांचे सामर्थ्य माहिती नसल्यामुळे कदाचित अनेक माणसे कळत-नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात.

तुमचे मन प्रसन्न असते तेव्हा त्याचे सुपरिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतात  अगदी त्याचप्रमाणे मनातील दुःखद भावनांचे दुष्परिणामदेखील तुमच्या शरीरावर दिसून येतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी सतत सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे.

प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहिती असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी  सकारात्मक विचार कसे करायचे  हे तुम्हाला माहिती असायला हवे.

जी माणसे सकारात्मक विचार करतात ती माणसे सभोवताली आनंद पसरविण्याचे काम करतात म्हणून अशी माणसे सर्वांना हवीहवीशी असतात..इतरांना प्रभावित करतात.सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला हवं तसं पोषक वातावरण ते निर्माण करू शकतात त्यामुळे त्यांचे जीवन नंदनवन बनते.
तुम्हाला जर सकारात्मक विचारसरणी अंगिकारायची असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल करावे लागतील.

१. *संगत बदलणे* - तुम्ही ज्या संगतीत राहता त्याचा जीवनावर मोठा परिणाम होत असतो.म्हणून जाणीवपूर्वक आनंदी लोकांच्या संगतीत रहावे.

२. *व्यायाम* -
सुदृढ शरीरात चांगले मन निवास करते.म्हणून आपल्या दिनचर्येमधील काही वेळ खास व्यायामासाठी राखीव ठेवा.दररोज किमान बारा सूर्यनमस्कार घालणे फायदेशीर.व्यायामाने शरीर सुदृढ बनते.हलकेपणा येतो.उत्साह वाढतो पर्यायाने आपली कार्यक्षमता वाढते.त्याचबरोबर नियमित प्राणायामाचा अभ्यास केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.आयुर्मान वाढते.
मन प्रसन्न होते.दिवसाची सुरुवात प्रसन्न झाल्याने अर्थातच दिवस चांगला जातो.अर्थात व्यायाम प्राणायाम हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

३. *वाचन*   
उत्तमोत्तम पुस्तके चांगल्या विचारांचे वाचन केल्याखेरीज दिवस संपवू नये.पुस्तके आपले जीवन घडविता. माणसाला अंतर्बाह्य बदलवून टाकण्याची क्षमता ग्रंथांमध्ये  असते.जगातील अनेक महान व्यक्तिमत्व ही त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे जीवनात यशस्वी झालेली असतात. अशा लोकांनी त्यांच्या अनुभवातून लिहीलेल्या पुस्तकांच्या वाचनाने तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळू शकते. शिवाय तुमच्या विचारांना त्यामुळे योग्य दिशा मिळू शकते. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकल्याचा माणसाला नेहमीच चांगला फायदा होतो.

४. *ताणतणाव विसरून जा*
ऑफिसमधला अथवा कामाचा ताण सतत असतोच. अशावेळी मन खंबीर असेल तर कोणत्याही परिस्थितीत न डगमगता समस्येला सामोरे जाण्याचे धैर्य मिळते.

५. *संगीत ऐका*
संगीताचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप चांगला परिणाम होत असतो.तेव्हा दिवसातील खास वेळ संगीत ऐकण्यासाठी राखीव ठेवा.

६. *निसर्गाच्या सान्निध्यात रहा*
रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निखळ आनंद मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे म्हणजे एक प्रकारे शरीर आणि मन यांचे चार्जिंग होय.यासाठी खूप खर्च करून दूरवर सहलीलाच गेले पाहिजे असे काही नाही.आपल्या अवतीभवती निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे त्यासाठी कलासक्त नजर हवी मात्र.निसर्गात संगीत भरलेले आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा.

७. *स्वसंवाद*
स्वतःशी संवाद साधणे यासारखा आत्मपरीक्षणाचा चांगला मार्ग नाही.

दिवसाच्या शेवटी आज दिवसभर आपण काय काय केले यावर एक नजर टाका.आजच्या चुका उद्या पुन्हा होणार नाहीत याची खूणगाठ बांधा स्वतःशीच.

दिवसभरात कोणालाही दुखावले असेल तर आवर्जून माफी मागा.मग बघा..किती हलके वाटते ते!

मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भरला आहे.तो ओळखता आला पाहिजे.आनंदाचे क्षण चुटकीसरशी सरून जातात..योग्यवेळी त्यांचा उपभोग घेतला पाहिजे. घरचे काम, ऑफिसचे काम, झोप, जेवण, व्यायाम, वाचन, चिंतन, आरोग्य, कुटुंबाला पुरेसा वेळ देणं या सर्वच गोष्टी  माणसाच्या जीवनात फार महत्वाच्या आहेत. यासाठी या सर्व कामांचे योग्य नियोजन करा. नियोजन केल्यामुळे तुम्ही प्रत्येक कामाला योग्य न्याय देऊ शकाल. सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करा जीवन हे अनेक चांगल्या- चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे. जगात अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. मात्र माणसे स्वभावानुसार नकारात्मक गोष्टी, गॉसिप यामध्ये जीवनातील बराचसा वेळ वाया घालवतात. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचे ज्ञान मिळवा. या  ज्ञानामुळे तुमचे जीवन आनंदी आणि प्रफुल्लित होईल.

आरंभ : मार्च २०२०

संपादक
Chapters
आरंभ अंक संपादकीय (निमिष सोनार) संपादकीय (मैत्रेयी पंडित) बातम्यांच्या जगात – वैष्णवी कारंजकर अमेरिकेतील मराठी माणूस – नीला पाटणकर मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हे! – आशिष कर्ले शॉर्ट फिल्म: अँरेंज्ड मॅरेज: लग्नाकडे नेणारा एक सुंदर प्रवास - मिलिंद कोलटकर रात्रींबद्दलची गोष्ट! – अमृता देसर्डा अंतरद्वंद्व नाटक परीक्षण - अमृता देसर्डा २०२०: नवीन सिनेमे,नवीन शक्यता,नवीन आशा - निखील शेलार नागराज मंजुळे: माणूसपण बहाल करणारी दृष्टी - निखील शेलार द विचर: पोलंडचा महानायक ! – अक्षर प्रभु देसाई टोलकेन आणि मिडल अर्थ, लॉर्ड ऑफ द रिंग्स , हॉबिट इत्यादी – अक्षर प्रभु देसाई || प्रवासवर्णन || हम्पी: एका साम्राज्याची अखेर – अजित मुठे गाथा गुलशनाबादची - मैत्रेयी पंडित मिस बुम्बुम: ब्राझीलमधील अनोखी सौंदर्य स्पर्धा - सुलक्षणा वऱ्हाडकर || लेख विभाग || माई: एक सिंन्धुदुर्ग – किरण दहिवदकर स्वा. वि.दा. सावरकर: एक धगधगते यज्ञकुंड – वंदना मत्रे सकारात्मक विचार - सविता कारंजकर मायमाखली नजर – प्रसाद वाखारे आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार आम्ही मैत्रिणी - अनुष्का मेहेर एक स्त्री – प्रिया भांबुरे वृध्दाश्रम: गरज की अपरिहार्यता – नीला पाटणकर || कथा || आगंतुक – सविता कारंजकर || कविता विभाग || तरीही माझं जीवन सुखाचं होतं – अविनाश हळबे भाव अंतरीचा – छाया पवार स्वप्नीच्या फुला – योगेश खालकर आई कुठे काय करते ? – विलास गायकवाड सून माझी लाडाची – नीला पाटणकर शोध – मंगल बिरारी लिखाणाचे सूत्र – दिपाली साळेकर / खामकर सुख – भरत उपासनी चार शब्द स्नेहाचे: प्रसाद वाखारे || आरंभचे लेखक आणि आरंभच्या टीमचा परिचय ||