किनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा
शिमगा उत्सव हर्णै बंदर
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.