Get it on Google Play
Download on the App Store

केला पालखी व मुख्य विधी

छोट्या गावचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.

गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला 'सान' असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला 'भंग' असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची 'ओटी भरणे' हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.

नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.