ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड भाग १९
पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी दोघेही बोट क्लब वर चित्रांगद च्या केबिन मधे आले.
“ आपण आधी मस्त कडक कॉफी घेऊ आणि निघू.” चित्रांगद म्हणाला. “ मी तुम्हाला मोटार बोट ने सोडून परत यायचं आणि पुन्हा दोन वाजता आणायला यायचं .बरोबर ना?”
“ बरोबर.”पाणिनी म्हणाला
“ माझी साक्ष चांगली झाली का तुमच्या दृष्टीनं? ” चित्रांगद ने विचारले.
“ चांगली झाली.”पाणिनी म्हणाला
“ रेयांश माझा चांगला मित्र आहे.त्याची ती मुलगी म्हणजे, जळती तार आहे ! ” चित्रांगद म्हणाला. “ चला निघूया.”
तिघे जण त्याच्या मोटार बोटीत बसले.
“ किती वेळ लागेल? ”सौम्या ने विचारलं
“ दहा मिनिटापेक्षा जास्त नाही.” चित्रांगद म्हणाला. बोट जवळ आल्यावर त्याने त्या दोघांना वर चढायला मदत केली.
“मी दोन वाजता येतो परत. बोट हलायला लागेल तेव्हा सावध पणे उभे रहा. ”असे सांगून तो गेला.
पाणिनी ने आपली बॅटरी लावली. थंडी पडली होती आणि प्रचंड धुकं.अंधारात खालचं पाणी ही दिसत नव्हतं.पाणिनी ने केबिन मधला स्टोव्ह चालू केला.त्याच्या आवाजा मुळे कोणाची तरी सोबत आहे असे वाटायला लागलं.आणि उष्णता ही निर्माण झाली.बोट हलायला सुरुवात झाली नव्हती अजून पण पाण्याचा सप्-सप् आवाज येत होता.
“ मी आता प्रेत जिथे पडलं त्याच जागेवर झोपणार आहे.” असं म्हणून पाणिनी त्या उंबऱ्या जवळ डोकं टेकवून आडवा झाला.
“ मला या सगळ्या प्रकारची भीती वाटते आहे.” शहारत सौम्या म्हणाली.आणि पाणिनी ला बिलगली. “ मी प्रेत असणें अपेक्षित आहे. प्रेत रोमान्स नाही करत !”पाणिनी म्हणाला
एवढ्यात बोटीला एक हिसडा बसला. “ अजून मोठा हिसडा हवा , माझ्या शरीराला दुसऱ्या स्थितीत आणून टाकण्यासाठी.ते ज्यावेळी होईल त्या वेळेची नोंद आपण आपल्या कडे करून घेऊ. आपली बॅटरी कुठे आहे सौम्या? ”पाणिनी म्हणाला.
“ टेबलावर आहे.”
“ किती वाजलेत ?”पाणिनी म्हणाला.
“ १.३० वाजायला आलेत.” सौम्या म्हणाली
“पुढच्या काही मिनिटातच सर्व चित्र स्पष्ट होईल.”पाणिनी म्हणाला
दोघेही न बोलता बसून राहिले .सौम्या पाणिनीच्या कपाळावरून हळूवार हात फिरवत होती.पाणिनी ला केव्हातरी झोप लागली.
अचानक केबिन ला मोठा हिसडा बसला, झोकांडी जाऊन सौम्या पडायच्या बेतात होती आणि पाणिनी पटवर्धन ला झोपेतून जाग आली तेव्हा तो जोरात घरंगळत जाऊन केबिन च्या उजव्या बाजूच्या भीतीवर आदळला होता
थोड्या वेळाने पाणिनी च्या हसण्याचा आवाज आला. “ बरोब्बर १.४३ झालेत.भरती नंतर चार तास नऊ मिनिटे.”
“ हे काय ऐकू येतंय? ” सौम्या ने अचानक सावध होत विचारलं
पाणिनी एकदम बोलायचं थांबला.
“ चित्रांगद येत नसेल ना , आपल्याला घ्यायला?” सौम्या ने विचारलं
“ तो दोन वाजता येणार होता.अजून पंधरा मिनिटांनी.”पाणिनी म्हणाला “ सौम्या, तू कुठे आहेस? आणि बॅटरी कुठे गेली?”
“ टेबलावर ठेवली होती मी. बोटीला हिसका बसला तेव्हा ती पडली कुठे तरी.”
बोटीला पुन्हा एक हिसका बसला आणि त्याच वेळी रोइंग बोट , बोटीवर आपटल्याचा आवाज आला.
“ सर, हातात ही सळई घेऊन ठेवा.कोणीतरी येतंय.”
“ सौम्या, केबिन मधे चल पटकन ”, पाणिनी दबक्या आवाजात म्हणाला.
दोघे आत गेले. प्रकाशाचा एक झोत त्या केबिन वरून पुढे सरकला आणि परत अंधार झाला. एका व्यक्तीचा पाय जिन्यात पायरीचढण्यासाठी उचलला गेला पण पुन्हा थांबला.जाळीचा दरवाजा पुन्हा लावल्याचा आवाज आला.डेक च्या उतारावर पावलांचे आवाज आले आणि पटकन कोणीतरी रोइंग बोट वर उतरून वल्हे मारल्याचा आवाज करत निघून गेल्याचे जाणवले.
“ पटकन बॅटरी शोध सौम्या, उताराच्या बाजूलाच ती सापडेल. ”पाणिनी म्हणाला
सौम्या ने बॅटरी शोधून पाणिनी कडे दिली त्याने त्याचा झोत वल्हे मारल्याचे आवाज येत होते त्या दिशेने टाकला. “ कोण आहे तिकडे? ” त्याने जोरात आवाज दिला.पण दाट धुक्यात त्याला कोणी दिसले नाही.
“ सर, त्याला आपण दिसलो नाही, आणि आपला आवाजही ऐकू नाही आला त्याला .तर तो कशाला घाबरून पळाला ?”
“ स्टोव्ह.” पाणिनी म्हणाला “ त्याने जिन्यात जाण्यासाठी जाळीचा दरवाजा उघडला तेव्हा स्टोव्ह ची धग त्याच्या अंगावर आली आणि त्याला समजलं की कोणीतरी आहे बोटीवर आणि मग तो पळाला.”
त्यांना पुन्हा आवाज ऐकू यायला लागला. “ हा चित्रांगद च्या मोटार बोटीचा आहे आवाज ”पाणिनी म्हणाला “ ज्या ठिकाणाहून आपला अनाहूत पाहुणा गायब झालाय त्याच बाजूने तो येतोय.”
पाणिनी ने प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद ला आपण कुठे आहोत याचा इशारा केला.