ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड भाग २०
प्रकरण २०
पाणिनी ने प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद पागनीस ला आपण कुठे आहोत याचा इशारा केला.
त्या नंतर मिनिटा भरातच चित्रांगद पागनीस त्याची बोट घेऊन आला.पाणिनी आणि सौम्या मोठ्या बोटीतून त्याच्या मोटार बोटीत बसले.
“ पटकन चालव.आपल्याला एका रोइंग बोटीचा पाठलाग करायचाय.तू आलास त्याचं दिशेनी ती गेली.”पाणिनी म्हणाला.
“ रोइंग बोट? मी तर कुणालाच भाड्याने दिली नाहीये.”
“ ते काहीही असो.अत्ता फक्त आपल्याला त्याला गाठायचं आहे.”पाणिनी म्हणाला.
“ हे काम सोप नाहीये. पाण्यावर धुकं पसरलय, टॉर्च लावला तरी तो आपल्याला दिसणार नाही.कारण ठराविक अंतराच्या पुढे झोत जाणारच नाही.”
बराच वेळ त्यांनी शोधाशोध केली.आता त्याच्या वल्हवण्याचा आवाज पण येत नव्हता.
“ आपल्या बोटीचे इंजिन बंद कर.म्हणजे त्याला वाटेल की आपण गेलो.मग तो पुन्हा वल्हवायला लागेल.आणि आपल्याला माग काढता येईल आवाज वरून.”पाणिनी म्हणाला.
पुन्हा त्यांनी तसे प्रयत्न केले पण व्यर्थ.
“ तो हुशार दिसतोय, आपण मोटार चालू करतोय तेव्हा च तो वल्हवतोय आणि आपण मोटार बंद केली की तो पण थांबतोय”.चित्रांगद पागनीस म्हणाला.”
पुढे आणखी बराच वेळ त्यांनी शोध घेतला. “ मला आता पोचावच लागेल खूप वेळ झालाय.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ पटवर्धन, मला आश्चर्य वाटतंय त्या बोटीवर कोण कशाला येईल? काय हवं असेल त्याला? ”
“ त्याला तिथून काही घेऊन जायचं असेल असं वाटत नाही.आम्ही तिथे होतो हे त्याला बहुदा कळलं असावं.........”
त्याचं वेळी साधारण अर्धा पुन किमी अंतरावर आकाशातून एकदम स्फोट झाल्या सारख्या ज्वाळा निघाल्या.थोड्या वेळाने पुन्हा मोठा आवाज होऊन जळक्या वस्तू वरून खाली पडत राहिल्या.त्या उजेडात चित्रांगद पागनीस ने बोट क्लब चा अंदाज घेऊन आपली मोटार बोट त्या दिशेने पिटाळली. तिघेही नि:शब्द पणे बसून होते.बोट क्लब येतंच तिघेही उतरले.
एक गाडी येताना दिसू लागली.
“ किती वाजलेत?”पाणिनी म्हणाला..
“ सव्वा दोन ” चित्रांगद पागनीस म्हणाला.
गाडीतून दोन पोलीस उतरले.दार न वाजवताच केबिन मधे घुसले. सौम्या आणि पटवर्धन कडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांनी चित्रांगद पागनीस ला विचारले, “ हे ! कसला स्फोट झाला हा? ”
“ रेयांश प्रजापति ची बोट पेटली.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ तू त्या बोटीत कुणाला घेऊन गेला होतास? ”
चित्रांगद पागनीस ने फक्त पाणिनी कडे बघितले.
“तू शपथेवर सांगतोस ना की ते बोटीवर होते? ” पोलिसाने विचारले.
“ हो”
“ बोटीवरून परत यायला निघाल्यावर किती वेळाने स्फोट झाला? ”
“ पाच ते दहा मिनिटात.” चित्रांगद पागनीस म्हणाला.
“ तुमचं चंबू गबाळं आवरा, आपल्याला पोलीस स्टेशनात जायचय ” पोलीस म्हणाला.
“ वेडेपणा करू नका. मी पाणिनी पटवर्धन आहे, वकील. मला उद्या कोर्टात हजर राहायला लागणार आहे.”
“ तुम्ही पंतप्रधान का असेना ! स्टेशनात चला.”
“ आम्ही कोर्टात सादर करण्यासाठी एक पुरावा अभ्यासण्यासाठी प्रजापति च्या बोटीवर गेलो होतो.एक माणूस अचानक बोट वल्हवत आला आणि गुप्त पणे प्रजापति च्या बोटीत शिरला. त्याला आम्ही दिसलो नाही पण काहीतरी नेण्यासाठी तो आलं असावा असे आम्हाला वाटले.
आता विचार केलं तर तो टाईम बॉम्ब पेरण्यासाठी तो आलं होता असे दिसते. आम्ही सर्व त्यातून कसेबसे वाचलोय.”पाणिनी म्हणाला.
“ तो माणूस दिसायला कसा होता? त्याची बोट कशी होती? ”
“ आम्हाला अंधारात काहीच दिसलं नाही.” पाणिनी म्हणाला.
“ वकील आहात ना तुम्ही? अशी उत्तरं कशी चालतील?”पोलीस उपहासाने म्हणाला.
“ तुम्ही पटकन तुमच्या मुख्यालयात फोन करा. तो माणूस कुठून तरी किनाऱ्याला लागेलच.सर्व किनार पट्ट्या आणि त्यावरून सुटणाऱ्या गाड्या शोध,त्या तपासा.”पाणिनी म्हणाला.
“ मला सूचना देऊ नका. टाईम बॉम्ब लावायला तुम्हीच गेला होतात. ” पोलीस म्हणाला.
“ मी कशाला लावीन ? ”पाणिनी म्हणाला..
“ तो माणूस तरी कशाला लावेल? तेच कारण तुम्हाला पण लागू पडेल. चला, चला माझ्या बरोबर तुम्ही दोघेही. ” पोलीस म्हणाला आणि त्यांना घेऊन गेला.
पोलीस स्टेशन मधे सौम्या आणि पाणिनी कंटाळून बसले होते.दिवस भराचा कोर्टातील कामकाजाचा काळ आणि रात्री चा प्रजापति च्या बोटीवरचा प्रकार याचा शारीरिक आणि मानसिक थकवा पाणिनी ला आला होता. तेवढ्यात तिथेइन्स्पे.तारकरआला.
“ काय भानगड आहे पाणिनी ?” त्याने विचारले.
“ तुझ्या पोलिसाने हाती येऊ घातलेला खुनी निसटू दिला.त्याला मी सांगत होतो सर्व किनार पट्टी ........”पाणिनी म्हणाला.
“ सगळ सांग मला , प्रथम पासून ”इन्स्पे.तारकरम्हणाला.
पाणिनी ने सर्व हकीगत सविस्तर , हाताचे राखून न ठेवता कथन केली.
“ पाणिनी .तुला त्या प्रजापति च्या बोटीवर कशाला जायला पाहिजे होत? ”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ मला त्या प्रेताच्या जागी झोपून , भरती ओहोटीचा परिणाम प्रेतावर काय घडला असेल ते तपासायच होत.”पाणिनी म्हणाला.
“ काय लक्षात आले तुझ्या? ”इन्स्पे.तारकरने उत्साहात विचारले.
“ भरती नंतर बरोब्बर चार तास आणि एक मिनिट झाल्यावर बोट स्थिरावली, एक हिसडा बसला आणि मी उजव्या बाजूच्या म्हणजे ज्याला बोटी वरचे लोक स्टार बोर्ड बाजू म्हणतात, त्या बाजूला घसरलो.”पाणिनी म्हणाला.
“ तू गेलास तरी चालेल ”इन्स्पे.तारकरपटवर्धन ला घेऊन आलेल्या पोलिसाला म्हणाला.
“ तुम्ही त्यांना सोडू नका सर. मी त्यांना रंगे हाथ पकडलं तेव्हा त्यांचे चेहेरे बघायला हवे होते तुम्ही.” पोलीस म्हणाला.
“ मला त्यांचे चेहेरे एकट्याला बघायचेत. जा तू.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
पोलीस नाखुशीने बाहेर गेला.
“ पाणिनी, तू सांगतोयस त्या नुसार खुनाची वेळ रात्री ९.४० असायला पाहिजे.”इन्स्पे. तारकर म्हणाला.
“ पण सरकारी वकील तर संध्याकाळी साडे पाच ते सहा म्हणताहेत. ”पाणिनी म्हणाला.
“ डॉक्टरांनी रक्त स्त्रावाची जी वेळ सांगितली आणि तुझा भरती ओहोटी च्या वेळा पत्रकाचा अभ्यास यावरून खांडेकर जरी वाद घालत असले तरी ते खूपच गोंधळून गेलेत हे नक्की.मुख्य म्हणजे न्यायाधीशांना तुझं म्हणणं पटलय.ते उद्या कोर्टात गणित मांडून तपासणार आहेत. ला खांडेकर नी ज्या पद्धतीने फैलावर घेतलाय त्यावरून मी सांगतो की त्यांचा गोधळ उडालाय. ”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ अच्छा ! म्हणजे बेलवलकर सापडला तर ! ”पाणिनी म्हणाला.
“ हो सापडला. तो मिसेस पुंड ला भेटायला शुक्रवारी दुपारी विमान तळावर आला होता, ते दोघे पळून जाणार होते पण दिव्व्या पुंड चा ठाम निर्णय होत नव्हता.ती म्हणाली माझ्या नवऱ्याला न सांगता असे तुझ्या बरोबर पळून जाणे बरोबर नाही वाटत.नवरा प्रजापति च्या बोटीवर गेलाय. तिने त्याला सांगितलं की त्याने बोट क्लब वर जाऊन छोटी होडी भाड्याने घ्यावी.आणि दोघांनी बोटीवर जाऊन नवऱ्याला भेटावे. पण ती त्याच्या बरोबर बोट क्लब वर येणार नव्हती.ती म्हणाली की बोट क्लब चा माणूस तिला ओळखतो.त्यामुळे तिने सुचवलं की बेलवलकरने एकट्याने जाऊन होडी घ्यावी नंतर वाटेत एका जागी थांबून तिला होडीत घ्यावे. ”
“ वाटेत त्याने तिला कुठे होडीत घेतले?”पाणिनी म्हणाला.
“ बोट क्लब पासून थोडे पुढे एका ठिकाणी थोडीशी उतरती जमीन आहे. तिथे ती उभी होती.ती होडी चालवण्यात तरबेज आहे आणि बेलवलकर मात्र त्या बाबत अनभिज्ञ आहे. तिनेच होडीत बसल्यावर बेलवलकरला प्रजापति च्या बोटी पर्यंत नेले आणि त्याला होडीतच बसायला सांगून स्वत: बोटीवर चढून गेली.तिथे गेल्यावर तिने मेणबत्ती लावली.जवळ जवळ वीस मिनिटे ती बोटीवर होती.बेलवलकर मात्र होडीतच होता.तो पर्यंत बोट चांगलीच तिरकी झाली होती.बेलवलकर ला बोटीतून कोणाचेही आवाज नाही आले किंवा झटापट झाल्याचे ही दिसले नाही.मिसेस दिव्व्या पुंड परत आली आणि तिनेबेलवलकरला सांगितलं की सर्व काही ठीक आहे.तिचा नवरा लौकरच वाटणी करेल आणि त्याची कागदपत्रे, तो तिला पाठवेल , ते झाले की ती मुक्त होईल.तिने बेलवलकरला सांगितलं की हॉटेल मधे जा आणि आराम कर.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“बेलवलकरने तिला काही प्रश्न नाही विचारले?”पाणिनी म्हणाला..
“ छे: छे:, तो तिच्या एवढा प्रेमात आहे की तिने सांगितल्या प्रमाणे त्याने सर्व ऐकले.दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तिने बेलवलकरला फोन करून सांगितलं की तिचा नवरा मेला आहे,आणि बेलवलकरने बोटीवर गेल्या बद्दल तोंडातून चकार शब्द काढायचा नाही आणि तिला भेटायचा प्रयत्न ही करायचा नाही.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ या वर दिव्व्या पुंड काय म्हणाली? ”पाणिनी म्हणाला..
“ ती कबूल करते आहे बोटीवर गेल्याचे.पण ती म्हणते की जेव्हा ती वर गेली तेव्हा तिचा नवरा आधीच मारून पडला होता. ”
“ कुठे मारून पडला होता?”पाणिनी म्हणाला..
“ हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पाणिनी. ”इन्स्पे.तारकरम्हणाला “ तिच म्हणणं आहे की डाव्या बाजूला म्हणजे पोर्ट साईड ला . पितळी उंबरठ्या पासून दोन तीन इंच अंतरावर डोकं होत त्याचं.ति म्हणाली की बोट हलायला सुरुवात झाली होती पण एवढी हलत नव्हती की हात धरल्या शिवाय चालणे शक्य नव्हते. ती म्हणते की टेबल वर पेटवलेली मेणबत्ती पूर्ण जळून संपली होती , खालचे सांडलेले मेण अजूनही ओले होते, पातळसर होते.ती म्हणते की तिने एक नवी मेणबत्ती पेटवली आणि त्या ज्योतीत खाली सांडलेले मेण आणखी पातळ केले आणि त्याच मेणात नवी मेणबत्ती उभी करून लावली.अगदी सरळ लंबात लावली.तिला आपल्या नवऱ्यात अजिबात रस नव्हता. नवऱ्याचे पूर्ण लक्ष जमिनी हडप करणे, त्यांची खरेदी विक्री असल्याच गोष्टीत होते.पण तिला माहिती होते की एका मोठ्या व्यवहारात तो लखपती होण्याची शक्यता आहे.तिचा विचार होता की आधी बेलवलकरबरोबर जाण्या पेक्षा पद्मनाभ लखपती झाल्यावर गेलो तर त्याच्या वाटणीत आपल्याला ही मोठा हिस्सा मिळेल. ”
“ खांडेकर ना हे सर्व ऐकल्यावर काय वाटतंय? ”पाणिनी म्हणाला..
“ नरकात गेल्या सारखे वाटतंय ”इन्स्पे. तारकर म्हणाला. “ मी एवढ सगळ खाजगी आणि गोपनीय कधीच कुणाला सांगत नाही पण आज तुला सांगितलं याच तुला आश्चर्य नाही वाटलं?”
“ तुझ्या डोक्यात काहीतरी डाव असेल.”पाणिनी म्हणाला.
“ तुझी कोर्टातली चाल काय राहणार मला सांग , मी सौम्या ला लॉकर मधे ठेवलेल्या बुटाच्या भानगडी मधून वाचवतो.”इन्स्पे.तारकरम्हणाला.
“ पहिली गोष्ट म्हणजे मी उद्या कोर्टात जाणारच नाहीये . घरीच आराम करणार आहे.माझ्या जागी माझा ज्युनियर सुकृत हजर राहील.आणि माझा अंदाज आहे की सरकारी वकील पुढची तारीख मागतील.” पाणिनी म्हणाला.
“ हा एक भाग झाला. पुढे काय ? ”इन्स्पे.तारकरने विचारलं.
पाणिनी ने त्याच्या प्रस्तावाचा गंभीर पणे विचार केला. “ मी तुला फक्त काही अप्रत्यक्ष इशारा देतो.”
“ ठीक आहे , काय म्हणतोस? ”इन्स्पे. तारकर ने विचारले.
बोट तिरकी झालेली असताना बोटी च्या डेक वरून वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर चढत असताना, रक्त लागलेले बुटाचे ठसे हे पायरीच्या मध्यावर उमटणार नाहीत.ते पायरीच्या उतरत्या बाजू वर उमटतील.”पाणिनी म्हणाला.
इन्स्पे. तारकर ने डोळे मिटून ते दृश्य समोर आणायचा प्रयत्न केला. “ पाणिनी, तुझ्या या तर्कानुसार तू रेयांश प्रजापति ला बाहेर काढतो आहेस पण काया ला अडकवतो आहेस.”
“मी तुला काय घडलं असावं ते सांगितलं. मी स्वत: शिडी तिरकी करून आणि खालची आणि वरची एकच बाजू भिंतीला लाऊन चढून बघायचा प्रयोग केलाय. आम्ही निघतो आता दोघेही इन्स्पे. तारकर.”पाणिनी म्हणाला.
त्यांना घेऊन आलेला पोलीस पाणिनी ला बाहेर जाताना पाहून काहीतरी बोलायला गेला पण पाणिनीच त्याला उद्देशून म्हणाला, “ तुझ्या साहेबाना आमचा चेहेरा एकट्याला बघायचा होता,त्याने तो बघितलाय.आता तो तुझ्याशी बोलायला उत्सुक आहे . तुला शुभेच्छा.” आणि बाहेर पडला.
(प्रकरण २० समाप्त)