चित्रा 3
‘महंमदसाहेब, तुमचे म्हणणे खरे आहे. पैगंबर एर अवतारी विभूती होऊन गेले. मराठीत त्यांचे सुंदर चरित्र अद्याप नाही. हिंदुस्थानात आपण हिंदु-मुसलमान एकत्र राहातो, परंतु सहानुभूतीने एकमेकांच्या संस्कृतीच्या कधी अभ्यास केला नाही. आपण दूर दूर राहिलो.’ बळवंतराव म्हणाले. ‘एके काळी तसा प्रयत्न झाला...’ महंमदसाहेब म्हणाले. ‘परंतु इंग्रजांनी येऊन अडथळा केला. होय ना आजोबा?’ फातमा मध्येच म्हणाली.
‘होय.’ बळवंतराव म्हणाले.
‘मी पैगंबरांचे मराठीत सुंदर चरित्र लिहीन. मी मराठीच मातृभाषा मानते. महाराष्ट्रात राहून मराठी लिहिता वाचता न येणे म्हणजे लाजिरवाणे आहे. नाही का ग चित्रा?’ फातमा चित्राचा हात हातात घेऊन म्हणाली.
‘फातमा, तु मला मराठीतून पत्र लिहीत जा. मला विसरू नकोस.’ चित्रा म्हणाली.
'फातमा आता लौकरच जाईल. तिचे आता लग्न होणार आहे. तिच्या बापाने ठरवले आहे. तो माझे ऐकत नाही.’ महंमदसाहेब म्हणाले.
‘मग फातमाचे शिक्षण? महंमदसाहेब, मी खूप शिकवणार आहे होय ना बाबा? माझे नाही ना लवकर लग्न करणार? चित्राने लडिवाळपणाने बापास विचारले.
‘तुझ्या आईचाही आग्रह चालला आहे. मिळाले चांगले स्थळ तर पाठवू हां.’ चित्रा म्हणाली.
‘पाठवू, खरेच पाठवू.’ फातमा म्हणाली.
इतक्यात तिकडे श्यामू व रामूचे भांडण जुंपले. दोघे एकमेकांना ओढीत होते. श्यामू म्हणे मी मोट हाकून बघतो. रामू म्हणे मी. बळबंतरावांनी दोघांना हाका मारल्या आणि फातमा व चित्रा खाण्याची तयारी करू लागल्या. आनंदाने जेवणे झाली. गाड्या जोडून पुन्हा सारी निर्मळपूरला आली.