आनंदी आनंद 4
‘फातमाचे का तुम्ही वडील?’
‘हो.’
‘फातमाचे आजोबा फार प्रेमळ. फातमा कितीदा यायची माझ्याकडे. सारे सुरळीत झाले म्हणजे या हो. जेवायलाच या. फातमालाही आणा.’
‘आणीन हो.’
आमदारसाहेब गेले. त्यांनी ताबडतोब वर्तमानपत्रांतून बातमी दिली. भोजू नंदला. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बळवंतरावांचे मन हळुहळु चित्राच्या दर्शनार्थ तयार केले.
‘केव्हा येईल चित्रा?’
‘येणार आहे. पडा.’
असे चालले होते आणि चित्रा आली. गोविंदराव घेऊन आले. बरोबर आमदार हसनही होते. बळवंतरावांनी एकदम चित्राला हृदयाशी धरले.
‘चित्रा, आलीस? आता सारे ठीक होईल. तू म्हणजे आमचे भाग्य, आमचा आनंद.’ बळवंतराव म्हणाले.
‘आणि तुमची मामलेदारीही तुम्हाला परत मिळेल. आम्ही खटपट केली आहे. मुलगी हरवल्यामुळे मेंदू भ्रमिष्ट झाला; म्हणून कामाचे स्मरण राहीना. मुलगी हरवल्याण्यापूर्वीचा कामाचा रेकॉर्ड पाहा, वगैरे बाजू आम्ही मांडली. काळजी नका करू. सारे ठीक होईल.’ गोविंदराव म्हणाले.
‘चित्रा आली. आता भाग्यही येईल. आता सारे ठीक होईल. चारू कोठे आहे?’
‘वर्तमानपत्रांत ‘चित्रा सापडली. चारू, तू परत ये. अमुक पत्त्यावर ये.’ असे दिले आहे. येईल हो चारू. निश्चिंत राहा. मनाला आता त्रास नका देऊ.’ आमदार हसन गोड वाणीने म्हणाले.
‘चल चित्रा, ने मला.’ बळवंतराव म्हणाले.