चित्रेचे लग्न 14
‘चारु, आता मी तुझीच आहे. येईन लौकरच.’
‘तुझ्या फातमाला आपला दोघांचा फोटो पाठवलास का?’
‘पाठवणार आहे. फातमा आपल्या नव-याबरोबर दूर गेली आहे. तुमचे आजोळ आहे ना?’ त्याच बाजूला फातमा गेली आहे कोठे तरी.’
‘आपण जायचे का फातमाकडे?’
‘परंतु तिच्या नव-याला थोडेच आवडेल? चित्रा, लहानपणचे पुष्कळसे शेवटी मनातच ठेवावे लागते.’
‘चित्रा, तुला एक सांगून ठेवतो. आई काही बोलली तरी मनावर नको घेऊ तू. माझ्याकडे बघ. आईचेही मन पुढे निवळेल. तीही तुझ्यावर प्रेम करील. चित्रा, तुझ्यावर कोण नाही प्रेम करणार? तू गुणी आहेस. प्रेमळ, हसरी, मोकळी आहेस.’
‘होय हो चारु. खरोखरच तू मला मिळणे म्हणजे पूर्वपुण्याई. चारु, माझ्यापेक्षा तूच सुंदर आहेस. तूच गुणी आहेस. चित्रा साधी मुलगी.’
‘साधीच मला आव़डते. फुलांवर प्रेम करणारी फुलराणीच मला आवडते. चल तुला नटवतो फुलांनी.’
आणि त्याने तिच्या केसांत फुले घातली. दोघे घरी आली. चित्रा पुढे माहेरी गेली. चित्रा अत्यंत आनंदात होती.