चित्रावर संकट 3
‘चारू, ज्या दिवशी मी पुत्रवती होईन, त्या दिवशी खरी सुखी होईन.’ तुझ्या मांडीवर बाळ देईन, तेव्हा मी धन्य होईन.’
‘तीही इच्छा देव पुरवील.’
काही दिवस, काही महिने, असे आनंदात गेले. एके दिवशी सासूबाई सुनेजवळ काहीतरी बरेच बोलत बसल्या होत्या. कशाविषयी होते ते बोलणे? चला आपण ऐकू. कळेल धागादोरा.
‘येशील ना माझ्याबरोबर. येच. माझ्या माहेरच्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. कितीदा तरी त्यांची पत्रे आला की, येताना चित्राला पण घेऊन ये म्हणून. ये माझ्याबरोबर. जरा तुला थारेपालट होईल. माझे माहेर फार छान आहे. मोठा गाव आहे. गावाबाहेर देवीचे देऊळ आहे. जंगलात आहे. तेथे तू, मी जाऊ. देवीला मुलासाठी नवस करू. ती देवी नवसाला पावते. पुत्रदादेवी असेच तिचे नाव आहे. तुला मुलबाळ होत नाही, म्हणून चारूसुद्धा खिन्न असतो. आपण जाऊ. त्या देवीला जाऊ.’
‘येईन मी आणि तुम्ही एकट्या गेल्यात तर मला येथे करमायचे नाही. तुमचा हल्ली लळा लागला आहे मला. माहेरची आठवण खरेच हो तुम्ही मला होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला हल्ली मी आईच म्हणते. त्यांची आई ती माझीही आईच.’ येईन मी. देवीच्या पाया पडू.’
चित्राने चारूला ते सारे बोलणे सांगितले.
‘चित्रा, तुझा का अशा नवसांवर विश्वास आहे?’
‘चारू, जगात चमत्कार नाहीत असे नाही. तुझे-माझे लग्न हाही एक चमत्कारच नाही का? कोठले दोन जीव आणि कसे एकत्र आले! आपण जर जरा खोल पाहू तर सर्वत्र चमत्कारच दिसतील. चारू, मी लवकर परत येईन. सासूबाई राहातील. तू येशील ना मला न्यायला?’
‘पत्र पाठव म्हणजे येईन. चित्रा, मला का नाही घेऊन जात?’
‘चारू, तू विचार ना सासूबाईस.’
‘परंतु मला तिकडे यायला आवडत नाही.’
‘मला ते ठाऊक आहे. ती मुलगी तिकडे आहे म्हणून ना?’
‘तुला कोणी सांगितले?’
‘सा-या जगाला माहित आहे.’
एके दिवशी सासूबाईंच्या माहेरचे कोणीतरी त्यांना न्यायला आले होते. सासूबाई निघाल्या. चित्राचीही तयारी झाली.
‘चित्रा, लौकर ये हो.’
‘चारू, प्रकृतीस जप.’
‘माझ्या प्रकृतीची काळजी तू घ्यायचीस, तुझ्या मी. खरे ना?’
‘होय हो. मी लवकरच येईन.’
‘आई, चित्राला लवकर परत पाठव हो.’