Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ?

प्रश्न --गुरूची आवश्यकता नाही असे तुमचे म्हणणे आहे. परंतु योग्य मदत व समंजस मार्गदर्शन याशिवाय मी सत्य कसे काय शोधू शकेन ?

उत्तर---गुरूची आवश्यकता आहे किंवा नाही असे तुमचे म्हणणे आहे .सत्य दुसऱ्याच्या मार्फत कधीतरी शोधता येईल काय? काहींचे म्हणणे असे आहे कि होय ते दुसऱ्याच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोधता येईल .तर काहींचे मत असे आहे की नाही ते शोधता येणार नाही.आपल्याला यातील सत्य समजून घ्यावयाचे आहे .मला या विषयात मत नाही ते तसे आहेही आणि नाहीही .गुरूची आवश्यकता आहे कि नाही हा प्रश्नच होऊ शकत नाही. यातील सत्य हा मताचा प्रश्नच होऊ शकत नाही.मग ते मत कितीही प्रसिद्ध सर्वमान्य प्रगाढ व पांडित्यपूर्ण असो.या विधानातील सत्य आपल्याला प्रत्यक्ष शोधून काढले पाहिजे.

आपल्याला गुरू पाहिजे असे आपल्याला का वाटते ?गुरू मला पाहिजे असे अापण म्हणत असतो कारण आपण गोंधळलेले असतो .गुरू आपल्याला मदत करील अशी आपली कल्पना असते .त्याच्यामुळे आपल्याला समज प्राप्त होईल . त्याला आपल्यापेक्षा जीवनाबद्दल बरीच माहिती आहे .तो पित्याप्रमाणे वागेल. शिक्षकाप्रमाणे आपल्याला वळण देईल .त्याला प्रचंड अनुभव आहे व आपल्याला फारच थोडा अनुभव आहे .त्याच्या विशाल अनुभवाची आपल्याला फार फार मदत होईल वगैरे वगैरे .तुम्ही गुरूकडे जाता कारण तुम्ही गोंधळलेले आहात .जर तुम्ही स्पष्ट असाल त गुरूकडे जाणार नाही.जर तुम्ही निरतिशय आनंदात असाल तुम्हाला काहीही समस्या नसतील तरीहि तुम्ही गुरूकडे जाणार नाही .तुम्हाला संपूर्ण समज असेल तरी तुम्ही गुरूकडे जाणार नाही.यातील महत्त्व तुमच्या लक्षात आले असेल असे मला वाटते .तुम्ही गोंधळलेले आहात आणि म्हणून तुम्ही शिक्षकांच्या शोधात आहात .तुम्ही प्रकाशासाठी योग्य मार्गदर्शनासाठी सत्य दर्शनासाठी त्याच्याकडे जात आहात.तुम्ही गुरूची निवड करता कारण तुम्ही गोंधळलेले आहात.तुम्हाला आशा आहे कि तुम्ही जे मागता ते तो देईल .जो तुमच्या मागण्या पूर्ण करील अशा गुरूची तुम्ही निवड करता.त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या अपेक्षित समाधाना प्रमाणे तुम्ही निवड करता.तुमची निवड तुमच्या समाधानाच्या कल्पनेवर अवलंबून असते."माझ्याकडे येऊ नका स्वतःवर अवलंबून राहा" असे जो सांगतो त्याची अर्थातच तुम्ही निवड करीत नाही.तुमच्या पूर्वग्रहांप्रमाणे तुम्ही निवड करता.ज्याअर्थी तुम्ही तुमचा गुरू, त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या समाधानावर निवडत असता, त्याअर्थी तुम्ही सत्याचा शोध घेत नसता, तर गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधीत असता .या गोंधळातून बाहेर पडण्याच्या मार्गाला चुकीने सत्याचा शोध असे म्हटले जाते.

गुरू आपला गोंधळ नाहीसा करू शकेल ,तो आपल्याला स्पष्टता देईल, या विधानाची अापण तपासणी करूया .स्वतःचा गोंधळ दुसरा कुणीतरी कधीतरी स्पष्ट करू शकेल काय ?गोंधळ हा आपल्या प्रतिक्रियांतून निर्माण झाला आहे . तो दुसरा कुणीतरी निर्माण केला आहे असे तुम्हाला वाटते काय ?नाही हा सर्व गोंधळ आपण निर्माण केलेला आहे .हे दुःख, या अस्तित्वाच्या सर्व पातळीवरील लढाया, हे आत व बाहेर सतत चाललेले युद्ध , हे दुसऱ्या कुणीतरी निर्माण केले आहे असे तुम्हाला वाटते काय?हा सर्व स्वज्ञान अभावाचा परिणाम आहे.अापण स्वतःला समजत नाही .आपला अंतर्गत विरोध , आपले दुःख, आपल्या लढाया, आपले झगडे, आपल्या प्रतिक्रिया, आपल्याला समजत नाहीत म्हणून मग आपण गुरूकडे जातो .आपण इच्छा करतो कि तो आपल्याला यातून बाहेर काढील.आपण स्वतःला या वर्तमानाशी असलेल्या संबंधातूनच समजू शकू.ही संबंध मयता हाच गुरू आहे .दुसरा कुणीतरी बाहेरचा नव्हे .जर ही संबंधमयता मी समजू शकणार नाही तर तो जो गुरू काही म्हणत असेल ते सर्व व्यर्थ आहे .कारण जर मी, माझी मालमत्ता ,शेजारी,इतर लोक ,कल्पना, यांच्याशी असलेली संबंधमयता समजू शकलो नाही तर मग मला सोडवण्याला दुसरा कोण समर्थ आहे ?हा विरोध नष्ट करण्यासाठी मी स्वतःला समजून घेतले पाहिजे . 

म्हणजे मी माझ्या सर्व संबंधमयतेबद्दल सदैव जागृत पाहिजे .मी जर मला ओळखत नसेन तर गुरुचा काय उपयोग आहे?ज्याप्रमाणे राजकीय पुढारी हा गोंधळात असलेल्या लोकांकडून निवडला जातो.आणि म्हणूनच त्यांची निवडही गोंधळलेली असते .त्याप्रमाणेच आपल्या गुरूचे होते .माझ्या गोंधळा प्रमाणेच मी निवड करू शकतो .म्हणून तो गुरूही राजकीय पुढाऱ्यांप्रमाणेच गोंधळलेला असतो.

कोण बरोबर आहे याचे महत्त्व नाही .मी बरोबर आहे, कि ज्याना गुरू आवश्यक वाटतो ते बरोबर आहेत, ते महत्वाचे नाही. आपल्याला गुरू का हवा असतो ते महत्त्वाचे आहे .कित्येक वेळेला गुरू नाना प्रकारच्या पिळवणूकी करीत असतात परंतू त्यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही .तुमची प्रगती कशी काय होत आहे हे तुम्हाला कुणीतरी सांगितले तर तुम्हाला संतोष होतो .परंतु तुम्हाला गुरू का हवा असतो? इथे खरी सुटका आहे .जरी तुमचा गुरू खरा असला तरी तो तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकेल .पण उरलेले सर्व काही तुम्हालाच करावे लागेल .याला तोंड देण्याची तुमची तयारी नसते .तुम्ही सर्व जबाबदारी गुरूवर लादून मोकळे होता .ज्या क्षणी स्वज्ञानाची एक शलाका निर्माण होते त्याच क्षणी गुरू निरूपयोगी ठरतो .कोणताही गुरू कोणतेही पुस्तक कोणताही धर्मग्रंथ तुम्हाला स्वज्ञान देऊ शकणार नाही .जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल संबंधमयेतेत जागृत असाल  त्याच वेळेला स्वज्ञान निर्माण होते.असणे म्हणजेच संबंधरूप असणे.संबंधमयता दुःखकारक विरोधमय आहे हे समजणे म्हणजे असणे नव्हे.स्वतःची मालमत्तेशी असलेली संबंधमयता क्लेशदायक आहे हे समजणे म्हणजे स्वज्ञान नव्हे.ते क्लेशदायक कां आहे हे समजणे म्हणजे संबंधरूपता समजणे होय.मालमत्तेशी असलेली योग्य संबंधरूपता तुम्हाला माहित नसेल तर झगडा निर्माण होणे अपरिहार्य आहे .त्यामुळे समाजातही विरोध निर्माण होतो .जर तुम्ही तुमची स्वतःची पत्नी व मुलांशी असलेली संबंधमयता समजू शकत नसाल तर त्या संबंध मयतेतून निर्माण होणारा विरोध दुसरा कसा काय सोडवू शकेल?तीच गोष्ट श्रद्धा कल्पना ज्ञान यांची, मालमत्ता बायकामुले शेजारी पाजारी कल्पना श्रद्धा यांच्याशी असलेली संबंधरूपता न समजल्यामुळे तुम्ही गोंधळलेले असता. मग तुम्ही गुरू शोधायला लागता.

जर तो खरा गुरू असेल तर तो तुम्हाला एवढेच सांगेल कि "स्वतःला समजून घ्या सर्व गैरसमज व गोंधळ तुम्ही निर्माण केलेला आहे.हा सर्व विरोध , जेव्हा तुम्ही तुमची संबंध मयता संपूर्णपणे समजून घ्याल तेव्हा संपेल".

सत्य दुसऱ्या कुणाच्या मार्फत शोधता येणे अशक्य आहे .सत्य हे स्थिर नाही.तो शेवटही नाही .ते ध्येय होऊ शकत नाही .सत्य जिवंत जागृत व गतिमान आहे .सत्य प्राप्ती हा शेवट कसा काय असेल ?जर सत्य म्हणजे एक स्थिर बिंदू असेल तर ते सत्य नाही . तर ते फक्त एक मत आहे .सत्य हे अज्ञात आहे .तुमचे मन त्याला कितीही शोधीत असले तरी ते त्याला कधीही सापडणार नाही .मन हे ज्ञातापासून बनलेले आहे .ते भूत अपत्य आहे .ही गोष्ट तुमची तुम्हाला समजून येण्यासारखी आहे .फक्त तुम्ही निरीक्षण केले पाहिजे. मन हे ज्ञातापासून बनविलेले हत्यार आहे.म्हणूनच ते अज्ञाताचा शोध घेण्याला असमर्थ आहे .मन फक्त ज्ञाताकडून ज्ञाताकडे जाऊ शकेल. जेव्हा मन सत्याचा शोध घेते तेव्हा ते सत्य स्वरचित  असते .मन फक्त ज्ञाताचा पाठलाग करीत असते .फक्त जास्त समाधानकारक ज्ञाताचा तो शोध असतो .जेव्हा मन सत्याचा शोध घेते तेव्हा ते स्वरचित सत्याचा शोध घेत असते .  सत्य कल्पनारचित  असते.ते स्व-रचित असते.तो खऱ्या सत्याचा शोध नसतो तर स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या सत्याचा शोध असतो .ध्येय स्वआराखित असते .आणि म्हणूनच ते असत्य असते .फसवे असते . जे आहे तेच सत्य आहे .जे नाही ते नव्हे.जे आहे त्याच्या विरुद्ध आहे ते नव्हे.जे मन सत्याचा ईश्वराचा शोध घेत आहे, ते ज्ञाताचा शोध घेत आहे, अज्ञाताचा नव्हे .जेव्हा तुम्ही ईश्वराचा विचार करता तेव्हा तो ईश्वर तुम्ही बनवलेला असतो .तो तुमच्या विचारांचा सामाजिक संस्काराचा धारणेचा परिणाम असतो . तुम्ही फक्त ज्ञाताचा विचार करू शकता .तुम्ही सत्यावर एकाग्र होऊ शकत नाही .ज्यावेळी तुम्ही अज्ञाताचा विचार करता त्यावेळी तुम्ही स्वरचित ज्ञाताचा विचार करीत असता.सत्य व परमेश्वर ही विचार करण्याची वस्तू नव्हे.जर तुम्ही त्याबद्दल विचार करीत असाल तर ते सत्य नव्हे. सत्य मिळविता येत नाही ते तुमच्याकडे येते .तुम्ही फक्त ज्ञाताच्या पाठीमागे जाऊ शकता.जेव्हा मन ज्ञाताने आंदोलित नसेल,जेव्हा मन ज्ञाताच्या परिणामाने बद्ध नसेल, तेव्हा सत्य आपोआप प्रगट होते .सत्य झाडाच्या प्रत्येक पानात प्रत्येक अश्रूत आहे ते सर्वत्र आहे ते जाणावयाचे असते.तुम्हाला कोणीही सत्याकडे घेऊन जाऊ शकणार नाही .कोणीही तुम्हाला सत्याकडे जाणारी वाट दाखवू शकणार नाही.कुणी जर वाट दाखविली तर ती वाट असत्याकडून असत्याकडे जाणारी असेल .ती सत्याकडे जात नसेल. ती फक्त ज्ञाताकडून ज्ञाताकडे जात असेल .

जे मन रिकामे आहे, जे कुठच्याही ज्ञाताने भरलेले नाही, त्याच मनात फक्त सत्य प्रगट होऊ शकते .जेव्हा ज्ञात गैरहजर असेल,जेव्हा ज्ञात कार्यरत नसेल, तेव्हाच सत्य प्रगट होते .मन हे ज्ञाताचे गुदाम आहे .ज्ञाताचे अवशेष तिथे राखून ठेवलेले आहेत .ज्या स्थितीत सत्य प्रगट होते,त्या स्थितीत मन असण्यासाठी, ते स्वतःबद्दल स्वतःच्या पूर्व अनुभवाबद्दल सदैव जागृत असले पाहिजे .मन सर्व पातळ्यांवरील क्रिया व प्रतिक्रिया आणि धारणा यांच्याबद्दल सदैव जागृत असले पाहिजे.जेव्हा संपूर्ण स्वज्ञान रवि उदयाला येतो तेव्हा ज्ञाताला पूर्णविराम मिळतो .त्या क्षणी मन पूर्ण रिकामे असते .त्या क्षणी सत्य बोलावल्याशिवाय तुमच्याकडे येते.सत्य निमंत्रण करून वाट पाहून येत नाही.सत्य तुमच्या जवळ किंवा माझ्याजवळ नाही.तुम्ही त्याची पूजा करू शकत नाही.ज्याक्षणी ते ओळखले जाते ,त्याचक्षणी सत्य ज्ञातात शोषून घेतले जाते आणि फक्त ज्ञान उरते . सत्य हरपते.प्रतीक प्रतिबिंब हे सत्य नसते .जेव्हा स्वसमज येतो तेव्हा "मी" बंद पडतो व अनादि प्रगट होते. 

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत