Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न ११: भीतीविषयी

प्रश्न --माझ्या सर्व हालचालींवर परिणाम करणाऱया भीतीपासून मी मुक्त कसे व्हावे?

उत्तर---आपली भीती बद्दल काय कल्पना आहे ?भीती कशाची? भीतीचे अनेक प्रकार आहेत.भीतीचे निरनिराळे प्रकार पाहून त्या प्रत्येकाचे विश्लेषण करण्याची आपल्याला गरज नाही .जेव्हा संबंधमयतेची संपूर्ण समज आपल्याला आलेली नसते, तेव्हा भीती निर्माण होते हे आपण पाहू शकतो. संबंधरूपता म्हणजे केवळ लोकांशी असलेली संबंधरूपताच नव्हे, तर त्याचबरोबरआपण व निसर्ग, आपण व मालमत्ता,आपण व कल्पना, यांच्याबरोबर असलेली संबंध रूपता होय .जोपर्यंत ही संबंधरूपता समजलेली नाही तोपर्यंत भीती ही राहणारच . जीवन म्हणजे संबंधरूपता. असणे म्हणजेच संबंधरूप असणे .संबंधमयतेशिवाय जीवन ऩाही .कोणीही,काहीही, एकाकी राहू शकत नाही .जोपर्यंत मन एकाकीपणा वेगळेपणा शोधीत आहे तोपर्यंत भीती असणारच .भीती ही कधी एकटी असू शकत नाही. नेहमी ती दुसऱ्या कशाबद्दल तरी वाटत असते .भीती ही एक काल्पनिक वस्तू नाही . ती संबंधमयतेत असते .

प्रश्न असा आहे कि भीतीपासून स्वतंत्र कसे व्हावे?प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे कि ज्यावर आपण विजय मिळविला आहे त्यावर आपल्याला पुनः  पुनः विजय मिळवावा लागतो .कोणत्याही समस्येवर अंतिम विजय मिळविता येत नाही .ती फक्त समजून घेता येईल .विजय मिळविणे व समजून घेणे या सर्वस्वी भिन्न प्रक्रिया आहेत .विजय प्रक्रियेची परिणीती आणखी गोंधळ व आणखी भीती यात होत असते.एखाद्या समस्येशी युद्ध करणे, तिला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे, किंवा त्याविरुद्ध संरक्षण फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणे,  या सर्वातून फक्त आणखी विरोध निर्माण होत असतो .जर आपण भीती समजावून घेऊ शकलो, पायरी पायरीने संपूर्ण त्यात जाऊ शकलो,तिच्या संपूर्ण गाभ्याची उकल करू शकलो, तर मात्र भीती कधीही कुठल्याही स्वरूपात येणार नाही .

मी मगाशीच म्हटले आहे की भिती ही केवळ एक कल्पना नाही.नेहमी ती कसली तरी वाटत असते .ती नेहमी कुठल्यातरी संबंधमयतेत असते .भीती म्हणजे आपली काय समजूत आहे ?शेवटी आपण घाबरलेले आहोत. आपण घाबरलेले नाही काय? नसण्याबद्दल, बनत नसण्याबद्दल ,आपण घाबरलेले आहोत . आता जेव्हा नसण्याबद्दल, प्रगती करीत नसण्याबद्दल, किंवा अज्ञाताबद्दल, मृत्यूबद्दल, आपल्याला भीती वाटत असते, तेव्हा ही भीती निश्चय निर्णय़ किवा निवड यातून नष्ट होऊ शकेल क़ाय ?अर्थातच ही गोष्ट अशक्य आहे .दाबून टाकणे, दूर सारणे, बाष्पीभवन करणे, एकाच्या ठिकाणी दुसरे अाणणे, यामुळे फक्त विरोध निर्माण होतो .तो तसा होत नाही काय ?म्हणून कुठल्याही प्रकारचा विरोध,कुठल्याही प्रकारची शिस्त, यातून भीती नष्ट होणार नाही .ही गोष्ट स्पष्टपणे पाहणे जाणवणे व अनुभवणे आवश्यक आहे . कुठल्याही प्रकारचे संरक्षण व विरोध यातून भीती नष्ट होणार नाही .त्याच प्रमाणे उत्तराचा शोध किंवा शाब्दिक वा बौद्धिक स्पष्टीकरण यातूनही भीती नष्ट होणार नाही .

आता आपण एवढे कशाला घाबरलेले आहोत?आपण वस्तुस्थितीला घाबरलेले आहोत, कि वस्तुस्थिती विषयीच्या कल्पनेला घाबरलेले आहोत?आपण वस्तू जशी आहे तिला घाबरलेले आहोत,कि वस्तू जशी आहे अशी आपली कल्पना आहे, त्याला घाबरलेले आहोत ?उदाहरणार्थ मृत्यू घ्या आपण मृत्यू या वस्तुस्थितीबद्दल घाबरलेले आहोत,कि मृत्यूविषयीच्या कल्पनेला घाबरलेले आहोत ?  वस्तुस्थिती ही एक गोष्ट आहे, तर वस्तुस्थिती बद्दलची कल्पना ही दुसरी गोष्ट आहे .मी मृत्यू या शब्दाला घाबरलेला आहे कि मृत्यू या वस्तुस्थितीला घाबरलेला आहे ?मी शब्दांबद्दल कल्पनांबद्दल घाबरलेला असल्यामुळे मला वस्तुस्थिती कधीही कळत नाही .मी वस्तुस्थितीकडे कधीही पाहत नाही.त्यामुळे माझा वस्तुस्थितीशी कधीही प्रत्यक्ष संबंध येत नाही. माझे जेव्हा वस्तुस्थितीशी प्रत्यक्ष संपूर्ण दळणवळण असेल, तेव्हाच मी वस्तुस्थितीला घाबरणार नाही .माझे जर वस्तुस्थितीशी प्रत्यक्ष दळणवळण असेल तर भीती नसते.जोपर्यंत माझ्या जवळ वस्तुस्थिती बद्दल कल्पना मते व प्रणाली आहेत, तोपर्यंत माझे वस्तुस्थितीशी प्रत्यक्ष दळणवळण  असणार नाही.तेव्हा मी शब्दाला, कल्पनेला,कि वस्तुस्थितीला, घाबरत आहे .या विषयी मी अत्यंत स्पष्ट पाहिजे .मी जर वस्तुस्थितीच्या प्रत्यक्ष समोर असेन,तर त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही .खरेतर त्याबद्दल समजून घेण्यासारखेही काही नाहीं .वस्तुस्थिती आहे व मी ती हाताळू शकतो .जर मी शब्दाला घाबरत असेन,तर मी शब्द समजून घेतला पाहिजे .त्या शब्दाच्या  संपूर्ण प्रक्रियेत मला गेले पाहिजे .त्या शब्दाचा त्या वाक्याचा गर्भितार्थ काय ते मला समजून घेतले पाहिजे . गर्भितार्थ मला शोधून काढला पाहिजे .

उदाहरणार्थ एखादा एकाकीपणाला घाबरलेला असतो . एकटेपणातील दुःखाना क्लेशाना घाबरलेला असतो .ही भीती अस्तित्वात असते.कारण त्याने एकाकीपणाकडे प्रत्यक्ष  पाहिलेले नसते . ज्यावेळी एखादा एकाकीपणाला प्रत्यक्ष भेटतो, त्याच क्षणी तो एकाकीपणा म्हणजे काय हे समजू शकतो .परंतु जर त्याच्याजवळ पूर्वीच्या ज्ञानावर आधारित असे एखादे मत, किंवा एखादी कल्पना असेल, तर हे वस्तुस्थितीबद्दलचे पूर्वींचे ज्ञान, वस्तुस्थिती बद्दलची पूर्वकल्पना,  वस्तुस्थितीबद्दलचे मत भीती निर्माण करते.भीती ही वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी केलेल्या नामकरणातून, वर्गीकरणातून, प्रतीक रेखाटनातून' निर्माण होत असते.भीती ही शब्दांपासून वर्गीकरणापासून स्वतंत्र नसते.

उदाहरणार्थ  माझ्याजवळ एकाकीपणाबद्दल एक प्रतिक्रिया आहे. मी काहीही नसण्याबद्दल घाबरलेला आहे .मी वस्तुस्थितीला घाबरलेला आहे की माझ्या जवळ असलेल्या वस्तुस्थितीबद्दलच्या पूर्वीच्या ज्ञानाचे पुनर्जीवन झाल्यामुळे मी घाबरलेला आहे?ज्ञान म्हणजेच शब्द प्रतीक किंवा प्रतिबिंब होय .मी जेव्हा एखाद्या वस्तुस्थितीच्या प्रत्यक्ष समोर असेन,जेव्हा माझे प्रत्यक्ष त्याच्याजवळ दळणवळण असेल ,तेव्हा मी वस्तुस्थितीकडे प्रत्यक्ष बघू शकतो, तिचे निरीक्षण करू शकतो ,आणि म्हणूनच वस्तुस्थिती बद्दल भीती असण्याचे कारण नाही .वस्तुस्थिती काय असेल, किंवा त्यातून काय निर्माण होईल,याबद्दलची माझी समजूत किंवा कल्पना, भीतीला कारण होते .

माझे वस्तुस्थिती बद्दलचे ज्ञान मत कल्पना अनुभव यामुळे भीती निर्माण होते.जोपर्यंत वस्तुस्थितीचे शब्दीकरण आहे, म्हणजेच वस्तुस्थितीला नाव देणे, म्हणजेत धि:कार करणे व ओळखणे आहे, जोपर्यंत विचार वस्तुस्थितीची द्रष्टा म्हणून योग्यायोग्य, निर्णय निश्चिती करीत आहे, तोपर्यंत भीती असणारच .विचार हा भूताचा परिणाम आहे .विचार फक्त शब्दीकरणातूनच असू शकतो .तो प्रतिकातून प्रतिबिंबातून असू शकतो .जोपर्यंत विचार वस्तुस्थितीचे भाषांतर करीत आहे, वस्तुस्थितीची समज प्राप्त करून घेत आहे, तोपर्यंत भीती असणारच .

अशा प्रकारे मन भीती निर्माण करते.मन म्हणजेच विचार प्रक्रिया,विचार करणे म्हणजे शब्दीकरण, तुम्ही शब्दाविना विचार करू शकत नाही .प्रतिके प्रतिबिंबे याशिवाय तुम्ही विचार करू शकत नाही.हे शब्द ही प्रतिके हे प्रतिबिंब म्हणजेच पूर्वग्रह .भूत ज्ञान म्हणजेच मनाची समज होय .ही मनाची समजूत वस्तुस्थितीवर फेकली जाते.त्यातूनच भीतीची निर्मिती होते .जेव्हा मन वस्तुस्थितीकडे भाषांतर केल्याशिवाय, नाव दिल्याशिवाय,चिठ्ठी लाविल्याशिवाय, वर्गीकरण केल्याशिवाय,पहाण्याला समर्थ असते, तेव्हाच भीतीपासून स्वतंत्रता प्राप्त होते. हे फार बिकट आहे .आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया, आपला उतावळेपणा ,हे सर्व मनाकडून ताबडतोब ओळखले जाते .ओळखले जात असताना ते शब्दरूप केले जाते .मत्सराची भावना ही त्या शब्दाने ओळखली जाते .कुठचीही भावना ओळखणे, नाव दिल्याशिवाय एखाद्या भावनेकडे पहाणे, शक्य आहे काय ?भावनेचे नामकरण तिला सातत्य व पुष्टी देते.ज्याक्षणी भीती हे नाव तुम्ही एखाद्या भावनेला देता, त्याच वेळी तिला  सातत्य व पुष्टी देता .परंतु जर तुम्ही त्या भावनेकडे नाव दिल्याशिवाय पाहण्याला समर्थ असाल, तर तुम्हाला आढळून येईल,कि ती जागच्या जागी सुकून नष्ट होते .म्हणूनच जर एखाद्याला भीतीपासून पूर्णपणे स्वतंत्र व्हायचे असेल, तर त्याने ही संपूर्ण नामकरण प्रक्रिया, प्रतीक रेखाटन प्रक्रिया, वर्गीकरण प्रक्रिया, समजून घेतली पाहिजे .भीतीपासून स्वातंत्रता जेव्हा फक्त स्वज्ञान असेल तेव्हाच प्राप्त होईल . स्वज्ञान ही शहाणपणाची सुरुवात आहे .शहाणपणाची सुरुवात म्हणजेच भीतीचा शेवट होय .

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत