Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न १५: टीकेविषयी

प्रश्न ---टीकेला संबंधमयतेत काय स्थान आहे ?रचनात्मक व विनाशात्मक टीकेत काय फरक आहे?

उत्तर---मुळात आपण टीकाच का करतो ?समजासाठी आपण टीका करतो काय?ही केवळ दोष शोध प्रक्रिया आहे काय ?जर मी तुमच्यावर टीका केली तर मला तुमची समज येते काय ? समज योग्यायोग्य निर्णय प्रक्रियेतून येतो काय ?जर तुमच्याशी असलेली माझी संबंधमयता, मला वरवर नव्हे तर संपूर्णपणे समजून घ्यायची असेल, तिचे आकलन व्हावे असे मला वाटत असेल,तर ते मला तुमच्यावर टीका करून साध्य होईल काय?मी तुमच्यावर टीका करावी की तुमच्या बरोबर असलेल्या संबंधमयतेबद्दल फक्त संपूर्ण जागृत राहावे ?माझ्या मतांचे, टीकेचे,योग्यायोग्य निर्णयाचे, धि:काराचे, समरसतेचे,रेखाटन केल्याशिवाय फक्त स्तब्धपणे पाहात राहिल्यामुळे,मला तुमची जास्त चांगली समज येईल काय ?जर मी टीका केली नाही तर काय होते ?एखादा निद्रित होणे स्वाभाविक नाही काय?मी निद्रित तर होणार नाही. जेव्हा आपण दोष काढीत असतो तेव्हा आपण झोपी गेलेले नसतो असा याचा निश्चितच अर्थ नाही. कदाचित टीका ही एक सवय बनते व आपण या सवयीतून झोपी जातो .टीकेतून खोल व विशाल संबंधमयतेची समज येते काय ?टीका रचनात्मकआहे संघटनात्मक आहे की विनाशात्मक व विघटनात्मक आहे त्याचा येथे काहीही संबंध नाही .मन व अंत:करण यांची संबंधमयतासमज येण्यासाठी काय आवश्यक आहे? असा येथे प्रश्न आहे.समज प्रक्रिया हे काय आहे ?एखादी गोष्ट आपल्याला कशी समजते?जर तुम्ही आपल्या मुलात रस घेत असाल तर तुम्ही त्याला कसे काय समजून घेता?तुम्ही फक्त पहाता. तुम्ही बरोबर हेच करीत नाही काय ?तो खेळत असताना तुम्ही पाहता.त्याचप्रमाणे निरनिराळया  लहरीत तुमचे मूल असताना तुम्ही फक्त पाहता . तुम्ही तुमचे मत, केवळ मानसिक दृष्ट्या सुद्धा, तुम्ही व तो यांच्यामध्ये आणीत नाही .तो असा असला पाहिजे किंवा तो असा नसला पाहिजे असे तुम्ही काहीही म्हणत नाही .तुम्ही फक्त तत्पर पहारेकरी असता .तुम्ही बरोबर असेच करीत नाही काय ? तुम्ही फक्त तरल तत्पर जागृत असता.नंतरच तुम्ही तुमच्या मुलाला समजण्याला सुरुवात करता.जर तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला,जर तुम्ही स्वतःच्या लहरी,तो कसा वागावा याबद्दलची तुमची मते, त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही  सतत टीका करीत असाल, तर तुम्ही आपल्या संबंधमयतेमध्ये निश्चितपणे अडथळा आणीत आहात.दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण आकार देण्यासाठी, हस्तक्षेप करण्यासाठी ,टीका करतात .त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट सुख व समाधान प्राप्त होते .कोणालाही काही ना काही आकार देण्यात तुम्हाला समाधान वाटते .त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची सत्ता आपल्या हातात असल्यासारखे वाटते.तुम्ही वरिष्ठ असता .या सर्व प्रक्रियेत तुम्हाला विशिष्ट समाधान वाटते .या सर्व प्रक्रियेमधून संबंधमयतासमज येते काय?  ही फक्त वरचढ प्रवृत्ती आहे .दुसऱ्याला तुमच्या लहरीप्रमाणे, वासनेप्रमाणे, मताप्रमाणे, कल्पनांप्रमाणे, विशिष्ट आकार देण्याची ही वासना आहे .या सर्वामुळे समजण्यात अडथळा निर्माण होत नाही काय ?या सर्वामुळे संबंधमयतासमज अत्यंत बिकट होते.

आता आपण स्वटीकेबद्दल विचार करू या  स्वतःबद्दल टीकात्मक दृष्टिकोन ठेवणे,धि:कार करणे'समर्थन करणे, या सर्वामधून स्वसमज प्राप्त होत काय ?जेव्हा मी स्वतःवर टीका करण्याला सुरुवात करतो, तेव्हा स्वसमज प्रक्रियेमध्ये, स्वशोध प्रक्रियेमध्ये, अडथळा निर्माण होत नाही काय ?स्वनिरीक्षण हा एक स्वटीकाप्रकार आहे .यामुळे स्वउकल होण्यास मदत होते काय? कशामुळे "मी"चा गुंता उकलला जातो .सतत विश्लेषण करीत असणे, सतत टीका करीत असणे,  चिकित्सा करीत असणे, सतत भीतीमध्ये असणे, या मुळे स्वउकल होण्याला काहीही मदत होत नाही.स्वउकल स्वसमज फक्त धिक्कार विरहित, समर्थन विरहित, समरसता विरहित, सातत्यपूर्ण स्वजागृतीतून येते. काही तरी स्वयंभूपणा म्हणून आवश्यक आहे .तुम्ही सतत विश्लेषण करीत, टीका करीत, आकार देत, शिस्त  लावीत,राहू शकत नाही.हा स्वयंभूपणा,ही उत्स्फूर्तता, ही तात्काळता , समजाला आवश्यक आहे .जर मी केवळ धि:कार करीत असेन, शिस्त लावीत असेन, मर्यादा घालीत असेन ,तर प्रत्यक्षात मी विचार व भावना यांच्या हालचालीना पूर्णविराम देत नाही काय?विचार व भावना यांच्या मोकळ्या हालचाली मधून मला शोध लागतो .शिस्तीतून शोध लागत नाही.शोध लागल्यानंतर या शोधाला कसे हाताळावे हे महत्त्वाचे आहे .मी जर एखाद्या कल्पनेप्रमाणे ध्येयाप्रमाणे आदर्शाप्रमाणे वागत असेन तर मी स्वतःला पुनः एका आकारात दाबून बसविण्याचा प्रयत्न करतो .अशा दाबून बसविण्यामध्ये खरी समज नसते .खरा बदल नसतो .जर मी स्वतःला धि:कार किंवा समर्थन याशिवाय फक्त पाहात असेन तरच मी स्वतःच्या पलीकडे जाण्याचा संभव आहे .त्यामुळे स्वतःला एखाद्या ध्येयाप्रत आदर्शाप्रत नेण्याची ही प्रक्रियाच पूर्ण चुकीची आहे .आदर्श म्हणजे  घरी बनविलेले देव होत .स्वरचित प्रतिबिंबा सारखे होण्यात, तसा होण्याचा प्रयत्न करण्यात, निश्चितच सुटका नाही.

अशा प्रकारे मन जेव्हा स्तब्धपणे पाहात असते, जागृत असते, तेव्हाच खरी समज येते.हे फार कष्टमय व बिकट आहे .कारण क्रियाशील, टीकात्मक,अस्थिर, धि:कारक, समर्थक, असण्यात आपल्याला आनंद वाटतो.आपल्या सर्व अस्तित्वाचा हा असा सांगाडा आहे .कल्पना, पूर्वग्रह, मते, दृष्टिकोन, अनुभव, स्मरण, या पडद्यातून आपण समजण्याचा प्रयत्न करतो.  या सर्व पडद्यापासून स्वतंत्र होणे व प्रत्यक्ष समजणे शक्य आहे काय ?जेव्हा समस्या अत्यंत तीव्र असते, जेव्हा कळकळ तीव्र असते, तेव्हा निष्कारण या पडद्यामधून पाहण्याचा आपण प्रयत्न करीत नाही.या भानगडीत आपण पडत नाही.प्रत्यक्ष पाहतो . टीका प्रक्रिया समजली जाते. संबंधमयता समज येते व मन स्तब्ध होते.जर तुम्ही आता फक्त ऐकत असाल,माझ्या बोलण्याचा फक्त मागोवा घेत असाल,मला जे काही सांगायचे आहे ते विशेष कष्ट न घेतल्याशिवाय समजू शकत असाल,तर मग आपल्याला एकमेकांची समज येणे शक्य आहे.  पण जर तुम्ही सारखे टीका करीत असाल, जर तुम्ही सारखे आपली मते मांडीत असाल, जर तुम्ही पुस्तकात काय वाचले ते सांगत असाल, फलाणा काय म्हणतो त्याला अनुसरून सारखे दोष देत असाल,टीकात्मक असाल,तर तुमच्या व माझ्यामध्ये खरे नाते निर्माण झालेले नाही. आपण संबंधमय नाही .कारण हा वरील पडदा दोघांमध्ये सतत आहे.जर आपण दोघेही, समस्या सोडविण्याला, त्याच्या तळापर्यंत बुडी मारण्याला, त्याचे या समस्येतच असलेले उत्तर शोधण्याला,सत्य हुडकून काढण्याला,सत्य शोधण्याला,सत्य पाहण्याला, उत्सुक असू तर आपण निश्चितच संबंधमयतेत आहोत .तरच तुमचे मन तत्पर पण गतिशून्य आहे .ते यातील सत्य पाहण्याचा प्रयत्न करीत आहे . तुमचे मन असामान्य चपळ पाहिजे.तुमच्या स्वतःच्या अनुभवातून निर्माण झालेल्या अशा,कुठच्याही ध्येय आदर्श न्याय कल्पना इत्यादींनी ते भरलेले असता कामा नये .ते जखडलेले असता कामा नये . तरल तत्पर चपल असे मन जेव्हा गतिशून्य जागृत असते तेव्हा समज येते. तेव्हाच ते ग्रहण करण्याला समर्थ असते.तेव्हाच ते खरे संवेदनाक्षम असते.जे मन कल्पना मते पूर्वग्रह मग ती कुठचीही व कुठच्याही बाजूकडील असोत यांनी भरलेले असते ते मन संवेदनाक्षम नसते.

संबंधमयता समजण्यासाठी गतिशून्य जागृतता पाहिजे.त्यामुळे संबंध मयता नाश पावत नाही.उलट त्यामुळे संबंधमयता जास्त जिवंत व जास्त महत्त्वपूर्ण बनते.अशा संबंधमयतेध्ये खरा जिव्हाळा, खरे प्रेम,जवळीक, भावना, आपुलीक व ऊब, असण्याचा संभव असतो .ही केवळ एक संवेदना किंवा भावना नाही .जर आपण अशा प्रकारे प्रत्येक संबंधमयतेकडे जाऊ, किंवा अशा प्रकारे प्रत्येक संबंधमयतेमध्ये आपण असू .तर मग मालमत्ता समस्या, संग्रह समस्या, वगैरे वगैरे जास्त सहज सोडविल्या जातील. ज्याचा आपण संग्रह करतो तेच आपण असतो. जो मनुष्य पैसा बाळगतो तो पैसाच असतो . जो मनुष्य मालमत्ता घर फर्निचर इत्यादीशी समरस होतो तो तोच असतो .त्याचप्रमाणे जो लोक जात धर्म समाज प्रांत राष्ट्र कल्पना इत्यादीशी समरस होतो तो तोच असतो .जिथे जिथे संग्राहकता आहे तिथे तिथे संबंधमयता नसते. आपल्यापैकी बहुतेक जण काही ना काही घट्ट धरून बसतात .जर आपण काहीच घट्ट धरले नाही तर आपण काहीच नसतो .नंतर आपण केवळ एक पोकळ शिंपला असतो .म्हणून ही पोकळी आपण गायन,कल्पना, मालमत्ता,धर्म,ज्ञान,इत्यादिकांनी भरून काढतो.मग हा शिंपला खूप गडबड करण्याला सुरुवात करतो .त्या गडबडीला आरडाओरडीला आपण जीवन म्हणतो.त्यात आपण समाधानी असतो .कधी तरी त्यात विसंवाद निर्माण होतो .अकस्मात काहीतरी निघून जाते .सोडून जाते मोडते तुटते फुटते हरवते . तेव्हा त्याला आपण दुःख म्हणतो.मग अकस्मात तुम्हाला आपण अर्थ नसलेला केवळ एक पोकळ शिंपला आहोत याची जाणीव होते.याचा शोध लागतो .संबंधमयतेच्या सर्व गाभ्याबद्दल जागृत असणे म्हणजेच क्रिया होय .त्या क्रियेमधून सत्य संबंधमयता निर्माण होण्याची, स्वखोली समजण्याची ,त्याचे महत्त्व लक्षात येण्याची,व प्रेम म्हणजे  काय हे कळण्याची शक्यता असते.

मला उमजलेले कृष्णमूर्ती

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
प्रश्न १: चालू संकटाविषयी प्रश्न २: राष्ट्राभिमानाविषयी प्रश्न : अध्यात्मिक गुरू आवश्यक आहे काय ? प्रश्न ४: ज्ञानाविषयी प्रश्न ५: शिस्तीविषयी प्रश्न ६: एकाकीपणाविषयीं प्रश्न ७: क्लेशाविषयी प्रश्न ८: जागृततेविषयीं प्रश्न ९: संबंधमयतेविषयीं प्रश्न १०: युद्धाविषयी प्रश्न ११: भीतीविषयी प्रश्न १२ प्रश्न १३: द्वेषाविषयीं प्रश्न १४: रिकामपणच्या बडबडी विषयी प्रश्न १५: टीकेविषयी प्रश्न १६: परमेश्वरावरील श्रद्धेविषयीं प्रश्न १७: स्मरणाविषयी प्रश्न १८: जे काहीं आहे त्याला शरण जाणे प्रश्न १९: प्रार्थना व ध्यान या विषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २०: प्रकट व सुप्त मनाविषयी प्रश्न २१: लैंगिक भुकेविषयी प्रश्न २२: प्रेमाविषयी प्रश्न २३: मृत्यू-विषयीं प्रश्न २४: कालाविषयी प्रश्न २५: कल्पना विरहीत कर्म प्रश्न २६: जुने व नवे प्रश्न २७: नामकरणाविषयीं प्रश्न २८: ज्ञात व अज्ञात याविषयी प्रश्न २९: सत्य व असत्य प्रश्न ३०: परमेश्वराबद्दल प्रश्न ३१: तत्काळ मुक्ती विषयी प्रश्न ३२: साधेपणा विषयी प्रश्न ३३: उथळपणाबद्दल प्रश्न ३४: क्षुद्रतेबद्दल प्रश्न ३५: मनाच्या शांततेविषयीं प्रश्न ३६: जीवनाच्या अर्थाविषयी प्रश्न ३७: मानसिक गोंधळाविषयीं प्रश्न ३८: बदलाविषयीं लेखकाचे मनोगत