Get it on Google Play
Download on the App Store

पाचवी नोंद

डायरी, तारीख २६ मे १९९१

दुसरा दिवस

वेळ रात्री १२.२५ वाजता

आज मी जे पाहिले ते मी दुसऱ्याच्या तोंडून ऐकले असते तर कदाचित माझा त्यावर विश्वास बसला नसता. देवाने निर्माण केलेल्या जगाला माणूस आपली निर्मिती मानतो, पण तसं नाहीये, आज मी जे काही पाहिलं त्यामुळे माझ्या विचारांची दिशाच बदलून गेली, जवळजवळ  तासभर मी भीतीने थिजून खोलीच्या एका कोपऱ्यात बसले, दार आतून बंद केले आहे तरी दारापाशी यायची हिम्मतही होत नाहीये, स्वीचबोर्ड दाराजवळच आहे. म्हणून इथे एका कोपऱ्यात मेणबत्तीच्या उजेडात लिहित आहे.

काही वेळापूर्वी मी डायरी टाकून खोलीबाहेर गेले तेंव्हा भांडी आणि दार जोरात आपटून वाजण्यामागचे कारण काय होते हे मला जाणून घ्यायचे होते. मला सगळे पूर्वीसारखंच सामान्य वाटत असलं, तरी हा सर्व एक व्यर्थ भास असावा असे मानून मी खोलीकडे वळू लागले, तेवढ्यात मला कोणाच्या तरी वेदनादायक किंकाळ्यांचा आवाज आला. जणू कोणीतरी कोणालातरी खूप बेदम मारत आहे, खूप दबलेला आणि दु:खी आवाज येत आहे,  तो आवाज ऐकून माझे हृदय खूप जोरात धडधडत आहे,

आजही परिस्थिती फारशी वेगळी नसली तरी, हे मी काय बळ एकवटून लिहित आहे हे फक्त मलाच माहीत आहे, पण माझ्या ओळखीच्या आणि ही डायरी वाचणाऱ्यांपर्यंत ही बाब पोहोचली पाहिजे असे मला वाटते.

मी आवाजाच्या दिशेने चालायला लागले तेव्हा वरच्या मजल्यावरून आवाज येत होता. पायऱ्या चढून वर गेल्यावर आवाजाच्या जवळ आल्यासारखे वाटले. प्रत्येक क्षणासोबत अत्याचार वाढत चालले होते आणि कोणाच्या तरी हृदयातून वेदनादायक किंकाळ्या उमटत होत्या.

हळुहळू मी थरथरत थरथरत पायऱ्या चढत होते पण जसजसे मी वर पोहोचत होते तसतसे मला जाणवत होते की माझ्या पायाकडे रक्त वहात येत आहे. माझे पाय खूप थरथरत होते, पण तरीही कोणास ठाऊक काय कारण होते जे मला त्या वेदनादायक आवाजांकडे खेचत नेत होते.

मला वरच्या जमिनीवरच्या धुळीवर कोणाच्या तरी पावलांचे ठसे दिसले, तसेच भांडे ओढून नेल्याच्या खुणा एका दाराकडे दिसल्या. मी त्या दारात पोहोचले तोपर्यंत अचानक किंचाळणे बंद झाले. दरवाज्याजवळ जाऊन मी कीहोल मधून पाहण्याचा प्रयत्न केला, पण काहीच दिसत नव्हते. काही क्षणांनी आत आणखी एक दरवाजा असल्यासारखे वाटले.

मी हळूच हा दरवाजा ढकलला आणि आतल्या दरवाज्याकडे निघाले, आतल्या त्या दाराच्या किहोल मधून मी डोकावले, आतले काही नीट दिसत नव्हते पण जे दिसले ते माझ्या हृदयाला हेलावून सोडण्यासाठी पुरेसे होते.

मांसाने भरलेले तेच भांडे समोर ठेवले होते. दोन भयानक कुरूप हात त्यातून मांसाचे तुकडे बाहेर काढत होते. कोणीतरी ते तुकडे चघळत होते आणि मांस चावण्याचा आवाज येत होता. मला मळमळ होऊ लागली आणि आता तिथे राहण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती. मी आल्या पावली परत गेले. काय भयंकर प्रकरण होते ते? दोन दिवसांपासून मी कुठे आणि का थांबले आहे? मला काहीच समजत नव्हते.मी धावत खोलीत गेले आणि जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला आणि कोपऱ्यात बसले माझे हृदय खूप जोरात धडधडत होते. मी मन शांत करण्याचा प्रयत्न केला.

आता त्या घटनेला दोन तासांहून अधिक काळ लोटला आहे.

पण एक विचित्र गोष्ट अशी आहे की मी डायरी उघडताच माझ्या आधीच्या नोंदी  पुढे  कोणीतरी विचित्र भाषेत लिहिले आहे,

“!ereh morf og"

इंग्रजी दिसते पण या गोष्टीचा अर्थ समजत नाही. "इरेह मॉर्फ ऑग" शेवटी, काय असू शकेल  याचा अर्थ? आणि मेणबत्ती जवळपास विझत आली आहे, आजची डायरी इथेच संपवण्याशिवाय पर्याय नाही.