भाग -१२
मग अचानक ती स्त्री पंख्याला उलटी लटकली आणि टफी धावत सोनियाकडे आला. मग त्या स्त्रीने पंख्याला उलटे लटकून झोका घ्यायला सुरुवात केली. हे भयानक दृश्य पाहून सगळेच घाबरले होते.
सोनिया म्हणली, "मी समोरच्या खोलीतून बाहेर बाग पाहिली आहे, तिकडे पळून जाऊया."
इतक्यात ती बाई अचानक छतावरून वेगाने धावत सुटली. ते सगळे जोरजोरात ओरडायला लागले आणि कानावर हात ठेवून आणि डोळे बंद करून बसले.
ती बाई बराच वेळ चारी बाजूंनी वेगाने धावत राहिली आणि मग पंख्यावर जाऊन बसली. ती तिच्या घाणेरड्या हातांवरच्या मोठ मोठ्या नखांनी स्वतःला बोचकारू लागली. मग चालत चालत ती पंख्यांखाली आली आणि जोर जोरात हसू लागली. त्या सगळ्यांची अवस्था बिकट झाली होती. त्यांना काय करावे समजत नव्हते.
इतक्यात पायऱ्यांवरून ठक ठक असा आवाज येऊ लागला आणि एका खोलीची खिडकी उघडली. त्या खिडकी मधून फाटका फ्रॉक घातलेली एक लहान मुलगी आत आली तिचे केस मोकळे होते आणि गळ्यात एक हाडांचा सांगाडा लटकलेला होता. कदाचित मांजरीचा असावा. टफी जोरजोरात भुंकायला लागला. ते सर्व उभे राहून एकमेकांकडे बघू लागले आणि आता काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला.
घामाने भिजलेली सोनिया पुढे होऊन त्या मुलीकडे जाऊ लागली. इतक्यात दुसऱ्या खोलीतून ऑर्गन वाजवण्याचा आवाज येऊ लागला आणि ते सर्व एकमेकांकडे बघून देवाचे नाव घेऊ लागले. ऑर्गनच्या आवाजावरून आकांक्षाला वाटतं की हि धून तिचा नवरा वाजवतोय.
"आशिषsss" असे म्हणत ती दुसऱ्या खोलीच्या दिशेने धावत गेली,
"आई, थांब कुठे चालली आहेस? सोनिया आकांक्षाला म्हणाली आणि सगळे आकांक्षाला फॉलो करत तिच्या मागे धावले.
खोलीतून ऑर्गनचा आवाज येत होता, आकांक्षाने थरथरत्या हातांनी हळूच दार उघडले आणि सोनियाला म्हणाली
“तुझे वडील असे ऑर्गन वर हीच धून वाजवत असत.”
मग तिने समोर पाहिलं तर खोलीत खूप अंधार होता काहीच दिसत नव्हते. पण ऑर्गन वाजवण्याचा आवाज येत होता. इतक्यात कंदिलाचा प्रकाश पडला आणि सगळ्यांनी मागे वळून पहिले तर ती चिमुरडी कंदिल हातात घेऊन समोर उभी होती. सगळे खूप घाबरले होते आणि एका बाजूला उभे होते. तेव्हा आकांक्षा धीर एकवटून म्हणाली
"बाळा, तू कोण आहेस?"
मग अचानक ती मुलगी गायब झाली. आकांक्षाला धक्का बसला आणि ऑर्गनच्या आवाजाने तिचे लक्ष विचलित झाले.