Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ३

मग रात्र झाली..

आकाश पावसामुळे अधिकच गडद झाले होते आणि घरामध्ये पावसाची झड येऊ नये म्हणून आम्ही  खिडक्या घट्ट बंद केल्या होत्या त्यामुळे आत आणखीनच कोंदट आणि अस्वस्थ  वाटू लागले. बाहेरून रो रो करत वाहणाऱ्या वाऱ्याने अनेक वेळा खिडक्यांचा खडखडाट केला, त्यामुळे क्षणभर काय झाले असे वाटल्यामुळे मनात उगाच थोडीशी भीती उत्पन्न होत होती.

शेंद्री या बंद खिडक्यांपैकी एका खिडकीपाशी बसून अंधारात निर्विकार नजरेने बघत होता आणि आम्ही दोघे कुठे आणि कसे झोपायचे या विषयावर चर्चा करू लागलो. शेवटी त्याच्यासाठी बाहेरच्या खोलीत एक गादी घालू  असे ठरले, कारण घरात आमच्या बेड शिवाय दुसरा पलंग नव्हता. ज्योत्स्ना त्याला बाहेरच्या खोलीत घेऊन गेली आणि तिने त्याला थोपटून झोपवले. मी ज्योत्स्ना आमच्या खोलीत परत येण्याची वाट पाहत घड्याळाच्या सेकंद काट्याकडे बघत बसलो होतो.

ती आल्यावर मी तिला विचारले, "तो झोपला का?"

“हो” ती म्हणाली. "तो खूपच गोड मुलगा आहे जरादेखील किरकिर केली नाही.”

"व्हेरी गुड."

ज्योत्स्ना म्हणाली, "तो कोठून आलाय कोण जाणे. त्याच्या घरचे चिंतेत असतील ना? तुला उद्या पोलिस स्टेशनला जायला लागेल, बरं का?"

"हो, जावच लागेल त्याची इच्छा असो किंवा नसो” मी देखील  होकार दिला.

"आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही."

त्या रात्री ज्योत्स्नाने दिवे मालवल्यावर लगेचच आम्ही झोपलो. शांत आणि थंड वातावरणामुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली.

कदाचित रात्र अर्धी निघून गेली होती मी ज्योत्स्नाचा आवाज ऐकला.

तसा मी झोपेतच होतो काय झालं  पाहण्यासाठी मी कूस बदलली तेव्हा ती दूरवर एक आकृती आमच्याकडे पाहत बेडवर बसून होती.

“काय-” म्हणून मी विचारलं आणि कोण आहे हे बघायला जरा मान वळवली आणि मी चमकलो.

तो मुलगा, शेंद्री, आमच्या पलंगावर आमच्या पायाशी बसून आमच्याकडे एकटक नजरेने पाहत होता.

त्या क्षणी, तो एका दगडाच्या पुतळ्यासारखा भासत होता, जणू काही त्याच्यात आत काहीच जीव नसावा.

"काय रे शेंद्री?" शेवटी धीर एकवटून मी विचारले.

पण मुलगा काही जागचा हलला नाही. मला एकच आवाज ऐकू येत होता तो म्हणजे ज्योत्स्नाच्या घोरण्याचा. मी अंगावरून ब्लँकेट काढले आणि त्याच्याकडे गेलो. त्याला खांदा धरून मी त्याला हलवले. "काय रे?" मी परत विचारलं.

मग त्याने अनेक वेळा डोळे मिचकावले.

“धन्यवाद, सर आणि मॅडम,” तो म्हणाला. "फक्त असे सांगायचे होते की तुम्ही खूप छान आहात."

हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले नाही. त्याच्या डोळ्यात चमकसुद्धा नव्हती. फक्त त्याचे ओठ हलले आणि आवाज त्याच्या घशातून खोल कुठून तरी आला.

मग हळूच मी त्याचा हात धरला आणि म्हणालो, "ठीक आहे. पण आता झोपायला हवं. ये" आणि मी त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेलो.