Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ७

ज्योत्स्ना त्याच्या प्रेमात झपाट्याने वेडी होत चालली होती आणि मी मात्र त्यानंतर त्याच्यासोबत एकटे राहण्यास नकार दिला. तिने मला एक दिवस सांगितले

"तो आपलाच मुलगा आहे हो आपल्याकडे परत आला आहे. तुम्हाला ओळखता येत नाही का?"

"मुर्ख बाई!" मी ओरडलो. "मेलेली माणसे परत येत नाहीत."

“अहो जरा त्याच्या गोड निरागस चेहऱ्याकडे पहा! तो माझ्यासारखाच आहे ना? तो माझा मुलगा आहे. मी त्याची आई आहे. मला ठाऊक आहे. त्याला माझ्यापासून कोणीहि हिरावून घेऊ शकत नाही.”

"तो आपला मुलगा नाही आहे!" मी परत ओरडलो, मी माझे हात माझ्या दोन्ही कानांवर ठेवले आणि बाहेरच्या खोलीत निघून गेलो. पंख्याखाली उभा होतो तरी मला दरदरून घाम फुटला होता. माझ्या हृदयाचे ठोके जलद झाले होते.

आणि त्या संध्याकाळी, पुन्हा तेच घडले. मी पेपरातला एक विशेष मनोरंजक लेख वाचण्यात मग्न झालो होतो जेव्हा मला अचानक माझ्या शेजारी अगदी जवळ जोरजोरात श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकू आला. मी डोळे वर केले आणि चरकलो. तो मुलगा माझ्या शेजारी सोफ्यावर बसला होता, अगदी इतका जवळ कि त्याच्या बसण्यामुळे मला अवघडल्यासारखे वाटत होते.

"तुम्हाला मी आवडत नाही?" त्याने विचारले. "तुम्हाला मी का नाही आवडत? मला वाटले की तुम्ही खूप छान आहात."

हे काही लहान मुलाचे बोल नव्हते. आवाज त्याचाच होता, पण त्याच्या बोलण्या मागची उत्कटता ही एखाद्या प्रेमभंग झालेल्या वेडसर प्रियकराची आहे असे वाटले. त्याला उत्तर द्यायला मला शब्दच सापडत नव्हते.

"का सर?," तो म्हणाला. "तुम्ही मला माझ्या आईजवळ का राहू देत नाही?"

मग तो माझ्या आणखी जवळ आला, त्याचा छोटासा पण कातळासारखा कोपर त्याने माझ्या मांडीत खुपसला.

"हे माझंही घर आहे, तुम्हाला माहीत आहे का?" त्याचे बोलणे पुढे सुरु राहिले. "आतापर्यंत हे का लक्षात आले नाही तुमच्या सर?"

"क...कोण... तुझी आई कोण आहे?" मी विचारले, माझे इतके दिवस लपवून ठेवलेले विचार शब्दात रूपांतरित झाले.

"माझी आई एक चेटकीण आहे. एक अतिशय छान चेटकीण. ”

त्या क्षणी मी पुन्हा काही बोलणार इतक्यात ज्योत्स्ना बाथरूममधून बाहेर आली आणि सोफ्यावर त्या मुलाच्या शेजारी बसली आणि कापऱ्या आवाजात ती म्हणाली, “तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. हा एक आनंदाचा क्षण आहे, नाही का?"

तिने मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. मी ते स्मित पाहिले आणि ते किती समान आहेत हे पाहून मला भीती वाटली, परंतु त्यांचे डोळे ज्या प्रकारे बदलले ते मला अधिक भीतीदायक वाटले. पुन्हा तेच घडत होतं आणि यावेळी ज्योत्स्नाचे डोळेसुद्धा त्या मुलाच्या बरोबरीने काळे झाले आणि त्यांच्या दोघांच्या चेहर्‍यावर एक विचित्र हास्य उमटले, जे एखाद्या छायाचित्रात दिसते त्याप्रमाणे गालावर गोठले होते.

त्या क्षणी, ढगांचा गडगगडाट आणि विजेचा कडकडाट झाला. पुढे काय झाले मला कळलेच नाही.