Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ८

नंतर त्याच रात्री मी ज्योत्स्नाच्या बाजूला झोपलेला होतो. मध्यरात्री मला जाग आली. मी बेडरूममधून बाहेर पडलो आणि शेंद्री ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीत गेलो. घरात लपलेल्या सावल्यांपेक्षाही अलगद आवाज न करता मी हळूच त्याच्या खोलीच्या दारापाशी आलो आणि ढकलून ते उघडले.

शेंद्री काही साधेसुधे प्रकरण नव्हते. एकदा रुळला कि घरातला उंदीर काही उपाय करा घरातून चटकन निघत नाही तसंच होत त्याचं. मी ठरवलं होतं झोपेतच डाव साधायचा आणि त्या सैतानाचं अस्तित्त्व संपवून टाकायचं.

त्यासाठी मी आमच्याकडे असलेली महात्मा गांधींची पितळ्याची मूर्ती शोकेस मधून हातात घेतली होती. किती हि विसंगती हिंसक कृत्य करण्यासाठी आज मला अहिंसेच्या महान पुजाऱ्याच्या मूर्तीची मदत घ्यावी लागणार होती. संकटात सापडलेला सामान्य माणूस अनेकदा आपले सिद्धांत बाजूला ठेवून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. मीही तेच करत होतो.

पण नियतीच्या मनात काहीतरी निराळेच होते. कारण मी दार ढकलले तेव्हा मुलगा झोपेत नव्हता. तो गादीवर बसला होता, त्याचे डोळे गंभीर नजरेने दाराकडे टक लावून पाहत होते. बहुतेक तो माझीच वाट पहात होता.

अंधार असूनही मला त्याच्यातल्या काळ्या छायेची जाणीव होत होती.

मग तो माझ्याकडे पाहून तिरस्कृतीपूर्ण हसला. तेच हास्य जे मला अनेक दिवसांपासून झोपू देत नव्हते. आणि त्याच्या चेहऱ्या वरचे निरागस भाव आता नाहीसे झाले होते आणि एक दुष्ट परिपक्व सैतान माझ्याशी बोलत होता.

“ तुम्ही इथे काय करताय सर?”

आणि मला काही कळायच्या आत त्याने मोठ्ठा आ केला आणि त्यातून एक भयंकर किंचाळी बाहेर पडली. ती किंचाळी इतकी भयंकर होती कि तिच्या आवाजाने मृत शरीर सुद्धा घाबरून जाईल आणि कबरीतून उठून बसेल.

मी मागे वळून पहिले ज्योत्स्ना माझ्याच मागे उभी होती.आणि त्या दोन सैतानांमधील नाते अधिकच स्पष्ट झालं. खोलीत आजीबात वारा नव्हता तरी तिचे कुरळे केस हवेत उडत होते. तिचे डोळे शेंद्री सारखेच काळे झालेले दिसत होते. तिने हसण्यासाठी तोंड उघडले आणि एक गलीच्छ उग्र दर्प तिच्या तोंडातून बाहेर पडला आणि खोलीत पसरला. इतक्या वर्षाच्या सहवासात मला माझी बायको इतका तिटकारा येण्यासारखी बीभत्स रुपात कधी दिसेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते..

आणि पुढच्याच क्षणाला ती जमिनीवर कोसळली.

खेळ खल्लास.

माझ्या हातातली ज्योत्न्साच्या रक्ताने माखलेली पितळ्याची गांधीजींची मूर्ती आणि तिच्या टाळूवर  पडलेली भली मोठी खोक इतके पुरावे मीच खून केला हे सिद्ध करायला पुरेसे होते.

हे सगळे घडून येत असताना. शेंद्री कधी माझ्या जवळ आला तिच्यावर त्याने कधी वार केला आणि कधी एखाद्या डोम कावळ्याप्रमाणे तो काही खिडकीची काच फोडून बाहेर उडून गेला ते मला कळलेच नाही.