Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ५

मी घरी परतल्यावर शेंद्री ज्योत्स्नाबरोबर किचनमध्ये मटार सोलत बसलेला होता. त्याने नवीन टीशर्ट आणि जीन्स घातली होती . मी तीला डोळ्यांनीच प्रश्न केला.

ज्योत्स्ना म्हणाली, “आम्ही शॉपिंग करून आलो. मस्त दिसतोय न तो?"

तिच्या स्वरात एक विलक्षण उत्साह होता. मग त्याने आईस्क्रीम मागितले आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता त्याला आईस्क्रीम आणून दिले.

आईस्क्रीम? ते आधी कधी फ्रीजमध्ये असल्याचं आठवत नाही. तिने आमच्यासाठी, माझ्यासाठी ते कधीच विकत आणलं नव्हतं.

माझ्या तेव्हाच लक्षात यायला हवे होते कि माझी प्रिय पत्नी त्या भ्रामक ममतेच्या धोकादायक जगात प्रवेश करत होती कारण हे मूल आमचं नव्हतं आणि हे असे अजिबात व्हायला नको होतं.पण मला तेव्हाच तिच्या आनंदावर विरजण घालायचे नव्हते तसे करणे क्रूर वाटले असते. नवीन लागलेला नाद सोडणे फार कठीण असते. पण त्याचा अतिरेक झाला तर त्याचा कंटाळा येऊ लागतो आणि त्यातला गोडवा संपत जातो. त्यामुळे मी ते जसे चालू होते तसे पुढे जाऊ द्यायचे असे ठरवले.

मग ते मुल माझ्याकडे पाहून हसले, पण मी त्याच्या गोड हसण्याला आजीबात प्रतिसाद दिला नाही. मी सरळ आमच्या खोलीत गेलो, फ्रेश झालो, कपडे बदलले आणि पुन्हा जेवणासाठी बाहेर आलो.

मी बाहेर आलो तेव्हा तो मुलगा पुन्हा टेबलावर दिसला, पण यावेळी तो कालच्या  तुलनेत अधिक रुळलेला वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुष्ट भाव मला स्पष्ट जाणवले. ज्योत्ना प्रेमाने त्याला एक एक पदार्थ त्याच्या ताटात वाढत होती आणि तो कालच्या प्रमाणे संकोच करत नव्हतं हे माझ्या नजरेतून सुटले नव्हते.

इतक्या वर्षांत प्रथमच, ज्योत्स्ना आणि मी एकत्र जेवताना कोणतेही संभाषण केले नाही. हे मला खटकले, कारण मी अनेक वेळा काही बोलण्यासाठी तोंड उघडले तेव्हा तेव्हा मला दिसले की तिचे लक्ष माझ्याकडे नाही तर त्याच मुलाकडे आहे ज्याला मी भावनेच्या आहारी जाऊन क्षणभर विचारही न करता घरी आणले होते.

आणि म्हणून मी भूक लागल्यावर जेवायचं म्हणून चार घास पोटात ढकलले. घरात मी होतो पण माझ्या पत्नीने मला असून नसल्यासारखी वागणूक दिली होती इतका विचित्र आपण एकटे पडल्याचा अनुभव आज मी प्रथमच घेतला होता.