Get it on Google Play
Download on the App Store

साक्षीदार (प्रकरण ७)

 

साक्षीदार 

प्रकरण ७

 

 पाणिनी पटवर्धन गाढ झोपलेला असताना त्याचा  लँड लाईन फोन वाजला. फोनवर ईशा अरोरा बोलत होती “,थँक्स तुम्ही फोन उचलला मी ईशा बोलते आहे  तुम्ही ताबडतोब गाडीत बसा आणि या” ती म्हणाली.

 पाणिनी पटवर्धन चा आवाज एकदम झोपाळलेल्या आला.

“या म्हणजे कुठे या ?आणि काय झालं एकदम?” पाणिनी ने विचारलं

“अहो काहीतरी भयानक घडलंय.” ती म्हणाली. “आणि ऐका घरी येऊ नका मी घरी नाहीये.

” “मग कुठे आहात तुम्ही?”

“ मी कोपऱ्यावरच्या एका औषधाच्या दुकानात आहे तुम्हाला तिथे मोठे  फ्लड लाईट लागलेले दिसतील औषधाच्या दुकानात. तिथं मी त्याच्या समोरच उभी आहे” ती म्हणाली.

“ ऐकून घे, मी यापूर्वी असे रात्रीचे फोन अनेक वेळा घेतलेत. बरेच लोक मला असा फोन करून फसवायचा विचार करतात. मला खात्री करून घ्यायला हवी की माझ्याशी नक्की कोण बोलताय याची.”  पाणिनी म्हणाला

 ती पलीकडून जोरात किंचाळली. “तुम्ही अतिसावध असल्याचे दाखवू नका. खरंच इकडे या मी खूप अडचणीत आहे, खूप गंभीर अडचणीत आहे. आणि माझा आवाज तुम्हाला ओळखत नाही का?”

 पाणिनी पटवर्धन तेवढाच शांत होता. “हो मला माहित्ये तुझा आवाज पण पलीकडून हुबेहूब आवाज काढून बोलू शकतो ना ! मला एक सांग तू पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा आलीस तेव्हा तू तुझं नाव काय आहे असं मला सांगितलं होतंस?”

“ईशा गरवारे” ती म्हणाली.

 

“ठीक आहे मी येतो लगेच.”  पाणिनी म्हणाला त्याने पटकन कपडे घातले आपलं रिव्हॉल्वर खिशात टाकलं रात्री-अपरात्री जातो आहे उगाच धोका स्वीकारायला नको म्हणून रिव्हॉल्वर असलेलं बरं. त्याने विचार केला. बाहेर खूप पाऊस पडत होता त्याने आपला रेन कोट आणि टोपी घातली आणि गाडीत बसला थोड्याच वेळात तिने सांगितलेल्या पत्त्यावर तो आला त्यांनी बघितलं तर ती त्या औषधाच्या दुकानाच्या बाहेर उभी होती तिने  अंगात जर्कीन  घातलं होतं  पण  तो रेन कोट नव्हता.  डोक्यात टोपी  नव्हती. पावसाच्या पाण्याने ओली चिंब भिजली होती. त्यानं तिच्याजवळ गाडी आणून थांबवली ती त्याला सामोरी गेली.

“ मला वाटलं तुम्ही येणारच नाही” त्याच्या जवळ  येत ती म्हणाली. ती त्याच्या गाडीत बसली. पाणिनी ने  बघितलं तर तिनं  एका पुरुषाच जर्कीन  घातलं होत. सॅटीन बूट होते आणि  आत गाऊन. तिच्या अंगावरून पाणी निथळून त्याच्या कारमध्ये पडत होतं

“ काय झालं एकदम? काय प्रॉब्लेम आहे ?” त्याने विचारलं.

“ माझ्या नवऱ्याचा खून झालाय !” ती एकदम  किंचाळून म्हणाली. “पटकन गाडी सुरू करा” आज बसत ती म्हणाली.

“ नाही”   पाणिनी म्हणाला “जरा त्याबद्दल थोडं सविस्तर सांग.”

“ पोलिस घरी पोहोचण्यापूर्वी आपल्याला तिथे पोहोचायला हवं “ती एकदम म्हणाली.

पाणिनी ने  नकारार्थी मान हलवली. एकदम शांतपणे. “मला जोपर्यंत वस्तुस्थिती काय आहे ते सविस्तर समजत नाही तोपर्यंत  तू किंवा मी कोणीच पोलिसांशी बोलणार नाही”  पाणिनी म्हणाला

अहो फार भयानकच होत ते सगळं” ती एकदम तो प्रसंग आठवून भारल्यासारखी म्हणाली.

“कुणी मारलं त्याला?” पाणिनी पटवर्धन न विचारलं

“ मला माहित नाही” ती म्हणाली

“ बर मग तुला माहित तरी काय आहे? पाणिनी नं विचारलं

“नक्की काय झालं ते समजलं नाही पण मला वाटतं कोणतरी त्याच्या बरोबर बोलत होतं ज्याला तो ब्लॅकमेल करत होता त्यापैकी एक कोणीतरी होता. मी त्यांचा आवाज ऐकत होते वरच्या मजल्या वरून येणारा. एकमेकांची खूप रागावून बोलत होते दोघेही. मग मी जिना चढून वर गेले ऐकायला ते काय बोलतात ते.”

“ त्यांचे शब्द ऐकू येत होते का तुला?” पाणिनी ने विचारलं

“ नाही काय बोलत होते ते कळत नव्हतं फक्त काहीतरी बोलतात एवढं कळत होतं. पण मला हे जाणवत होतं की ते दोघेही एकमेकांच्या समोर दोषारोप करत आहेत. माझ्या नवऱ्याचा आवाज मात्र नेहमीसारखा थंड आणि कडवट असा येत होता. तो जेव्हा एखाद्याशी सर्व शक्तीनिशी लढतो ना तेव्हा त्याचा असाच थंड आवाज येतो. मी... मी दुसऱ्या माणसाचा आवाज ऐकला. तो  मात्र एकदम खडा होता. पण तो चढा नव्हता. तो अधून मधून माझा नवरा जे बोलत होता त्याच्या मध्येच बोलून त्याला व्यत्यय आणत होता.” तिने माहिती दिली “मग पुढे काय झालं?” पाणिनी ने विचारलं

“नंतर मी वरच्या मजल्यावर जाऊन एका ठिकाणी लपून काय बोललं जात होतं ते ऐकायचा प्रयत्न केला.”

“ बर, पुढे  काय केलस तू?”

“ तेवढ्यात मी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला आणि त्यानंतर कोणीतरी खाली पडल्याचा आवाज.”

“ एकदाच गोळीबार झाला?” पाणिनी ने विचारलं

“ हो फक्त एकच शॉट आणि नंतर एखादं शरीर खाली पडण्याचा आवाज. फारच भयानक होत ते सगळं” ती घाबरून उद्गारली.

“ बर पुढे काय झालं? तू काय केलंस?”

“ नंतर मी एकदम तिथून पळून गेले. फार घाबरले होते मी.” ती म्हणाली

कुठे गेलीस तू?”

“ मी माझ्या खोलीत गेले.” ईशा म्हणाली.

“कोणी तुला बघितलं नाही?”

“ मला नाही वाटत तसं.”

“ पुढे काय केलस तू?” पाणिनी ने विचारलं

 “तिथे एक “दोन मिनिटे थांबले.”

“ तेव्हा तुला काही ऐकू आलं?” पाणिनी ने विचारलं

“ हो.... ज्या माणसांनी पिस्तूल झाडली तो माणूस खाली जिन्यावरून पळत आल्याचा आणि घराबाहेर पडल्याचा आवाज मी ऐकला.”

“ बर पुढे काय झालं?” पाणिनी ने विचारलं

“ नंतर माझ्या मनात आलं की वर जावं आणि दधिची ला  पहावं. आणि काय करता येईल याचा विचार करावा. म्हणून मी वर गेले तर वर मला तो दिसला. नुकतीच अंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आलेला. तिथे खाली पडलेला . मृतावस्थेत खाली पडलेला !”

“ म्हणजे नेमका कुठे पडला होता?” पाणिनी ने विचारलं

“ मला इतकं सविस्तर नका ना सांगायला लावू. ते नाही सांगता येणार मला पण बाथरूमच्या जवळच पडला होता. मी सांगितलं त्याप्रमाणे नुकताच तो आंघोळ करून बाहेर आलेला दिसत होता. जेव्हा त्यांच्यात वाद झाले , होते तेव्हा तो बाथरूमच्या दारातूनच च बोलत असावा असं मला वाटतं.”

“ तो मेला हे तुला कसं कळलं?” पाणिनी ने विचारलं

“ त्याच्याकडे बघितल्यावर मला कळलं. म्हणजे मला वाटलं की तो मेला आ.हे मला तशी खात्री अशी  नाही. चला आपण जाऊ. मदत करा मला. जर  तो जिवंत असेल तर फारच छान.मग  काही अडचण नाही. जर तो मेला असेल तर आपण सगळेच मोठ्या अडचणीत सापडलो समजा.” ईशा म्हणाली.

“का?”

“ कारण सगळं काही बाहेर येणार आहे तुमच्या लक्षात येत नाहीये का? फिरोज लोकवाला ला  हृषीकेश बद्दल सगळ माहिती आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तो असा विचार करेल की हृषीकेश बक्षी नेच  त्याला मारलं. त्यामुळे बक्षी माझ्या नावाचा उल्लेख करेल आणि मग काहीही घडू शकतं, म्हणजे खुनाचा आळ माझ्यावर सुद्धा येऊ शकतो.” ईशा म्हणाली

“ ते विसरून जा. फिरोज ला हृषीकेश बद्दल माहिती आहे  हे ठीक आहे पण तो  फार कोणी मोठा माणूस नाहीये.ज्या क्षणी फिरोज लोकवाला ला  तुझ्या नवऱ्याचा आधार  मिळणार नाही तेव्हा  तो उभाच राहू शकणार नाही. आणि असा विचार करू नको की तुझ्या नवऱ्याला फक्त हृषीकेश बक्षी च फक्त  मारू शकत होता किंवा फक्त हृषीकेश बक्षी ला  च मारण्याचे कारण होतं. तुझ्या नवऱ्याला मारायला बरेच लोक टपलेले होते.”  पाणिनी म्हणाला.

 

“नाही” ईशा आग्रहपूर्वक म्हणाली. “माझ्या नवऱ्याला मारण्यासाठी  हृषीकेश कडे सबळ कारण होतं. इतर कोणा पेक्षा ते कारण  ठोस होत. याचं कारण मिर्च मसाला हे वर्तमानपत्र कोण चालवतं, मुख्य सूत्रधार कोण आहे याची माहिती फक्त हृषीकेश ला होती. इतर कोणाला नव्हती आणि ही माहिती मिस्टर पटवर्धन तुम्हीच त्याला दिली होती” ईशा म्हणाली 

“ओहो! म्हणजे हृषीकेश  ने तुला हेही सांगितलं होतं तर ! ” पाणिनी पटवर्धन ने  आश्चर्यानं विचारलं

“हो. सांगितलं होतं हृषीकेश ने  मला. पण मिस्टर पटवर्धन तुम्ही त्याच्याकडे कशाला गेला होतात?” युवान विचारलं.

“ मी गेलो होतो ते त्याला फिरायला घेऊन जायला नव्हतो गेलो. मी त्याला माझ्या प्रोफेशनल सर्विसेस देणार होतो आणि त्याच्याबद्दल त्याला विचार करायला लावणार होतो. माझी फी मी तुला द्यायला लावणार  नव्हतो. पाणिनी ने  खुलासा केला.

“ मिस्टर पटवर्धन, तुम्हाला असं नाही का वाटत की ही गोष्ट मी ठरवू शकले असते हृषीकेश बरोबर बोलून? तुम्ही परस्पर का गेलात?” ईशा ने  विचारलं.

“ नाही.तू ठरवू शकली नसतीस”  पाणिनी ठामपणे म्हणाला.

 ईशा काहीतरी बोलायला गेली पण नंतर तिने विचार बदलला

“ ठीक आहे”  पाणिनी म्हणाला.आता ऐक  आणि नीट समजून घे, जर तुझा नवरा मेला असेल तर पोलिसांकडून त्याची  खूप सविस्तर अशी  तपासणी होणार आहे. तुला एकदम तुझं मन खंबीर करावं लागेल. तुला माहित आहे की त्या वेळेला तुमच्या घरात कोण आले असेल?” पाणिनी ने विचारलं.

 

"नाही अशी खात्री देता येत नाही" ईशा म्हणाली.

“ ठीक आहे”  पाणिनी म्हणाला. “तुझं म्हणणं आहे की नेमके शब्द काय उच्चारले जात होते ते तुला सांगता येणार नाही बरोबर?”

“ हो बरोबर” ती म्हणाली “पण त्यांच्या चर्चेचा आवाज मला ऐकू येत होता म्हणजे माझा नवरा आधी बोलत होता नंतर तो माणूस बोलत होता”  ती म्हणाली

“ तू त्या माणसाचा आवाज यापूर्वी ऐकला होतास?”

“हो ऐकला होता”

“ तो कोण होता याबद्दल तू अंदाज करू शकतेस?” पाणिनी न विचारलं

“ हो मी अंदाज करू शकते” ईशा म्हणाली.

“ अशी कोड्यात का बोलते आहेस?  स्पष्ट सांग ना. कोण असू शकतो तो ? मी वकील आहे तुझा. तू मला  सत्य सांगायलाच पाहिजेस”  पाणिनी म्हणाला.

 ती शांतपणे त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली. “मला माहिती आहे तो माणूस कोण होता  ते.”

“कोण होता? तुला माहिती आहे?”

“ हो मला माहिती आहे तो माणूस कोण होता.” ईशा पुन्हा म्हणाली

“मग सांग ना कोण होता?”

 मिस्टर पटवर्धन  तुम्हालाही माहिती आहे तो माणूस कोण होता.”

“ मला मला कसं माहिती असणार ?”संभ्रमात पडून पाणिनी न विचारलं

“ तुम्हाला ते माहीतच असलं पाहिजे पटवर्धन, कारण तो माणूस म्हणजे तुम्ही होतात” ती म्हणाली.

“काय?” पाणिनी ओरडला. “ तू काय बोलते आहेस समजतंय का तुला?”

“ मला सांगायचं नव्हतं तुम्हाला.” ती म्हणाली. “ मला माहिती आहे हे सुद्धा तुम्हाला कळू द्यायचं नव्हतं.तुमचं हे रहस्य मला गुप्त ठेऊन तुम्हाला मी संरक्षण देऊ इच्छित होते.पण तुम्ही माझ्या कडून ते काढून घेतलंत.पण मी वाचन देते की मी हे कोणालाही सांगणार नाही.आपल्या दोघातच राहील हे.”

“ आता मला कळलं काय प्रकारची बाई आहेस तू.सौम्या ने मला सावध केल होतच.” पाणिनी स्वतः शीच पुटपुटला.

“ तू नंतर गाडी सुरु झाल्याचा आवाज ऐकलास ? तो माणूस बाहेर पडल्यावर?” पाणिनी ने विचारलं.

“ तुम्ही बाहेर पडल्यावर?” ईशा ने विचारले.

“ तो माणूस बाहेर पडल्यावर.” पाणिनी म्हणाला.

“ मला वाटत की ऐकला मी.पण बाहेर पाऊस आणि वादळाचा आवाज एवढा होता की नीट ऐकू आला नाही.”

“ तू निराश झाल्येस आणि तुझा ताबा सुटलाय स्वतः वरचा.जेव्हा सीआयडी अधिकारी तुझ्या मागे प्रश्नांचा भडीमार करतील तेव्हा तू अडचणीत येशील.माझा सल्ला आहे तुला की एकतर तू डॉक्टरांचा सल्ला घे,म्हणजे तो  कोणाला ही तुझ्याशी बोलू देणार नाही.किंवा मग तुला तुझी हकीगत अशा पद्धतीने सांगावी लागेल की त्यात कोणतेही कच्चे दुवे नसतील. ”  पाणिनी म्हणाला. “ तर मग तू गाडीचा आवाज ऐकलास कि ऐकला नाहीस? दोन पैकी एकच काहीतरी असेल. ”

“ ऐकला मी आवाज गाडीचा.” ईशा म्हणाली.

“ छान. मला सांग घरात किती जण राहतात?” पाणिनी ने विचारलं.

“ म्हणजे?”

“ म्हणजे कुटुंबातले सदस्य , नोकर वगैरे मिळून सगळे.” पाणिनी म्हणाला.

“ लोखंडे नावाचा नोकर आहे.”

“ हो माहिती आहे.भेटलोय मी त्याला. आणखी कोण?” पाणिनी ने विचारलं.

“ घर काम वाली बाई. मंगल वायकर नावाची. आणि काही दिवसापूर्वी तिची मुलगी पण आल्ये राहायला तिच्या सोबत,” ईशा ने माहिती दिली.

“ पुरुष कोण आहे? लोखंडे सोडून आणखी ? ” पाणिनी ने विचारलं.

“ कुणाल गरवारे असतो.”

“ गरवारे  ! ” पाणिनी उद्गारला.

“  हो.” ती म्हणाली.

“ आता माझ्या लक्षात आलं की तू माझ्या कडे पहिल्यांदा आलीस तेव्हा तुझं आडनाव तू गरवारे का सांगितलंस ते.”  पाणिनी म्हणाला.

“ म्हणून नव्हतं मी सांगितलं तसं, माझ्या समोर त्या क्षणी ते आडनाव आलं म्हणून सांगितलं होत.”

“ तो माझ्या नवऱ्याचा भाचा आहे. एक उनाड आणि वाया गेलेला मुलगा आहे. वाटेल तेव्हा घरी येणारा ,रात्री उशिरा पर्यंत बाहेर क्लबात, बर मध्ये पीत बसणारा.आश्चर्य म्हणजे  असा असूनही माझ्या नवऱ्याचा अत्यंत लाडका आहे तो. माझा नवरा म्हणजे उर्मट, कोणावरही कधी प्रेम न करणारा आणि दुसऱ्यावर नेहेमी वर्चस्व निर्माण करायची आस असणारा होता.”

“ ते सगळ मला माहिती झालंय.मला त्याचं कौतुक ऐकण्यात स्वारस्थ्य नाहीये.मला कुणाल गरवारे बद्दल सांग. त्या रात्री तो घरी होता?” पाणिनी ने विचारलं.

“ तो संध्याकाळीच बाहेर पडला होता.रात्री जेवायला पण आला नाही घरी.मला वाटतंय तो दुपार पासूनच टेनिस खेळायला क्लब वर गेला होता.” ईशा म्हणाली.  “ पाउस पडायला कधी सुरवात झाली? ” तिने अचानक विचारलं.

“ मला वाटतं सहा च्या सुमारास. का बरं?” पाणिनी ने विचारलं.

“ बरोबर आहे मग ! मला आठवतंय दधिची बोलल्याचं की कुणाल ने त्याला फोन केला होता की तो टेनिस क्लब वरच थांबणार आहे उशिरा पर्यंत; रात्री जेवायच्या वेळे पर्यंत.आणि उशिरा पर्यंत घरी येणार नाही म्हणून.” ईशा म्हणाली.

“ तुझी खात्री आहे की रात्री तो आला नव्हता?”

“  हो खात्री आहे.”

“ तू जो आवाज माडीवर ,तुझ्या नवऱ्याशी बोलताना ऐकला होतास तो कुणाल चा  नव्हता याची तुला खात्री आहे?” पाणिनी ने विचारलं.

“ खात्री आहे .तो तुमचाच आवाज होता.” ईशा म्हणाली.

पाणिनी  तिच्या कडे बघून संतापाने  काहीतरी पुटपुटला.

“  म्हणजे, तो अगदी हुबेहूब तुमच्या आवाज सारखा  येत होता. शांतपणे पण ठासून आपले म्हणणे मांडायची जी तुमची पद्धत आहे ना ती त्याच्या आवाजात जाणवत होती.अगदी तुमचीच पद्धत, आवाज वाढवायची ,तरीही शांत,संयमी स्वर.पण काळजी करू नका , मी कोणालाही तुमचं नाव सांगणार नाही काळजी करू नका.मला पोलिसांनी कितीही छळूं दे,माझ्या तोंडून ब्र सुद्धा निघणार नाही. ” ईशा म्हणाली

“  माझी काळजी सोड.त्या बद्दल आपण नंतर बोलू. मला सांग , तो माणूस आणि तुझा नवरा एकमेकांशी भांडत होते ते तुझ्या वरून का? पाणिनी ने विचारलं.

“ तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांचे शब्द कळायला मार्ग नव्हता मला. आता आपण ताबडतोब घरी जायला हवं.कोणाला तरी माझ्या नवऱ्याचे प्रेत सापडलं आणि मी घरी नाही तर काय अर्थ निघेल त्याचा ? चला लगेच निघू या.”

“ ते ठीक आहे पण आणखी एक-दोन मिनिटं थांबलीस इथे तर फरक पडणार नाहीये.आपण जायला निघण्यापूर्वी आणखी एक-दोन गोष्टी विचारायच्या आहेत तुला.” पाणिनी म्हणाला.

“ काय आता आणखी?” पाणिनी तिच्या जवळ गेला.गाडीच्या दिव्या च्या झोतात तिचा चेहेरा येईल अशा रीतीने  तिचा चेहेरा त्याने आपल्या हातात धरून वळवला आणि तिच्या डोळ्याला नजर देऊन करड्या आवाजात विचारलं,

“  तो माणूस म्हणजे हृषीकेश बक्षी तर नव्हता ना? खर बोल !”

“ नाही.”

“ त्याने तुला संध्याकाळी किंवा रात्री फोन केला होता?” पाणिनी ने विचारलं.

“ नाही.खरं सांगायचं तर सागरिका मधील गोळीबार आणि होल्ड अप नंतर माझा आणि त्याचा काहीही  संबंध आणि संपर्क नाही. त्याच्या नादी लागून माझे आयुष्य बदनाम झालंय” ईशा म्हणाली.

“ असं? तर मग तुझ्या नवऱ्याचा आणि मिर्च मसाला शी संबंध आहे हे मी हृषीकेश ला सांगितल्याचं तुला कसं समजलं?” पाणिनी ने विचारलं.

ती या प्रश्नाने गडबडली.तिची नजर खाली गेली.

“ उत्तर दे.” पाणिनी  पटवर्धन कडाडला. “ त्याने तुला हे कधी सांगितलं? तो आत्ता खुनाच्या वेळी   तिथे आला होता तेव्हा का?” –पाणिनी

“ नाही.तो आला नव्हता.त्याने दुपारी मला फोन केला तेव्हा तो म्हणाला.”

“ ओहो ! त्याने फोन केला होता तर !” पाणिनी उद्गारला.

“ हो.”

“ मी त्याच्या कडे जाऊन आल्यावर किती वेळाने फोन केला त्याने?” पाणिनी ने विचारलं.

“ लगेचच.”

“ मला त्याने नोकरा बरोबर पैसे पाठवण्या पूर्वी?” पाणिनी ने विचारलं.

“ हो.”

“ मला हे तू आधी का नाही सांगितलंस? तुझा आणि त्याचा संपर्क नाही असं का म्हणालीस तू?”

“ आत्ता मी नाही म्हणाले पण आधी तुम्हाला सांगितलं होत, आठवा, मी म्हणाले होते तुम्हाला की त्याने फोन केला होता म्हणून.तुमच्याशी खोटं बोलायचं असतं तर मी तेव्हाही सांगितलं नसतं त्याचा फोन आल्याचं.”  ईशा म्हणाली.

“ ओह ! स्मार्ट ! तू तेव्हा मला फोन आल्याचं सांगितलंस कारण तेव्हा तुला हे माहित नव्हतं आणि वाटलं नव्हतं की हृषीकेश तुझ्या घरी आल्याचा आणि त्यानेच खून केल्याचा मी त्याच्यावर संशय घेईन ” पाणिनी म्हणाला.

“ अजिबात नाही हो असं काहीही नाही.”

“ तू एक नंबर ची थापाडी आहेस. विश्वासाला पात्र नाहीयेस तू.आत्ता या क्षणी सुद्धा तू माझ्याशी खोटेच बोलते आहेस.तुला पक्क माहिती आहे तुझ्या नवऱ्याच्या खोलीत कोण होत ते.” पाणिनी म्हणाला

“ नाही.नाही.नाही. ” ती किंचाळली. “ मला नव्हतं माहीत कोण होत वरच्या खोलीत ते.मी याच समजुतीत होते की तुम्हीच होतात ते.म्हणून तर मी जवळ जवळ मैल भर चालत जाऊन  २४ तास चालू असलेल्या औषधाच्या दुकानातून फोन केला.”

“ का? तसं का केलंस?” पाणिनी ने विचारलं.

“ तुम्हाला माझ्या घरातून निघून तुमच्या घरी जायला संधी मिळावी म्हणून. लक्षात येतं का तुमच्या? त्यामुळे मी सांगू शकले असते की मी तुम्हाला बोलवायला तुमच्या घरी फोन केला,तुम्ही तिथे,तुमच्या घरीच तो फोन घेतलात आणि इथे आलात.” ईशा म्हणाली.  “ मी माझ्याच घरून फोन केला असता आणि तुम्ही तुमच्या घरी नसता आणि  मला नंतर कोणी विचारलं असत की  पाणिनी पटवर्धन कुठे होते तर मला सांगायला लागल असतं की तुम्ही घरी नव्हतात म्हणून. ”

“ माझा आवाज तू ओळखला नाहीस ,बरोबर ना? ” पाणिनी ने विचारलं.

“ मला वाटत की मी ओळखला तुमचा आवाज,माझ्या नवऱ्याशी बोलताना ” ईशा पुन्हा म्हणाली.

“ यात तुला वाटण्या सारखं किंवा न वाटण्या सारखं काही नाही. मागील तीन –चार तास मी माझ्या घरी अंथरुणात होतो.फक्त मी तिथे होतो हे मी सिद्ध करू शकत नाही.पोलिसांना वाटल की मी तुमच्या घरी होतो तर ते चुकीचं आहे हे सिद्ध करायला माझ्या नाकी नऊ येतील हे तू बरोबर ओळखलं आहेस.”

हे ऐकताच ईशा ने काहीच प्रतिसाद दिला नाही, अचानक तिने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले “ ओह! पाणिनी ! ” अचानक एकेरी वर येत ती म्हणाली. “ माझ्या कडे अशा नजरेने नको ना बघू. मी तुझं नाव बाहेर येऊ देणार नाही.आपण दोघेही या प्रकरणात अडकलोय.आपण दोघांनी एकमेकांना मदत करायला हवी.”

पाणिनी ने तिला हाताने ढकलून दूर केले.तिच्या नजरेला नजर देऊन तो म्हणाला, “  मी यात मुळीच अडकलेलो नाहीये.तू अडकली आहेस.तू माझी अशील आहेस त्यामुळे तुला सोडवणे माझं काम आहे पण ते अशील म्हणून. हे पक्क डोक्यात ठेव.”

“ हो.”

“ आत्ता तू अंगात घातलेल जर्कीन कुणाचं आहे?” पाणिनी ने विचारलं.

“ कुणाल चं आहे. ते व्हरांड्यात होतं.पहिल्यांदा मी तशीच बाहेर धावले, पावसाचं लक्षातच नव्हत.मी भिजले तेव्हा पुन्हा आत आले आणि हाताला ते जर्कीन लागलं ,तेच घातलं आणि बाहेर पडले.रेन कोट बघत न बसता. ”

“ मी येई पर्यंत तू या सगळ्या उत्तराची आधीच तयारी केली असशील !”  पाणिनी म्हणाला.“ तिथे पोलीस असतील की नाही सांगता येणार नाही मला, तुला काय वाटत, आणखी कोणी आवाज ऐकला असेल गोळी मारल्याचा?”पाणिनी ने विचारलं.

“मला नाही वाटत तसं.”

“ ठीक आहे, आपण जाऊ घरीतुझ्या.तो पर्यंत तिथे पोलीस पोचले नसतील तर नंतर ते आल्यावर त्यांना सांग की तू मला घरातूनच फोन लावलास म्हणून.त्या औषधांच्या दुकाना पर्यंत गेलीस वगैरे काहीच बोलू नको त्यांना.असं सांग की घरून फोन केल्यावर पटवर्धन यायची वाट बघत होते , मला घरात भीती वाटायला लागली म्हणून पटवर्धन ना भेटण्यासाठी बाहेर पडले,मी एवढी भ्याले होते की रेनकोट  घ्यायचे सुद्धा सुचलं नाही.तू असं उत्तर दिलास म्हणजे तू भिजलीस का याचा खुलासा त्यांना आपोआपच मिळेल.” पाणिनी म्हणाला.

 

“ वा ! अगदी बरोबर.” ईशा उद्गारली. ते दोघे गाडीत बसून तिच्या घराजवळ आले.पाणिनी ने कानोसा घेतला.

“ऐक, घरात शांतताच दिसत्ये. कोणी गोळीचा आवाज ऐकला असेल असं वाटत नाहीये.पोलीसही दिसत नाहीयेत.तुला शांत डोक्याने आणि विचार पूर्वक वागावं लागेल.अजूनही तू खोटे बोलत असलीस तर आत्ताच खरं सांग.नाहीतर मोठ्या लफड्यात अडकशील. ” पाणिनी म्हणाला.

“ मी खोटे बोललेली नाही.देवा शप्पथ सांगते.”

ते दोघे पोर्च मधून दारा जवळ आले.

“ दार उघडंच आहे.मी उघडंच ठेवून बाहेर गेले होते. ” ईशा म्हणाली आणि पाणिनी ला प्रथम आत जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून  स्वतः बाजूला झाली.पाणिनी ने दार ढकलले.  “ दार बंद आहे.”  पाणिनी म्हणाला.“ तुझ्या कडे किल्ली असेल ना? उघड दार.”

“ किल्ली पर्स मध्ये आहे.” ईशा म्हणाली.

“ पर्स कुठाय? ”

“ अरे बापरे ! ” घाबरून ती म्हणाली. “  माझी पर्स घरातच राहिली, माझ्या नवऱ्याच्या प्रेता जवळ.”

“ तू वर गेलीस तेव्हा उझ्या हातात होती का ती?” पाणिनी ने विचारलं.

“ नक्कीच होती.ती.... ती.. तिथे पडली असली पाहिजे,कारण मी खाली उतरले घाई घाईत तेव्हा माझ्या हातात ती असल्याचे आठवत नाही.”

“ पर्स आपल्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे. दुसरा कुठला दरवाजा उघडा असेल का? ” पाणिनी ने विचारलं.

 ती नकारार्थी मान हलवणार तेवढ्यात तिला ते आठवलं

“ आहे, आहे, मागच्या बाजूला नोकरांना ये-जा करण्यासाठी दाराची सोय केली आहे.त्याची किल्ली मागच्या गॅरेज च्या छताला ठेवलेली असते.चला आपण जाऊन बघू. ”

दोघेही बंगल्याला वळसा घालून मागे गेले.

“ बिलकुल आवाज करू नको.नोकरांना न कळता मला  आत जायचयं, कोणी उठण्यापूर्वी मला अंदाज घ्यायचा आहे,घरातल्या स्थितीचा.” पाणिनी म्हणाला.

तिने छाताजवळ लपवलेली किल्ली घेतली आणि दार उघडलं

( प्रकरण ७ समाप्त)