Get it on Google Play
Download on the App Store

साक्षीदार प्रकरण १६

 

साक्षीदार प्रकरण १६
“ सर, तुम्ही फार लवकर तिच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेतलं,बर झालं.तिच्या कडून सगळ लेखी घेतलंत सही करून .” ऑफिसात आल्यावर सौम्या पाणिनी ला म्हणाली.
“ तुला खरं सांगू? रागवू नको, सौम्या,पण जो पर्यंत न्यायाधीश तिला निर्दोष ठरवत नाही तो पर्यंत ती गुन्हेगार आहे अस होत नाही.”  पाणिनी म्हणाला
“ ते कायद्याने ठीक आहे.पण आता तिचा जबाब आपण लेखी घेतलाय,प्रेरक पांडे ने एव्हाना तिची सही सुध्दा घेतली असेल. आता तिचं तुमच्याकडे काय काम असणारे? ती दुसरा वकील बघेल,पण तो सुध्दा तिला कसा सोडवू शकेल शंकाच आहे.” सौम्या म्हणाली.
“ दुसरा वकील नाही,पण मी अजून तिला बाहेर काढू शकतो.मी फक्त न्यायाधिशांच्या मनात ती दोषी आहे किंवा नाही या बद्दल थोडा जरी संदेह निर्माण केला ना, तरी ते तिला सोडतील.”
तेवढ्यात रिसेप्शानिस्ट आत आली, “ बाहेर कुणाल गरवारे आणि त्याचे वकील अथर्व देवचके आलेत.”
“ पाठव त्यांना आत.”  पाणिनी म्हणाला
दोघं आत आले.पाणिनी पटवर्धन ने त्यांना बसायला सांगितलं. सौम्या ने दार बंद करून घेतलं.
कुणाल ने बोलायला सुरुवात केली. “ पटवर्धन, तुमच्या सुरुवातीच्या हेतू बद्दल मी शंका घेतली असं तुम्हाला वाटलं असलं तर मला माफ करा. मला समजलंय की तुम्ही  गुप्त पणे आणि अत्यंत  हुशारीने केलेल्या  तपासा मुळेच तुम्हाला ईशा कडून गुन्ह्याची कबुली मिळवता आली.”
“ कुणाल, तुझी हरकत नसेल तर मी बोलतो जरा.” अथर्व देवचके मोकळेपणाने  म्हणाला. कुणाल ने हसून त्याला संमती दिली.
अथर्व देवचके ने आपली खुर्ची जरा पुढे सरसावून पटवर्धन च्या दिशेने घेतली.
“ आपण एकमेकांना पूर्ण ओळखतोय पटवर्धन.बरोबर?” त्याने पाणिनी ला विचारलं.
“ नाही, मला नाही वाटत तसं.”  पाणिनी म्हणाला
अथर्व देवचके च्या ओठावर हसू फुटले.
“ मृत्युपत्र च्या खरेपणा बद्दल कोर्टातून दाखला मिळवण्यासाठी आणि दरम्यानच्या काळात  अरोरा च्या मालमत्तेची प्रशासक म्हणून  ईशा ची नियुक्ती  करण्यासाठी कोर्टाने मान्यता दयावी यासाठी तुम्ही ईशा च्या वतीने वकील म्हणून काम करताय. माझं म्हणणं आहे की सगळं सोपं आणि सुकर होण्याच्या दृष्टीने, तुम्ही हे दोन्ही दावे काढून घेतले तर बरं होईल.”
“सोपं आणि सुकर कोणासाठी? ”   पाणिनी म्हणाला.
“ कुणाल गरवारे साठी, अर्थातच !” अथर्व म्हणाला.
“ मी कुणाल गरवारे चा वकील नाहीये.”  पाणिनी म्हणाला
“ ओ ! ओहो !! अर्थात.” अथर्व हसून म्हणाला. “  जे काही घडलं ते फार दुर्दैवी होत तरीही, तुम्ही हे सर्व प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलत ,त्यामुळे माझं अशील म्हणजे कुणाल एवढा प्रभावित झालाय की दधिची अरोरा च्या मृत्यू पश्चात तो सर्व मालमत्तेचा मालक होईल तेव्हा  त्याला हे सर्व मोठमोठे व्यवसाय सांभाळण्यासाठी अनेक  हुशार वकील घ्यावे लागणार आहेत. तुमच्या लक्षात येतंय ना मला काय म्हणायचंय ते? ” अथर्व म्हणाला.
“ काय लक्षात यायला हवंय माझ्या नेमकं?” पाणिनी ने खोचक पणे विचारलं.
“ इथे आपण तिघेच आहोत तर मोकळे पणाने सांगतो, कुणाल च्या लक्षात आलंय की अरोरा च्या विविध व्यवसायापैकी, मिर्च मसालाचा धंदा, हा विशेष लक्ष देऊन सांभाळावा लागणार आहे.अर्थात मिर्च मसाला सोडून अन्य सर्व व्यवसायाच्या संबंधातील कायदेशीर बाबींसाठी मी आहेच त्याच्या मदतीला, पण त्याला वाटतंय मिर्च मसालासाठी सल्ला देण्यासाठी त्याला विशेष तज्ज्ञ असा माणूस लागणार आहे.विशेषतः भविष्यातील वारसदार कोर्टाकडून ठरवला जाई पर्यंत. ” अथर्व म्हणाला. पाणिनी काही बोलेल म्हणून त्याने वाट बघितली. पण पाणिनी गप्पच होता. मग अथर्व पुढे म्हणाला,  “ या सर्वा साठी  तुम्हाला खूप आर्थिक फायदा करून दिला जाईल पटवर्धन. खूप मोठा फायदा.”
“  सगळं आडून आडून का बोलताय? माझा आर्थिक फायदा करून द्यायच्या बदल्यात मी ईशा ला हक्क आणि मालमत्तेची मालकी मिळावी म्हणून कोर्टात केलेले दावे मागे घ्यावे असाच तुमचा प्रस्ताव आहे ना? हे बघा मी ईशा चा वकील आहे ,तिच हित बघतोय,तुम्ही माझ्या विरुद्ध बाजूला आहात, कुणाल गरवारे चे वकील म्हणून तुम्ही मालमत्तेवर कुणाल चा ताबा कसा येईल हे बघताय.पण ते मृत्युपत्र म्हणजे फ्रॉड आहे हे मी कोर्टात सिध्द करणारे. ”   पाणिनी म्हणाला
अथर्व देवचके च्या ओठावर अजूनही हसू होतं पण डोळे कठोर झाले
“ तुम्हाला असं काही करता येणार नाही.ते मृत्युपत्र म्हणजे फोर्जरी आहे की नाही याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही.मूळ मृत्युपत्र ईशा ने नष्ट केलंय. तिने स्वतःच त्याची कबुली दिली आहे.त्या नष्ट झालेल्या मृत्युपत्रा मधे काय लिहिलेलं होत हे आम्ही सिध्द करू शकतो. ”-अथर्व
“ हा कायद्याचा खेळ आहे.मी म्हणेन की तुम्ही सिध्द करू शकणार नाही, तुम्हाला वाटतंय की येईल.”  पाणिनी म्हणाला
“ आणखी एक, ” अथर्व म्हणाला.  “ ईशा ने खून केलाय तिच्या नवऱ्याचा.कायद्या प्रमाणे खुनी माणसाला आपल्या वारसाकडून काहीही संपत्ती मिळवता येत नाही.मृत्युपत्रात तशी तरतूद असली तरी सुध्दा.”
पाणिनी ने काहीही भाष्य केले नाही.
“ तुम्ही बोलत का नाही? मी म्हणतो त्या बद्दल तुम्हाला शंका आहे?” --अथर्व.
“ नक्कीच. पण मी इथे तुम्हा लोकांशी फालतू वाद घालण्यात माझा वेळ आणि शक्ती वाया नाही घालवणार.मला जे बोलायचय ते कोर्टाला सांगेन.मी काल जन्मलो नाही. मला पक्क माहित्ये तुम्हाला काय हवंय ते. तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे  . की ईशा ला खुनाच्या आरोपाखाली अटक होईल. तुमची इच्छा आहे की ईशा ला दधिची चा खून करण्या मागचं जे कारण होतं, त्याचा पुरावा मी तुम्हाला द्यावा.तो दिला की तुम्ही तिला दधिची अरोरा चा खुनी म्हणून सिध्द कराल आणि तिला खुनी असल्यामुळे त्याची संपती मिळणार नाही.पण लक्षात घ्या की खुना ऐवजी सदोष मनुष्य वध असा आरोप सिध्द झाला तरी तिला त्याची संपत्ती मिळू शकते. थोडक्यात तुम्ही कुणाल ला अरोरा ची संपत्ती मिळवून द्यायच्या प्रयत्नात आहात आणि त्यासाठी तुम्ही मला लाच देऊ करताय ! तर मग ऐका हे असं काहीही मी होवू देणार नाही.”  पाणिनी म्हणाला
“ तुम्ही अशीच भूमिका घेतलीत तर तुम्हाला कोर्टासमोर उभे राहून खुलासा करावा लागेल. ”  अथर्व म्हणाला
“ या सर्वाला एका शब्दात सांगायचं झालं तर कोणता शब्द वापरता येईल? धमकी...?”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही आम्हाला या प्रकरणापासून बाहेर ठेऊ शकत नाही.आणि जेव्हा आपण सगळेच यात एकत्र असू तेव्हा आपल्याला बऱ्याच मुद्द्यावर एकत्र चर्चा करावी लागणार आहे लक्षात ठेवा. आणि मग तुमच्या हालचालीवर मर्यादा येतील.” –अथर्व.
पाणिनी उठून उभा राहिला.“ मला असलं गुळूमुळू बोलणं आणि गोलगोल गप्पा मारणं आवडत नाही.मला जे वाटतं ते मी स्पष्ट बोलतो. ”  पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला नेमकं काय बोलायचंय?”  --अथर्व
“ नाही.” पाणिनी कडाडला.
एकंदरित वातावरण तापत चाललं. ते निवळण्याच्या दृष्टीने कुणाल जरा खाकरला आणि इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत म्हणाला, “ मी जरा बोलतो, मधे, हे सगळं सोपं होण्याच्या दृष्टीने. ”
“ नाही ! ”  अथर्व म्हणाला. “ मीच बोलणार.”
“ प्लीज, मिस्टर पटवर्धन. समजून घ्या. गैरसमज नकोत.” कुणाल, पटवर्धन कडे पाहून विनवणी करत म्हणाला.
“ कुणाल, प्लीज गप्प बस.” अथर्व म्हणाला.
“ ओके, सॉरी अथर्व.” कुणाल गरवारे म्हणाला.
“ माझ्या दृष्टीने आपली ही मिटींग संपल्ये.” बाहेर जाण्याची तयारी करत पाणिनी म्हणाला.
अथर्व देवचके पुन्हा प्रयत्न करण्याचे दृष्टीने म्हणाला, “ पटवर्धन, तुम्ही स्वतःच जर कोर्टात केलेला अर्ज काढून घेतला तर त्यात वेळ आणि पैसा वाचेल. दोघांचा, अन्यथा आमच्या दृष्टीने ही खूप मजबूत केस आहे.”
“ तुम्हाला काय वाटावं हा तुमचा प्रश्न आहे, अथर्व. अत्ता या क्षणी सर्व सूत्र माझ्या हातात आहेत. ”  पाणिनी म्हणाला
“ बकील साहेब,तुम्ही एक विसरताय, तुम्हाला आठवण करून देतो, ईशा ने गुन्हा कबूल केल्यामुळे  पोलिस तुम्हाला गुन्हेगाराचा साथीदार ठरवू शकतात. ईशा ने ऐकलेला आवाज तुमचा होता. ”—अथर्व ने दम भरला.
“ मला एखादा  कायदेशीर मुद्दा अडेल, तेव्हा मी नक्की तुमचा सल्ला घेईन.”  पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन, तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने जायचं असेल तर आम्हालाही तसा खेळ खेळता येतो.”
“ मला माझ्याच पद्धतीने जायचंय.”  पाणिनी म्हणाला
देवचके ने कुणाल गरवारे ला खूण केली, दोघेही उठून जायला निघाले.अथर्व देवचके न अडखळता ठाम पणे दारा बाहेर पडला पण कुणाल  मात्र दारापाशी जरा अडखळला, दाराची मूठ हातात धरून त्याने अपेक्षेने पाणिनी कडे पाहिले,त्याच्या चेहेऱ्यावर त्याला काहीतरी बोलायचे असावे असे वाटत होते. पण पाणिनी चा प्रतिसाद शून्य होता.  शेवटी त्याने नाईलाजाने दार बंद केले.
ते दोघे बाहेर पडल्यावर सौम्या आत आली.
“ काही ठोस ठरलं का तुमच्यात? म्हणजे काही तडजोड?” तिने विचारलं.
“ नाही.” पाणिनी थकून म्हणाला. सौम्या ला तो एकदम दहा वर्षांनी म्हातारा झाल्या सारखा वाटला.
“ आपल्यावर ते कुरघोडी करू शकतील?” सौम्या ने काळजीने विचारलं.
“ मला पुरेसा वेळ मिळावा असा माझा प्रयत्न होता,तसं झालं असतं तर मी सर्व काही ठीक ठाक केलं असतं.पण ईशा ने मला अडकवलं आणि मला स्वतःला बाहेर काढण्याचा एकाच मार्ग होता ,तो म्हणजे तिला यात अडकवणं. मी बाहेर असल्या शिवाय काहीच करू शकलो नसतो.”
“ सॉरी सर, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता,पण सहसा तुम्ही वादात माघार घेत नाही ना म्हणून मला आश्चर्य वाटलं.”-सौम्या म्हणाली.
“ असू दे. तुझ्या भावना समजू शकतो.मी कनक च्या ऑफिसात जातोय. कुणाला सांगू नकोस मी कुठे आहे. तू सुध्दा काही तातडीचं काम असल्या शिवाय मला भेटू नको.”  पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.
( प्रकरण १६ समाप्त)