Get it on Google Play
Download on the App Store

साक्षीदार प्रकरण १८

 

प्रकरण १८
 
लोटलीकर हा एक सडपातळ शरीरयष्टीचा आणि निराश चेहेरा असलेला इसम होता.आपले डोळे सारखे मिचकावण्याची आणि जिभेने ओठ ओले करण्याची त्याला सवय होती.घरातच एका लोखंडी पेटीवर तो बसला होता. कनक कडे बघून त्याने नकारार्थी मान हलवली . “ तुम्ही, चुकीच्या माणसाकडे आलाय.माझं लग्न झालं नाहीये.”
“ सुषुप्ती  वायकर नावाच्या मुलीला ओळखतोस?” –कनक
“ नाही.” आपली जीभ ओठावर फिरवत तो म्हणाला.
“ तू घर सोडून चाललायस हे?” घरातल्या सामानाकडे बघत कनक ने विचारलं.
“ हो. मला भाडं परवडत नाही याच.”
“ कुठे जाणारेस रहायला?”-कनक
“ अजून नक्की केलं नाही. कमी भाड्याची खोली बघीन एखादी.”
 दोघांनी पुढे काही न विचारता त्याच्याकडे फक्त रोखून बघितलं.
“ तुम्ही दोघेही पोलीस अधिकारी आहात? ” त्याने विचारलं.
“ आमचं दे सोडून. तुझ्या बद्दल सांग.” त्याला दमात घेत कनक म्हणाला.
लोटलीकर  गप्पच राहिला.
“ अचानकच सामानाची आवरा आवर करायला लागलास?”-कनक
“ फारसे समान नाहीच आहे माझं.” लोटलीकर म्हणाला.
“ एक लक्षात ठेव, उगाचच वेळ काढू पण करू नको.तुझी माहिती आम्ही काढू शकतो. तुझं म्हणणं आहे की तुझं लग्न झालेलं नाही, हो ना? ” –कनक
“ हो, बरोबर सांगितलं मी.”
“ तुझे शेजारी म्हणतात, तुझं लग्न झालंय.एक आठवडया पूर्वी एक मुलगी इथे तुझ्या बरोबर तुझी बायको म्हणून रहात होती.”
लोटलीकर ने अस्वस्थ पणे आपले पाय हलवले.ओठावरून जीभ फिरवली.
“ माझं तिच्याशी लग्न झालेलं नव्हत.”
“ तू कधीपासून ओळखतो आहेस तिला?”
“ दोन आठवडे झाले.ती एका हॉटेलात नोकरीला होती.” –लोटलीकर
“ कुठल्या हॉटेलात?” –कनक
“ नाव नाही लक्षात, विसरलो मी.”-लोटलीकर
“ तिच नाव तरी लक्षात आहे का?”-कनक
“ मिसेस लोटलीकर ” –तो म्हणाला.
कनक जोरात हसला. “ मूर्ख माणसा, लग्न नाही झालं म्हणतोस आणि ती तुझं आडनाव कसं लावायची? आणि मला तिचं आधीचं नाव हवंय.”
“ मीरा कोरे”
“ अत्ता कुठे आहे ती?”
“ मला नाही कल्पना.आमचं भांडण झालं खूप.मला सोडून गेली ती, बहुदा दुसऱ्या कोणा बरोबर तरी.” –लोटलीकर
“ कशावरून भांडण झालं?” –कनक
“ असंच, काहीतरी.खास असा विषय नव्हता.”
 त्याच्या कडून अपेक्षित माहिती मिळत नाही असं लक्षात आल्यावर  कनक ने पाणिनी कडे बघितलं.पाणिनी पुढे आला.
“ रोजचे पेपर वाचतोस तू?” त्याने विचारलं.
“ कधीतरी.”
पाणिनी ने आपल्या खिशातून वर्तमान पत्राची  घडी बाहेर काढून त्यातला सुषुप्ती वायकर चा फोटो दाखवला. “ हिच्याच बरोबर राहिलास ना?”
लोटलीकर ने फोटो कडे नुसतीच नजर टाकली..ठामपणे आपली मान हलवली.  “ नाही, ही नाही ती.”
“ तू नीट बघितला नाहीस फोटो.तू नाही म्हणण्यापूर्वी नीट बघ  तरी आधी  ” पाणिनी म्हणाला आणि त्याने तो फोटो त्याला परत बघायला लावला.लोटलीकर ने काही सेकंद तो न्याहाळला. त्याच्या उत्तरात बदल झाला नाही.
“  या वेळी तुला उत्तर द्यायला जास्तच वेळ लागला नाही का?”  पाणिनी म्हणाला.
लोटलीकर गप्प राहिला.
“ ठीक आहे, लोटलीकर, तुझी हीच इच्छा असेल तर आमचा नाईलाज आहे. तुला खरं सांगायची संधी देऊन वाचवायचा प्रयत्न केलं आम्ही.शेवटी तुझं नशीब.” पाणिनी लोटलीकर ला म्हणाला आणि कनक कडे सूचक पणे बघून म्हणाला, “ चल,कनक.”
दोघं बाहेर पडले. दार लावल्यावर कनक ने लगेचच पाणिनी ला विचारलं, “ तूं काय वाटतंय त्याच्या बद्दल? काय अंदाज आहे तुझा?”
“ तो अत्यंत पोचलेला इसम आहे. काहीतरी झटका बसलाय त्याला पूर्वी कायद्याचा. त्यामुळे पोलिसांची भीती चेपल्ये त्याची. आपण त्याला बळजबरी केली असती तर तो अजूनच कोषात गेला असता.”  पाणिनी म्हणाला
“ आपण पुढे काय करुया?” –कनक
“ तिचा फोटो शेजाऱ्यांना दाखवू कोणीतरी ओळखेलच.त्यावर आणखी मोठा दबाव टाकल्या शिवाय तो बोलणार नाही.”  पाणिनी म्हणाला
जिन्यावर पावलांचा आवाज आला.टिपिकल सरकारी ऑफिस मधील कर्मचारी वर आला.
“ समन्स घेऊन आलोय. तुमच्या दोघांपैकी श्याम लोटलीकर कोण?” तो म्हणाला.
 पाणिनी पटवर्धन एक पाऊल पुढे आला. “मला समन्स आलंय? ”  आश्चर्य व्यक्त करत पाणिनी म्हणाला.  त्या माणसाने आपल्या बॅगेतून एक दस्त बाहेर काढला.
“ तुम्हाला हे काय असेल याचा अंदाज असेलच.” तो माणूस म्हणाला. “ सुषुप्ती  वायकर विरुध्द तुम्ही, म्हणजे लोटलीकर यांच्या प्रकरणी तक्रार अर्ज आणि त्याचा समन्स बजावणी करायला मी आलोय.तुम्हाला मूळ तक्रार आणि मूळ समन्स दाखवतो मी, आणि तुम्हाला देताना त्यांची प्रत देतो.”
पाणिनी ने त्याचे हातातून ती कागदपत्र घेतली.आणि त्या माणसाची बोळवण केली. तक्रार पत्र पाणिनी ने पूर्ण पणे वाचले. “ आपल्यासाठी मोठा ब्रेक आहे हा!”  पाणिनी म्हणाला त्याने लोटलीकर च्या घराचे दार पुन्हा खटखटवले.
“ कोण आहे?” आतून लोटलीकर चा आवाज आला.
“ समन्स आहे तुमच्यावर ”  पाणिनी म्हणाला
लोटलीकर ने दार उघडलं.  “ तुम्ही? पुन्हा ! ” लोटलीकर उडालाच.
“ हे बघ तुझ्यावर बजावण्यासाठी आमच्या काडे हे समन्स होते. आम्हाला फक्त खात्री करायची होती की आम्ही योग्य त्या माणसाला बजावतो आहोत ना समन्स.म्हणूनच आम्ही तुला तुझ्या लग्न बद्दल प्रश्न विचारात होतो.”
क्षणात लोटलीकर चा चेहेरा उजळला. “ अस आहे होय ! मग मगाशीच सांगायचं ना मला हे.! मी वाटच बघत होतो या समन्स ची. त्यांनी मला सांगितलं होतं, हे समन्स मिळे पर्यंत थांबायला, आणि नंतरच जागा सोडायला.”
“ अरे मग तूच आम्हाला का नाही सांगितलस हे? उगाचच आम्हाला प्रश्न विचारायला लावलेस. तर तू श्याम लोटलीकर आहेस आणि या तक्रारीत नमूद केलेल्या तारखेला तू सुषुप्ती  वायकर शी लग्न केलंस, बरोबर ना?”  पाणिनी म्हणाला.
लोटलीकर ने , तक्रारीत उल्लेख केलेल्या लग्नाच्या तारखेकडे नजर टाकली.
“ बरोबर आहे.” तो म्हणाला.
“ या तक्रारीत असा उल्लेख आहे की जेव्हा तुझं लग्न झालं , त्या पूर्वी तुझी आधीची पत्नी हयात होती.तिला तू घटस्फोट दिला नव्हतास त्यामुळे तुझं हे लग्न कायदेशीर नव्हतं.त्यामुळे तक्रार दाराला हे लग्न रद्दबादल करून हवंय ”  पाणिनी म्हणाला 
लोटलीकर ने मान डोलावली.
“ पण हे बरोबर नाहीये. खरं ना? ”
“ हे बरोबर आहे.” लोटलीकर म्हणाला.
“ तर मग दोन लग्न केल्या बद्दल तुला अटक करावी लागेल.”  पाणिनी म्हणाला
“ पण ते म्हणाले की काहीच अडचण येणार नाही मला.”
“ ते म्हणजे कोण? ”  पाणिनी म्हणाला.
“ सुषुप्ती चे वकील ” लोटलीकर म्हणाला.
“ ते उगाचच तुला खेळवताहेत. म्हणजे सुषुप्ती त्या श्रीमंत वारसाशी लग्न करू शकेल .”  पाणिनी म्हणाला
“ पण मी दोषी नाहीये दोन लग्न केल्याच्या गुन्ह्यात.”
“ आहेस ! नक्कीच आहेस.”  पाणिनी म्हणाला “ या तक्रारी स्पष्ट लिहिलंय तसं आणि सुषुप्ती आणि तिच्या वकिलांची सही आहे. तुला पोलीस चौकीत बोलावलंय. फार मोठया अडचणीत आहेस तू लोटलीकर.”
“हे खरं नाहीये  ”- लोटलीकर
“ कशावरून म्हणतोयस तू?”  पाणिनी म्हणाला.
“ कारण माझं या आधी लग्न झालंच नाहीये, सुषुप्ती ला हे माहित्ये आणि तिच्या वकीलांना सुध्दा.मी तिच्या वकिलांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की सुषुप्ती ला घटस्फोट देण्यासाठी वेळ नाहीये, तिला त्या माणसा बरोबर लगेचच लग्न करायचं आहे.म्हणून घटस्फोटाची प्रक्रीया करायच्या ऐवजी माझं आधी लग्न झाल्याचं मी नाटकं करायचं आणि त्या बायकोला घटस्फोट न देता मी सुषुप्ती बरोबर लग्न केलं असं भासवायचं , म्हणजे ते तशा अर्थाची नोटीस किंवा समन्स मला देणार आणि मी त्यांना असं उत्तर द्यायचं की मला वाटत होतं की मी आधीच्या बायकोला मी घटस्फोट दिलाय. मग ते मला समन्स काढून माझं सुषुप्ती बरोबरचे लग्न अवैध ठरवतील. मी त्यांच्या वकीलांना या समन्स ला काय उत्तर द्यायचं ते सुध्दा त्यांनी तयार करून ठेवलंय.मी सही सुध्दा केल्ये त्या पत्रावर.ते उद्या ते पत्र फाईल करतील. ”
“ मग हे तू आम्हाला आधीच का नाही सांगितलंस?”  पाणिनी म्हणाला.  “ आता एक काम कर हे जे तू मला सांगितलंस, ते लेखी दे म्हणजे आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांना तसा अहवाल देता येईल.”
लोटलीकर जरा संकोचला
“ किंवा आम्हाला लिहून देणार नसशील तर पोलीस चौकीत ये आणि जबानी दे.”  पाणिनी म्हणाला
“ नको नको, तिकडे नको, मी तुम्हाला इथेच लिहून देतो माझा जबाब.”
पाणिनी ने आपली वही आणि पेन काढून त्याच्याकडे दिलं.
“ असं लिही की सुषुप्ती शी लग्न करण्यापूर्वी मी विवाहित नव्हतो.सुषुप्ती  हीच माझी प्रथम पत्नी होती, पण तिला माझ्या पेक्षा खूप श्रीमंत अशा कुणाल गरवारे शी लग्न करायचं होतं, आणि ते ही अत्यंत तातडीनं, माझ्याशी घटस्फोट न घेता कारण  त्यात वेळ गेला असता, तेवढ सुध्दा थांबायची तिची तयारी नव्हती, म्हणून तिच्याच वकिलांनी असं सुचवलं की घटस्फोटाच्या क्लिष्ट आणि वेळ काढू प्रक्रीये पेक्षा,आपण तुझं  सुषुप्ती शी झालेलं लग्न अवैध  आहे असे आपण सिध्द करू. ते सिध्द करण्यासाठी माझं सुषुप्ती च्या आधी दुसऱ्या स्त्री शी लग्न झालं होतं आणि तिला घटस्फोट न देता मी सुषुप्ती शी लग्न केलं असं दाखवू.”  पाणिनी म्हणाला
“ मी असं लिहून दिलं तर मी वाचीन या त्रासातून?” –लोटलीकर
“ तो एकमेव उपाय आहे. आम्ही तर तुला पोलिसात द्यायची तयारी केली होती.बरं झालं की तू वेळीच आम्हाला वस्तुस्थिती सांगितलीस ते.”
पुढील दहा मिनिटात लोटलीकर ने स्वतःच्या अक्षरात लिहिलेला जबाब  सही करून पाणिनी कडे दिला.पाणिनी तो नीट वाचला आणि समाधानाने मान डोलावली.
“ तर मग लोटलीकर, वकिलांनी तुला निघून जायला सांगितलं इथून?”  पाणिनी म्हणाला.
“ हो.ते म्हणाले अशा ठिकाणी जा की तुला कोणी भेटता कामा नये , कोणी तुला या विषयावर प्रश्न विचारणार नाही अशा ठिकाणी जा.”
“ कुठे जायचं ते विचार करून ठेवलं आहेस का?”
“ कुठल्यातरी हॉटेलात.”
“ आमच्या बरोबर चल.” कनक ओजस म्हणाला. “ आम्ही तुला एखाद्या हॉटेलात रूम मिळवून देतो.दुसऱ्या नावाने तिथे रूम घे,म्हणजे तिथे तुला कोणी शोधत येणार नाही. आम्ही तुझ्याशी संपर्कात राहू कारण तुझ्या या जबाबावर कदाचित खातर जमा देण्यासाठी तुला यावं लागेल.”
“ चालेल.” लोटलीकर म्हणाला.  “ त्या वकिलाने मला तुमच्या बद्दल सांगायला हवं होत.मला त्यांनी चांगलंच अडचणीत टाकलं असतं ”
“ खरचं सांगायला हवं होतं.”  पाणिनी म्हणाला
“ इथे वकिलांबरोबर सुषुप्ती पण आली होती?”-कनक
“ नाही.तिची आई आधी आली.नंतर वकील आला.” –लोटलीकर
“ म्हणजे तू सुषुप्ती ला भेटलाच नाहीस?” –कनक
“ ठीक आहे चल तर आम्ही तुला हॉटेलात घेऊन जातो.तिथे श्याम लोटलीकर या नावाने रहा.”  पाणिनी म्हणाला
“ माझ्या सामानाचे, कपड्यांचे काय?” –लोटलीकर
“ त्यांची काळजी करू नको.हॉटेल हा माणूस येऊन तुझं समान घेऊन येईल तुझ्या हॉटेलात. आमची गाडी आहे खाली.तुला घेऊन जातो आम्ही.” पाणिनी म्हणाला
“ तुमचे उपकार झाले खूप.माझा विश्वासच नाही बसत. मला तर वाटायला लागलं की त्या वकीलाला तरी काळात होतं का ते स्वतः काय करताहेत.”-लोटलीकर
“ त्यांना बरोबर माहिती होतं ते काय करताहेत. फक्त त्यांना घाई झाली होती फार ”  पाणिनी म्हणाला
“ बरोबर. ते खूप घाई करत होते. फार अधीर होते काहीतरी करायला.”-लोटलीकर
“ कनक, आपण याला घेऊन हॉटेल प्रेयसीमधे जाऊ. ते सोयीस्कर आहे.” पाणिनी म्हणाला
“ मला समजलं ”  सूचक पणे पाणिनी कडे पहात कनक म्हणाला.
ते तिघं हॉटेल प्रेयसीमधे निघाले.गाडीत कोणीच काही बोलत नव्हते.हॉटेल च्या रिसेप्शन पाशी आल्यावर पाणिनी पटवर्धन रिसेप्शनिस्ट जवळ जाऊन म्हणाला, “ माझी इथे रूम बुक केलेलीच आहे.गंधार जयकर नावाने, हे माझ्या बरोबरचे मिस्टर श्याम लोटलीकर म्हणून आहेत.यांना रूम हव्ये. माझ्या रूम समोरच मिळाली तर बरं होईल. ”
रिसेप्शनिस्ट ने रजिस्टर चाळलं, “मिस्टर गंधार जयकर, तुमची ५१८ नंबरची खोली आहे, मी त्यांना ५२२ देऊ शकतो.”
 
“ छान,” पाणिनी म्हणाला. “ यांचं समान बाहेरून आणायची व्यवस्था करायची आहे जरा, तुम्ही, मी देतो त्या पत्त्यावर माणूस पाठवा , मी पैसे देईन त्याचे.”
“ ठीक आहे मिस्टर गंधार जयकर.” – रिसेप्शनिस्ट
ते सगळे रूम मधे आले.
“ हे बघ लोटलीकर,आता तू कुठेही बाहेर जाऊ नकोस. पण खोलीतच थांबून आम्ही फोन केला तर उपलब्ध रहा. कदाचित पोलीस तुला प्रश्न विचारातील, पण तुझा लेखी जबाब आमच्याकडे असल्याने तुला भ्यायचे कारण नाही आता.”
“ तुम्ही सांगाल तसच करीन मी.वकील म्हणाला होता की समन्स मिळाल्यावर फोन क्र म्हणून. करायला पाहिजे का फोन? ” –लोटलीकर
“ काही गरज नाही.तू आम्हाला कळवलंयस ते पुरेसे आहे.तू स्वतःहून कोणाच्याच संपर्कात राहू नकोस.आम्ही तुला पुढच्या सुचना देई पर्यंत इथेच पडून रहा.इथे तुझी खाण्या-पिण्याची सगळी सोय करू आम्ही.काळजी करू नको.आम्ही पोलीस मुख्यालयाशी बोलून तुला पुढच्या सूचना देऊ.  ”  पाणिनी म्हणाला
“ तुमच्या शब्द बाहेर नाही.”-लोटलीकर
कनक आणि पाणिनी बाहेर पडले. दार लाऊन घेतले आणि कॉरीडोर मधून बाहेर जाताना, कनक म्हणाला, “ काय ब्रेक मिळालाय! पाणिनी ! आता काय करायचे पुढे?”
त्याला उत्तर द्यायच्या ऐवजी पाणिनी ने पोलीस स्टेशन ला फोन लावला.आणि प्रेरक पांडे ला जोडून द्यायला सांगितलं. तो येईपर्यंत कनक ला उद्देशून म्हणाला,  “ आता आपण मोठा ‘शो ’ करायचा.”
पांडे फोन वर आला.
“मला तुझी मदत हव्ये प्रेरक. ”  पाणिनी म्हणाला
“ मी करतोच तुला पण तू मात्र मला काहीच देत नाहीस त्या बदल्यात.”-प्रेरक पांडे म्हणाला
“ निस्वार्थ मैत्रीत देवाण घेवाण करायची नसते ”  पाणिनी म्हणाला
“ तुझ्या या मित्राला पोट आहे आणि नोकरीत मान सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे.”
“ दोन्ही अपेक्षा पूर्ण होतील तुझ्या. तू फक्त मी सांगतो तसं कर.मोठी सनसनाटी बातमी होणारे.तुलाच त्याचे श्रेय मिळेल.तू इन्स्पेक्टर हर्डीकर ला घेऊन दधिची अरोरा च्या घराजवळ ये.”  पाणिनी म्हणाला
 
“ हर्डीकर असेल का जाग्यावर मला शंकाच आहे. उशीर झालंय .तो बाहेर पडला असणार.” –प्रेरक
“ काहीही करून त्याला आणायचं जमव.ईशा अरोरा ला घेऊन ये तिच्या घरी. तिला चौकशीसाठी तुम्ही लोकांनी ताब्यात घेतलंय.”  पाणिनी म्हणाला
“ फार मोठी अपेक्षा करतो आहेस पाणिनी.”- प्रेरक
“ कसं जमवायच ते तू बघ. ईशा आली तर बरचं अन्यथा तू आणि हर्डीकर तर हवेतच. ”  पाणिनी म्हणाला
“ मी कुणाला गोळा करता येईल ते पाहतो. ईशा च्या घर खालच्या उतारावर थांबतो.” –प्रेरक
“ ए, असला घोळ नको घालूस.तू आधी अंदाज घे दोघांना आणू  शकतोस का याचा. नाहीतर उगाचच तिथे यायची यातायात  मी करणार नाही. पाच मिनिटांनी मी फोन करतो तुला.”
“ दहा मिनिटं दे मला.” –प्रेरक म्हणाला आणि फोन ठेवला.
“ तुझ्या डोक्यात काय प्लान चाललाय तुला पक्का माहित्ये ना पाणिनी?  ” पाणिनी म्हणाला.
“ मला वाटतंय माझी संकल्पना  स्पष्ट आहे.”  पाणिनी म्हणाला
“ माझं मत आहे की तिथे,म्हणजे अरोराच्या घरी पोलीस नसताना तू हा शो केलास तर बर राहील म्हणजे तू तुझ्या बचावा मधे कोर्टात हा मुद्दा सरकारी वकीलांना धक्का देण्यासाठी वापरू शकशील.” कनक ओजस म्हणाला.
“ त्या अर्थी मला  बचाव करायचा नाहीये. मला पोलीस हवेत तिथे.”
कनक ओजस ने नाईलाज झाल्यासारखे खांदे उडवले. “ मी सुचवायचं काम केलंय. शेवटी ही तुझी केस आहे पाणिनी.” तो म्हणाला.
पाणिनी ने त्या दहा मिनिटात दोन सिगारेट संपवल्या. प्रेरक पांडे ला फोन लावला.
“ मीच तुला करणार होतो फोन.” उत्साहात प्रेरक म्हणाला. “ हर्डीकर ला पटवण्यात मी यशस्वी झालो.पण त्याला भीती वाटत्ये की तू त्याला गंडवशील काहीतरी लोचा करून. त्यामुळे तो म्हणतो की ईशा ला न्यायला नको, तो  एकटाच येतोय. तसाही ईशा भोवती पत्रकार आहेतच ,त्यांची नजर चुकवून तिला नेणे कठीणच आहे.  ”
“ ठीक आहे निघा तुम्ही पाच मिनिटात ”. पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.
(प्रकरण १८ समाप्त)