साक्षीदार प्रकरण १०
साक्षीदार
प्रकरण १०
रात्री तीन वाजता कनक ओजस च्या घरचा फोन खणखणला.त्याने वैतागून उचलला.पलीकडून पाणिनी पटवर्धन चा आवाज ऐकून तो उडालाच.
“ तू झोपतोस तरी कधी रात्री?” त्याने फोन घेत विचारले.
“ तुला देण्यासाठी एक अर्जंट काम आहे.” पाणिनी ने कनकच्या प्रश्नाला बगल देत सांगितलं. “ तू तुझी माणसं एका कामगिरीवर लावू शकतोस का अत्ता?”
कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. या प्रकरणात काम करणाऱ्या हर्डीकर चा तो साहेब होता.अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच गैरसमजाला थारा दिला नाही.
“ पोलिसांनी हालचाल करायच्या आधी आपल्याला तिथे पोचायचंय” पाणिनी ने कनकला समजावयाचा प्रयत्न केला. “ तुझी माणसं तातडीने कामाला लावता येतील का अत्ता?”
“ पोलिसांच्या आधी कसं काय पोचता येईल आपल्याला तिथे?” -कनक
“ येईल, कारण तू पूर्वी मर्चंट्स प्रोटेक्टिव असोसिएशन या बंदूक विकणाऱ्या निम सरकारी संस्थेचं काम केल्याचं मला माहिती आहे. कोल्ट -३२ प्रकारच्या १२७३३७ क्रमांकाच्या पिस्तुलीची माहिती मला हवी आहे.पोलीस त्यांचं रुटीन म्हणून या बंदुकीची बरीच माहिती खणून काढणार आहेत,म्हणजे त्यावरचे ठसे वगैरे.त्यांच्या दृष्टीने हे काम महत्वाचं असलं तरी तातडीचं नाही.त्यामुळे ते उद्या सकाळी निवांत हे काम करतील.त्यांनी या कामाला हात लावण्यापूर्वी तुला हे काम करायचं आहे.” पाणिनी म्हणाला
“ काय झालंय या बंदुकीला?”
“ या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने एका माणसाच्या छातीचा थेट वेध घेतलाय” पाणिनी म्हणाला.
“ तू मला या आधी जे काम दिलंयस त्याचा याच्याशी काही संबंध आहे?”-कनक
“ मला नाही वाटत .” पाणिनी म्हणाला. “ पण पोलीस कदाचित संबंध लावतील.मला तर माझ्या अशिलाला संरक्षण द्यावेच लागेल. ”
“ पुन्हा कधी संपर्क करू तुझ्याशी?”-कनक
“ तू नको करू, मीच तुला तासाभराने फोन करेन.” पाणिनी म्हणाला.
“ पण पाणिनी, तासाभरात तुला हवी आहे ती माहिती मला मिळणार नाही.”
“ तुला मिळवावीच लागेल कनक.” पाणिनी म्हणाला.आणि फोन बंद केला.नंतर त्याने लगेच सौम्या सोहोनी ला फोन केला. तिचा झोपाळू स्वर त्याच्या कानात आला.
“ सौम्या, पूर्ण जागी हो.आणि कपडे करून तयार हो लगेच. आपल्याला कामाला लागायचंच” पाणिनी म्हणाला.
“ किती वाजलेत?”-सौम्या
“ पहाटेचे तीन. सौम्या तू तातडीने ऑफिस ला ये.मी तो पर्यंत टॅक्सी मागवून ठेवतो.”
“ मी कपडेच करत्ये. आहे तशी येऊ की थोडाफार मेकअप करायला पाहिजे?”
“ कर मेकअप थोडाफार पण त्यात वेळ नको घालवू.” पाणिनी म्हणाला.
लगोलग त्याने ऑफिस पाशी टॅक्सी बोलावून घेण्यासाठी फोन केला.आपल्या गाडीत बसून ऑफिस ला पोचला.सौम्या येई पर्यंत त्याला धीर नव्हता. त्याच्या सवयी प्रमाणे सतत खिशात हात घालून येरझाऱ्या घालत विचार करत राहिला. वृत्ती ने तो एक सिंह होता. लढाऊ.कधीच हार न मानणारा.पण अत्ता या क्षणी तो पिंजऱ्यात अडकल्यासारखा झाला होता.दाराला लॅच लावून किल्ली फिरवल्याचा आवाज आला.सौम्या आत आली. “ वेळे पूर्वीच आलात सर ! ” ती उद्गारली.
“ आपल्या दगदगीच्या दिवसाची ही सुरवात आहे सौम्या.” पाणिनी म्हणाला
“ काय घडलंय सर ?” तिच्या शब्दात काळजी होती.
“ खून ” पाणिनी म्हणाला.
“ आपण फक्त आपल्या अशीलाचे वकील पत्र घेतलंय एवढंच आहे की....” सौम्या ने संशयाने विचारलं.
“ नक्की नाही सांगता येणार.कदाचित त्या खुनात मी अडकला जायची....” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे त्या हरामखोर बाईने तुम्हाला ..” सौम्या चिडून म्हणाली.
“ असा विचार करणं बरोबर नाही सौम्या.” पाणिनी म्हणाला
“ मला पहिल्या पासूनच ती विश्वासार्ह वाटत नव्हती.शेवटी तिने तुम्हाला धोका दिलाच.”
“दे सोडून सौम्या, चर्चा नको. ही बाई आपल्याला प्रथम ईशा गरवारे नाव सांगून भेटली.तिच्या विनंती नुसार मी मिर्च मसाला च्या मागे लागलो आणि त्या मागच्या सूत्रधार कोण आहे याचा छडा लावला.तो दधिची अरोरा आहे हे समोर आलं.मी त्याला भेटायला गेलो तेव्हा लक्षात आलं की फार तयारीचा माणूस आहे.मी त्याच्याशी बोलत असतानाच अचानक त्याची बायको समोर आली आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ईशा होती.आपल्याकडे ईशा गरवारे नाव सांगून आलेली.तिचं खरं नाव ईशा अरोरा आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ करायचं होतं तिला? डबल क्रॉस ?”-सौम्या
“ नाही.ती अडकली होती एका प्रकरणात. एका माणसा बरोबर एका ठिकाणी होती ती .आणि तिचा नवरा त्या माणसाच्या मागावर होता पण त्याला त्या माणसा सोबत असणारी बाई म्हणजे ईशा होती हे कळलं नव्हतं.आपल्या मिर्च मसाला मार्फत त्या माणसाचा परदा फार्श करायचा त्याचा डाव होता. ते यशस्वी झालं असतं तर त्या माणसा सोबत कोण होती ते आपोआपच बाहेर आलं असतं.” पाणिनी म्हणाला
“ हा माणूस कोण आहे?” सौम्या म्हणाली.
“ हृषीकेश बक्षी ”
“ त्याला काय म्हणायचं आहे या सगळ्या बद्दल? ”-सौम्या
“ आपल्याला आज शिपाया बरोबर पाकीट पाठवणारा तोच आहे,” पाणिनी म्हणाला.
“ ओह ! ” सौम्या उद्गारली. “ उद्याच्या पेपरात काय बातमी असणारे या बद्दल?”
“ मी झोपायलाच लागलो होतो, बाहेर पाऊस पडत होता. रात्री साडे बाराच्या सुमारला ईशा चा फोन आला.ती खूप अडचणीत होती, मला तिने एका औषधाच्या दुकानात बोलावले. ती तिथे उभी होती.मला ती म्हणाली की एका माणसाचे तिच्या नवऱ्या बरोबर भांडण झालं आणि त्याने त्याला मारलं.”
पाणिनी म्हणाला
“ तो कोण होता हे तिला माहित्ये?”-सौम्या
“ नाही.तिला तो दिसला नाही. तिने फक्त याचा आवाज ऐकला.” पाणिनी म्हणाला.
“ आवाजा वरून तिला कोण माणूस आहे हे कळलं ? ”
“ तिला वाटतंय तिला ओळखता आलंय.” पाणिनी म्हणाला.
“ कोण असावा तो असं तिला वाटतंय ? ”-सौम्या.
“ मी ”
सौम्या ने आश्चर्याने तोंडाचा आ वाचला. तिच्या तोंडाला कोरड पडली. “ तुम्ही कुठे होतात तेव्हा?”
“ मी तेव्हा अंथरुणात होतो.” पाणिनी म्हणाला.
“ ते सिध्द करता येईल तुम्हाला?”-सौम्या.
“ नाही. ”
“ नंतर काय झालं सर?”
“ आम्ही घरी गेलो आणि आम्हाला तिचा नवरा मरून पडलेला आढळला. छातीतून आरपार गोळी घुसली होती. पिस्तूल बाजूला पडली होती.त्याचा नंबर घेतलाय मी. तो त्यावेळी अंघोळ करत असावा.”
“ आणि पोलिसांना बोलावण्या ऐवजी तिने आधी तुम्हाला फोन करून बोलावून घेतलं?” –सौम्या
“ एकदम बरोबर.” पाणिनी म्हणाला. “ पोलिसांना हे आवडलेलं नाहीये.”
“ इन्स्पे.हर्डीकर बरोबर मी तिथे होतो.दधिची अरोरा चा भाचा, या प्रकरणात आहे.मला तो माणूस आवडलेला नाही.का कोण जाणे. जरा जास्तच सज्जन असल्याचा आव आणतोय. एक स्वयंपाकीण बाई यात आहे.ती फारशी बोलत नाहीये. तिची मुलगी आहे तिच्या बरोबर घरी राहत्ये. ती खोटेच बोलत्ये असा मला संशय आहे. घरात इतरही नोकर चाकर आहेत पण त्यांच्याशी बोलायला मला जमलं नाही कारण पोलीस त्यांच्याशी वरच्या मजल्यावर बोलत होते तेव्हा त्यांनी मला खालीच अडकवून ठेवलं.” पाणिनी म्हणाला.
“ हर्डीकर कितपत त्रासदायक ठरू शकतो तुम्हाला?”-सौम्या.
“ चांगलाच !”
“ पुढे काय घडेल असा अंदाज आहे तुमचा?”-सौम्या
“ देव जाणे ! अत्ता काहीच अंदाज नाही येत,पण मला वाटत की ती स्वयंपाकीण बाई तोंड उघडेल लौकरच . पोलिसांनी तिच्यावर अजून त्यांच्या खाक्यात घेतलं नाहीये पण ते घेतील तिला उभं आडवं. मग बरोबर बोलेल ती ,तिला बऱ्यापैकी माहिती असावी असा माझा अंदाज आहे, काय असावी ते सांगता येत नाही. खर तर ईशा अरोरा ने मला कितपत माहिती दिल्ये या बद्दल पण मी साशंक आहे. ”
“ मला ती ईशा पुन्हा दिसली तर मी ठार मारीन तिला.” सौम्या त्वेषाने म्हणाली.
“ आता बोलून काय उपयोग आहे? मी यात गुंतलोय हे मान्य करायला पाहिजे.”
“ हृषीकेश बक्षी ला या खुनाबद्दल माहिती आहे?”-सौम्या
“ मी संपर्क करायचा प्रयत्न केला पण तो बाहेर गेल्याच कळलं” पाणिनी म्हणाला.
“ काय मुहूर्त शोधलाय बाहेर जायचा ! वाह ! ” –सौम्या.
“ खरंच.” पाणिनी थकून म्हणाला.
“ सर, खरंच सांगत्ये मी तुम्हाला, ही बया तुम्हाला फार म्हणजे फार विचित्र परिस्थितीत ओढत्ये.जो माणूस मेला,त्याच्याशी तुमचं भांडण झालं होतं.त्याच्या वर्तमान पत्राचा बुरखा तुम्ही फाडलाय. तुम्ही जेव्हा एखाद्याशी झगडता तेव्हा हळूवार पणा नसतो तुमच्यात.तुम्ही पार त्याच्या चिंधड्या उडवता. या बाईने अशी काही व्यवस्था केली की सगळ्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही तिच्या बरोबर असाल . इथेही पोलीस यायच्या आधी तुम्ही तिला भेटल असा तिने सापळा रचला.तरीही तुम्ही तिला वाचवणार आहात? ”-सौम्या.
“ मी मागे नाही फिरू शकत आता. ती अशील आहे माझी.” पाणिनी म्हणाला.
“ कशासाठी घेतलंय तिच वकील पत्र तुम्ही? तिला ब्लॅक मेल मधून वाचवायला की तिच्या वरचा खुनाचा आरोप स्वतः वर घ्यायला.?” सौम्या बोलत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू आले.तिचे आणि पाणिनी चे संबंध मालक नोकर असे नव्हते,जिगरी मैत्रीचे......... त्याच्या ही पुढचे होते.पाणिनी ने तिला जवळ घेतले तिच्या डोळ्यावरून हात फिरवून पाणी पुसले.
“ प्रत्येक वकिलाची आपल्या अशिला पोटी काही कर्तव्ये असतात सौम्या.”
“ तेच म्हणत्ये मी. तुम्ही वकील म्हणून वागा. कोर्टात खटला उभा राहू दे ,मग तुमचं वकील म्हणून काम सुरु करा.”-सौम्या
“ तसं नाही होणार या प्रकरणात.सरकारी वकील कोर्टात प्रकरण जाई पर्यंत वाट नाही बघणार.पोलीस आधीच घटना स्थळी आलेत आणि त्यानी साक्षीदारांचे जबाब नोंदवायला सुरुवात केल्ये.कुणाल गरवारे च्या तोंडून ते असं काही वदवून घेतील की उद्याच्या पेपरात ती ठळक बातमी असेल आणि प्राथमिक सुनावणी सुरु होईल तेव्हा या बातम्या आपल्या अशिलाच्या दृष्टीने घटक ठरतील.” पाणिनी म्हणाला.
पाणिनी शी वाद घालून त्याला थांबवणे शक्य नाही हे सौम्या च्या लक्षात आले.
“ तुम्हाला काय वाटतंय सर, ते ईशा ला अटक करतील? ”
“ अत्ता काही सांगता येत नाही ते.”
“ त्यांना खुनाचा हेतू शोधून काढता आलाय?”- सौम्या
“ नाही अजून.म्हणूनच ते अजून तिला हात लाऊ शकले नाहीत.पण त्यांना ब्लॅक मेलिंग किंवा होल्ड अप आणि गोळीबार या गोष्टी समजतील तेव्हा आपोआपच खुनाचा हेतू स्पष्ट होईल. ”
“ तुम्हाला काय वाटतं सर, अरोरा वर गोळी झाडली गेली तेव्हा त्याच्या खोलीत असलेला माणूस म्हणजे हृषीकेश बक्षी असेल?” अचानक सौम्या ने विचारलं.
“ मी त्याला संपर्क करायचा खूप प्रयत् केला पण जमलं नाही.तरीसुद्धा मला तो असेल असं नाही वाटत. सौम्या, एक काम कर, दर दहा मिनिटांनी सतत याला फोन करत रहा.जो पर्यंत तो फोन घेत नाही तो पर्यंत किंवा त्याचा फोन दुसरं कोणीतरी उचलत नाही तो पर्यंत. आणि कनक ला पण फोन लाव.” पाणिनी म्हणाला
“ हो सर ” सौम्या म्हणाली.
पाणिनी पुन्हा अस्वस्थ पणे फेऱ्या मारायला लागला.थोडया वेळात कनक चा फोन आला. “ तुला त्या बंदुकी बद्दल चांगली बातमी द्यायची आहे पाणिनी.” कनक ओजस म्हणाला.
“ तुझं बोलणं कोणी ऐकत नाहीये ना? बिनधास्त बोलू शकतो ना आपण ?”पाणिनी ने विचारलं.
“ अगदी.काहीच प्रॉब्लेम नाही.” कनक म्हणाला.
“ बोल मग.” पाणिनी म्हणाला.
“ ती बंदूक कधी आणि कुठून खरेदी केली यात तुला फार स्वरस्थ्य नसेल असं मला वाटत, तुला फक्त ती बंदूक कोणी खरेदी केली एवढंच हवं असेल ना?” कनक ने अंदाज केला
“ बरोब्बर”
“ मधुदीप माथूर नावाच्या माणसाने.१३२२ , रिगेलिया अपार्टमेंट, असा पत्ता आहे.”
“ गुड, त्या फिरोज लोकवाला बद्दल काही समजलं का?” पाणिनी ने विचारलं.
“ माझ्या शी टाय अप असलेल्या माझ्या त्या भागातील एजन्सी कडून मला अजून माहिती आली नाही. माहिती मिळायला लागली होती पण नंतर अचानक पुढची लिंक तुटली, मला वाटतंय की त्याच ठिकाणी त्याने त्याचे नाव बदलले असावे.” कनक म्हणाला. “ पण तो ज्या पोरीला फिरवतो, तिच्या बद्दल माहिती मिळा ल्ये. तिच नाव आहे जिज्ञासा निकम.ती मागच्या महिन्यापासून चक्रवर्ती हॉटेल मधे रूम नंबर ९४६ मधे राहत्ये.तिच्या बद्दल आणखी माहिती काढतोय आम्ही.”-कनक म्हणाला
“ कनक, एक काम कर त्या मधुदीप माथूर ला तातडीने गाठ आणि सांग की अरोरा चा रात्री खून झालाय आणि ज्या बंदुकीने हा खून झालंय ती बंदूक त्याने म्हणजे मधुदीप माथूर ने खरेदी केलेली होती असं रेकोर्ड वर दिसतंय.त्याला म्हणावं की यात काहीतरी चूक झालेली दिसत्ये आणि त्याची बंदूक त्याच्याच कडे असणार याची मला म्हणजे तुला खात्री आहे. किंवा त्याच्या कडे अत्ता बंदूक नसेल तर ती कुठे आहे? खून झाला त्या वेळी तो कुठे होता या बद्दल त्याने स्पष्टीकरण दिलेलं बर.त्याला असं वाटलं पाहिजे की तुला त्याच्या बद्दल खूप काळजी वाटत्ये म्हणून तू त्याला सावध करण्याच्या दृष्टीने चौकशी करतो आहेस.” पाणिनी म्हणाला.आणि फोन ठेवला.
सौम्या आत आली. “ बाहेर एक माणूस आलंय ,तो आपलं नाव पांडे आहे असं सांगतोय.त्याला तुम्ही ओळखता म्हणे,तो पोलीस खात्यात गुप्त हेर आहे असं त्याचं म्हणणं आहे.”
“ पटवर्धन, तू मला पैसे चारून एका फोन नंबर वरून नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं होतास.मी ते काम केलं, नंतर तू त्या पत्त्यावर गेलास आणि तिथे एक खून झाला . आता मला सांग, हा योगायोग आहे?”
“ तुला काय वाटतंय?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नको विचारू.”
“ उत्तर असं आहे, की मृत माणसाच्या बायको च्या विनंती वरून मी तिथं गेलो होतो.” पाणिनी म्हणाला.
“ आश्चर्य वाटतं, मेलेला माणूस तुझ्या ओळखीचा नाही पण त्याची बायको ओळखीची आहे तुझ्या.” पांडे म्हणाला.
“ असं होतं कधी कधी.” पाणिनी म्हणाला.
“ हे विशेष आहे की बायको तुझी अशील आहे पण तिने तुला घरचा फोन नंबर दिलं नाही. तुला एक गुप्त फोन नंबर दुसऱ्या मार्गाने मिळाला आणि तो नेमका तुझ्या अशिलाच्या घरचा निघाला.”
“ मी आज अपरात्री माझ्या ऑफिस ला आलोय,तू सहज आला नाहीस हे नक्की. तू मुद्द्याचं काही बोलायला आलायस की...” पाणिनी म्हणाला.
“ तू मला काही सांगणार नसलास तर मी माझ्या पद्धतीने माहिती काढीनच” पांडे म्हणाला आणि बाहेर पडला.
“ सौम्या आधी तो बाहेर गेलंय का बघ आधी ” पाणिनी म्हणाला.
तेवढ्यात दार पुन्हा उघडलं गेलं आणि पांडे डोकं आत घालून म्हणाला, “ या वेळी तू जिंकलास पाणिनी, मी गेलो असं समजून तू सौम्या शी काहीतरी बोलशील असं वाटलं होतं ! पण तू माझ्या अपेक्षे पेक्षा चतुर निघालास.”
एवढं बोलून तो बाहेर पडला.
पाणिनी ने घड्याळात पाहिले, पहाटेचे चार वाजायला आले होते.
(प्रकरण १० समाप्त.)