Get it on Google Play
Download on the App Store

६ जशास तसे २-५

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

तरीही त्यांनी मुलीचा विचार घेतला.कमलने साळसूदपणे तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही मला रावसाहेब पसंत आहेत असे उत्तर दिले.

थोडय़ाच दिवसांत थाटामाटात रावसाहेबांचा विवाह संपन्न झाला.रावसाहेबांच्या पाठीमागे काही लोकांनी टीका केली.

बुढ्ढा घोडा लाल लगाम असा त्यांच्या टीकेचा आशय होता.दोघांचा संसार सुरू झाला.

कली अजून काय काय खेळ करणार होता ते कलीलाच माहीत होते. 

मोठ्या थाटामाटात रावसाहेबांच्या इभ्रतीला साजेल असा विवाह संपन्न झाला.नाक मुरडणाऱ्यांनी नाके मुरडली.नाव ठेवणाऱ्यानी नावें ठेवली.मानलेली मुलगी म्हणून बंगल्यात फिरता फिरता कमलने रावसाहेबांना फशी पाडले.असा एकूण सगळ्यांच्या बोलण्याचा सूर होता.श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता असे होण्यासाठी कमलने म्हाताऱ्याशी विवाह केला असे सर्व म्हणत होते.रावसाहेबांचा दबदबा आणि धाक एवढा होता की प्रत्यक्ष त्यांच्या तोंडावर कुणाचीही कांहीही बोलण्याची हिंमत नव्हती.रावसाहेबांना चार शब्द सुनावील असे कुणी वडीलधारेही नव्हते.

रावसाहेब हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले.इकडे सर्व कारभार भाऊसाहेबांच्या हातात होता. पंधरा दिवस स्वित्झर्लंडमध्ये घालवून नंतर पंधरा दिवस युरोपातील महत्त्वाची शहरे पाहून महिन्याभराने दोघेही घरी परतले.मधुचंद्राचा काळ दोघांनाही खूप खूप आनंदाचा गेला.दोघांची ओळख खूप वर्षे होती.कमल लहानपणापासून बंगल्यावर वत्सलाबाईंबरोबर येत होती.परंतु ती ओळख वेगळी होती.आता दोघांचे नाते पती पत्नीचे होते.मधुचंद्रात त्यादृष्टीने परस्परांची ओळख होणे महत्त्वाचे असते.त्यासाठीच मधुचंद्राला जाण्याची कल्पना आहे.

युरोपहून परत आल्यावर दोघांचेही रुटीन सुरू झाले. जवळजवळ महिनाभर रावसाहेब येथे नसल्यामुळे कितीतरी कामे त्यांच्यासाठी तुंबली होती.त्या सर्व कामात रावसाहेब गूंतून गेले.या काळात रावसाहेबाना कमलकडे जास्त लक्ष देणे शक्य झाले नाही.कमल वेळ घालवण्यासाठी क्लबमध्ये जाऊ लागली.रावसाहेबांची त्याला मुळीच हरकत नव्हती.उलट त्यांनी कमलला त्यासाठी प्रोत्साहन दिले.कमलच्या हातात आता भरपूर पैसा खेळू लागला होता .         

वत्सलाबाई आता रावसाहेबांच्या सासूबाई होत्या.त्या पूर्वीप्रमाणे रावसाहेबांकडे स्वयंपाक करीत राहणे शक्यच नव्हते. भाऊसाहेबांनी वत्सलाबाईना   स्वतंत्र बंगला दिला होता.व्यवस्थित राहता येईल एवढी रक्कम त्यांना दर महिन्याला पोचती केली जात होती.अधूनमधून वत्सलाबाई बंगल्यावर रुबाबात येत असत.कधी कधी दोघेही वत्सलाबाईंकडे जात असत.एकूण सर्व कांही आलबेल आहे असे दिसत होते.     

नवीन खात्रीची प्रामाणिक स्वयंपाकीण  नेमण्यात आली होती .वत्सलाबाईंच्या रिकाम्या झालेल्या आऊटहाऊसमधील जागेत आता ती तिच्या कुटुंबीयांसह राहात होती.बाईसाहेब म्हणून कमलचा रुबाब आता पाहण्यासारखा होता.तिला बंगला नवीन नव्हता.नोकरचाकर मंडळीही नवीन नव्हती.फक्त तिची भूमिका आता बदलली होती.नोकरानी तिला पूर्वीप्रमाणे कमल म्हणून न वागवता बाईसाहेब म्हणून वागवणे आवश्यक होते.नोकर मंडळी थोड्याच दिवसांत त्यांची पायरी ओळखून बाईसाहेबांबरोबर वर्तन करू लागली.जर एखाद्याने चुकीचे वर्तन केले तर त्याची बदली कारखान्यात किंवा आणखी कुठे तरी होत होती.दोघेही स्वित्झर्लंडला गेलेले असताना भाऊसाहेबांनी सगळ्यांची शाळा घेतली होती.विशेष समस्या कुठेच आली नाही.  

रावसाहेब जरी चाळिशीचे दिसत असले तरी त्यांचे वय पन्नास होते.कमल केवळ वीस वर्षांची होती. पत्नी म्हणून रावसाहेबांकडून तिच्या कांही अपेक्षा होत्या.पन्नाशीतील रावसाहेब तिला पैसा कितीही देत असले, प्रेम कितीही करीत असले तरी तिच्या तारुण्यसुलभ, स्त्रीसुलभ, सर्व अपेक्षा त्यांना पूर्ण करता येणे शक्य नव्हते.तारुण्याचा जोम, नवविवाहिताचा तो उत्साह,त्यांनी कितीही आणण्याचा प्रयत्न केला तरी तो जोम, तो उत्साह, आणणे त्यांना शक्य नव्हते.सर्व सोंगे आणता येतात परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही त्याप्रमाणेच असेही म्हणता येईल की सर्व सोंगे आणता येतात परंतु तारुण्याचे सोंग आणता येत नाही.

कमलला आपल्या इच्छांना,अपेक्षांना, मुरड घालणे आवश्यक होते.ते ती प्रामाणिकपणे करीतही होती.थोडक्यात जोडा कुठे बोचतो ते जोडा घालणार्‍याला कळते.इतरांना फक्त लंगडणे दिसते ते तर्क करीत बसतात असो.   

असेच दिवस चालले होते.बघता बघता त्यांच्या लग्नाला सहा महिने उलटून गेले होते.कमल शक्य तेवढी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती.रावसाहेब त्यांच्या नेहमीच्या कामामध्ये गुंग झाले होत.एखाद्या नवविवाहितेप्रमाणे कमलभोवती गुंजारव करणे त्यांना अर्थातच शक्य नव्हते.तारुण्याचा उत्साह, तारुण्याची ऊर्जा,तारुण्यातील इच्छा,तारुण्यातील जोम, पन्नाशीमध्ये असणे शक्य नव्हते.

कमलला कांहीही काम नव्हते.रिकामे मन सैतानाचे घर अशी एक म्हण आहे.तिच्या डोक्यात कांही कांही भलते सलते विचार येऊ लागले.तिला दिवस राहते तर ती त्यामध्ये गुंतून गेली असती.प्रसूती, लहान मूल संगोपन, इत्यादीमध्ये तिचा वेळ गेला असता.दुर्दैवाने तसे कांही होण्याची शक्यता दिसत नव्हती.तिला एक प्रकारच्या औदासीन्याने घेरून टाकले होते.घरात रिकामे बसून तिला कंटाळा येत होता.

वेळ घालविण्यासाठी ती क्लबमध्ये जाऊ लागली. क्लबमध्ये सर्व प्रकारच्या,सर्व वयाच्या, पुरूषांची व स्त्रियांची भेट होत होती.तिथे तिची परेशशी भेट झाली.परेश एक तिशीचा देखणा तरुण होता.एकाकी,वेळ कसा घालवावा अशा विचारात असलेल्या,श्रीमंत स्त्रिया हेरून त्यांना नादी लावणे आणि सर्व प्रकारची मजा मारणे,हा त्याचा उद्योग होता.स्त्रियाही त्याच्या  नादी लागत असत. गोड गोड बोलून स्त्रियांना आपल्या जाळ्यात कसे ओढावे व त्यातच गुंतवून ठेवावे यात तो माहीर होता.त्याने कमलला बरोबर हेरले.त्याच्या नेहमीच्या तंत्राने त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले.तीही हळूहळू वाहू लागली.प्रथम त्याने तिला ड्रग्जची सवय लावली.हळूहळू ती त्याच्या आहारी गेली. 

नेहमी राजरोस भेटता यावे म्हणून परेशने भाऊसाहेबांकडे नोकरी मिळविली.तसा तो हुशार आणि हरहुन्नरी होता.कुणालाही आपलेसे करण्याची त्याची हातोटी विलक्षण होती.फक्त त्याचे कसब, त्याची बुद्धी, त्याच्या क्लृप्त्या, अयोग्य मार्गाने धावत होत्या.जर तो योग्य मार्गाने गेला असता,जर त्याने आपली बुद्धी योग्यप्रकारे योग्य कारणासाठी वापरली असती, तर तो कुठच्या कुठे गेला असता.

त्याने प्रथम योजनापूर्वक भाऊसाहेबांचा विश्वास कमावला.त्यांच्यामार्फत त्याने रावसाहेबांचा विश्वास कमावला.आपला खरा हेतू त्याने कधीही कुणालाही कळू दिला नाही.अनेक पावसाळे पाहिलेल्या भाऊसाहेबांचा व रावसाहेबांचा विश्वास संपादन करणे ही कांही साधी गोष्ट नव्हती.त्याने ती चतुरपणे साध्य केली.कामाच्या निमित्ताने त्याचे बंगल्यावर येणे जाणे सुरू झाले.कमलशी अगोदरच क्लबमध्ये ओळख झाल्याचे त्याने कुठेही दर्शविले नाही.सर्वस्वी अनोळखी म्हणून तो रावसाहेबांच्या देखत प्रथम कमलला भेटला.जेव्हां जेव्हां बंगल्यावर कमल भेटे तेव्हां तेव्हां तो तिच्याशी आदरयुक्त अदबयुक्त वर्तणूक ठेवत असे.

रावसाहेबांच्या विवाहाला दीड वर्ष झाले होते.आपण अस्वस्थ आहोत, अतृप्त आहोत, हे तिने कधीही कुणालाही जाणवू दिले नव्हते.फक्त धूर्त  परेशच्या ते लक्षात आले होते.दोघेही रावसाहेबांच्या नकळत बाहेर भेटू लागली होती.क्लबमध्ये तर त्यांच्या भेटी होतच होत्या.बंगल्यावरही कमल भेटत असेच.हळूहळू त्यांचे संबंध बरेच पुढे गेले होते.थोडय़ाच महिन्यांत त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.

एकदा मनुष्याचे पतन व्हायला लागल्यावर तो बऱ्याच वेळा त्याच्या मनात असूनही स्वतःला सावरू शकत नाही.घसरगुंडीवर एकदा आपण घसरू लागलो की शेवटी पायथ्यापर्यंत येऊन थांबतो.स्वत:ला मध्ये रोखणे आणि परत होतो त्या उंचीवर जाणे बर्‍याच  जणांना शक्य होत नाही.कमलची परेशच्या नादाने घसरगुंडी सुरू झाली होती.आता ती घसरगुंडीचा   शेवट गाठीपर्यंत परत फिरू शकणार नव्हती.कमलने सर्व ताळतंत्र हळूहळू सोडला.

अर्थात दोघेही रावसाहेब व भाऊसाहेब यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे संबंध ठेवीत होते.भेटत होते.सर्व प्रकारची काळजी घेत होते.तरीही केव्हां ना केव्हां त्यांचे बिंग बाहेर पडले असते.परेशला केवळ कमलचा नव्हे तर रावसाहेबांच्या इस्टेटीचा मोह निर्माण झाला होता.किंबहुना कमलच्या मार्फत इस्टेट मिळविणे हे त्याचे अंतिम ध्येय होते.त्याला एकाच वेळी कमल व गडगंज संपत्ती हवी होती.त्यादृष्टीने त्याने पहिल्यापासून अत्यंत काळजीपूर्वक फासे फेकले होते.प्रथम कमलशी केवळ ओळख,अत्यंत सभ्य वर्तणूक,तिच्या कमजोरीची चाचपणी,भाऊसाहेबांकडे नोकरी मिळविणे,हळूहळू कमलशी जास्त घसट,रावसाहेबांचा व भाऊसाहेबांचा विश्वास संपादन करणे,कमलशी अत्यंत जवळकीचे संबंध प्रस्थापित करणे,तिला नादी लावणे,तिला ड्रग्जची सवय लावणे,तिचाही विश्वास संपादन करणे,या सर्व पायर्‍या  त्याने हळूहळू काळजीपूर्वक ओलांडल्या होत्या.आता शेवटची पायरी शिल्लक राहिली होती.  

*एक दिवस त्याने हळूच कमलशी एकांतात असताना विषय काढला.*

*जर रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि त्यांनी मृत्यूपत्र केलेले नसेल तर सर्व मालमत्तेची कमल मालकीण होईल.*

*त्यांनी मृत्युपत्र केले आहे का आणि त्यातील तरतुदी कोणत्या आहेत याची त्याने चौकशी केली.*

*कमलने रावसाहेबांकडे कौशल्याने विषय काढून, त्यांनी मृत्युपत्रात तिचेच नांव टाकले आहे  याची खात्री करून घेतली.*

*एकदा ती माहिती परेशला कळल्यावर त्याने त्याची पुढील योजना अमलात आणायला सुरुवात केली.*

*त्याने एका अशा विषाची माहिती कमलला दिली की ते रोज अल्पप्रमाणात रावसाहेबांना दिले तर हळूहळू खंगत जाऊन त्यांचा सहा महिने ते वर्ष या कालावधीत मृत्यू होईल.*

(क्रमशः)

२२/६/२०२१©प्रभाकर  पटवर्धन