Get it on Google Play
Download on the App Store

८ जशास तसे ४-५

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

सूडाच्या भावनेने, कमल व परेश यांना धडा शिकवण्याच्या हेतूने, ते तसेच भूतयोनीत तरंगत राहिले.

सूड घेतल्याशिवाय त्यांना शांती, पुढील गती मिळणार नव्हती.

कमल व परेश यांना देहांत शासन झाल्याशिवाय रावसाहेबांचा अस्वस्थ अतृप्त आत्मा थांबणार नव्हता. 

रावसाहेबांपुढे(यापुढे रावसाहेबांच्या भुताचा रावसाहेब म्हणूनच उल्लेख केला जाईल)सूड कसा घ्यावा हा प्रश्न होता.एकदा त्यांना वाटले एक घाव दोन तुकडे करून विषय संपवून टाकावा.अजून त्यांच्या शक्ती मर्यादित होत्या. ज्याप्रमाणे मनुष्याच्या बाबतीत  लहानपणी शक्ती मर्यादित असतात, तरूणपणी शक्ती जास्तीत जास्त असतात,म्हातारपणी हळूहळू कमी होत जातात,तसेच भुतांच्या बाबतीतही असावे! 

रावसाहेबांच्या शक्ती मर्यादित असल्यामुळे,ते स्वतंत्रपणे कांही करू शकत नव्हते.त्यांना माध्यमाची गरज होती. माध्यम म्हणून परेशचा वापर करावा असे त्यांनी ठरविले.शिक्षा कोण करीत आहे आणि शिक्षा कशासाठी केली जात आहे तेही माहीत होणे आवश्यक होते.परेशच्या माध्यमामार्फत' कमलच्या पुढ्यात तिने केलेल्या चुकांचा, विश्वासघाताचा पाढा, वाचावा,रावसाहेब पुढील गतीला न जाता केवळ सूड घेण्यासाठी,गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी मागे राहिले हे तिच्या लक्षात आणून द्यावे  व नंतर तिला  मृत्युदंडाची शिक्षा ठोठवावी असा एक विचार त्यांनी केला.पैशाच्या  व शरीरसुखाच्या अती लोभापायी तिने रावसाहेबांना ठार मारले होते.या गुन्ह्याला मृत्युदंडापेक्षा कमी शिक्षा देता येणार नाही असे रावसाहेबांना वाटत होते.नंतर दुसऱ्या एखाद्या माध्यमाच्या द्वारे परेशच्या पुढ्यात  त्याच्या चुकांचा पाढा वाचावा.आणि  त्याला मृत्युदंड द्यावा असे सुरवातीला त्यांना वाटत होते. 

रावसाहेब शिक्षा करीत आहेत हे ऐकल्यावर दोघांचेही अवसान गळाले असते.दोघांनीही माफीची याचना केली असती.पश्चात्तापदग्ध झाल्याचे खरे किंवा खोटे नाटक वठविले असते.परिणामी रावसाहेब त्यांच्या मनुष्ययोनीतील स्वभावानुसार  नरम पडले असते.

मृत्युदंडाच्या शिक्षेने क्षणिक पश्चात्ताप, त्रास, उद्वेग, दु:ख,भीती इत्यादी विकार होतात. जीवन संपणार मृत्यू येणार या कल्पनेने अतीव वाईट वाटते. मृत्यूनंतर काय होणार हे अर्थातच माहीत नसते.जीवनात असलेले सर्व बंध तुटणार सुटणार याचे दु:ख असते.मृत्यूबरोबर सर्व संपते.तत्काळ मृत्यू याऐवजी  नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जर आपण केलेल्या अपराधाची गुन्ह्य़ाची सतत टोचणी राहील,आपली हल्लीची अवस्था ही त्या गुन्ह्याची शिक्षा आहे याची प्रत्येक दिवशी गुन्हेगाराला  जाणीव होत राहील तर ती शिक्षा श्रेष्ठ होय असे रावसाहेबांचे मत होते.

रावसाहेबांनी मृत्युदंडाऐवजी वेगळीच शिक्षा दोघांना करण्याचे ठरविले.प्रथम त्यांनी दोघांनाही घाबरवून सोडण्याचे ठरवले.ते स्वप्नात जाऊ शकत होते. रावसाहेबांचे दिवसवार झाले सर्वकांही स्थिरस्थावर झाले असे दोघांनाही वाटू लागले होते.आपले पाप, आपला गुन्हा, उघडकीला आला नाही याबद्दल दोघांची खात्री पटली होती.रावसाहेबांच्या मृत्यूनंतर दोघांनाही भीती वाटत होती.कुणीतरी त्यांच्या मृत्यूबद्दल शंका प्रगट करील,हा मृत्यू नैसर्गिक नाही असा आरोप करील,अशी भीती त्यांना वाटत होती.परंतु तसे कांही झाले नाही. साधी कुजबुजही झाली नाही.उलट प्रत्येक जण फार वाईट झाले.रावसाहेबांचे कांही वय झाले नव्हते.इतक्या लवकर ते जातील असे वाटत नव्हते.बाईसाहेबांच्या म्हणजे कमलच्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली.एवढे औषधपाणी केले तरी कांहीही उपयोग झाला नाही. रावसाहेबांजवळ अमाप संपत्ती होती .त्यांनी उपचारांसाठी परदेशात जायला हवे होते.अशा स्वरुपाचे सर्वसाधारण उद्गार सर्व जण काढीत होते.

रात्री कमल झोपली होती.तिचे मन कुठेतरी आत तिला कुरतडत होते."बाई तू केलेस ते योग्य नाही"तिची झोप अस्वस्थ होती.रावसाहेब गेल्यापासून तिला स्वस्थ अशी झोप लागलीच नव्हती.परेश व ती यांची भेट रोज होत होती परंतु एकांतात त्यांची भेट झाली नव्हती.सर्व कांही स्थिरस्थावर   झाल्यावरही त्यांना एकांतात भेटण्यास कुठेतरी संकोच वाटत होता.गिल्टी कॉन्शसनेस होता. अपराधी मनाची बोच होती.ती सारखी कूस बदलत होती.रावसाहेबांची तिला आठवण येत होती.एवढ्यात साक्षात रावसाहेब तिच्या पुढ्यात उभे होते.त्यांनी बोलण्यास सुरुवात केली."कमल मी तुला कांहीही कमी केले नाही.लग्नापूर्वी मी तुझी संमती घेतली होती.तुला म्हटले होते बघ नीट विचार कर.तुझ्या व माझ्या वयात खूप अंतर आहे.सुरूवातीला भावनेच्या  भरात आपण निर्णय घेतो.दीर्घकाळानंतर त्याचा पश्चात्ताप होऊ लागतो.तू त्यावर दोन दिवस विचार करून, हो माझी संमत्ती आहे असे म्हणाली होतीस.तुला परेश भेटला.त्याने तुला नादी लावले.आणि तू त्याच्या नादी लागलीस.तू वाहवत गेलीस.तू इतकी बेताल झालीस की शेवटी तू विष देऊन मला ठार मारलेस.शेवटच्या कांही दिवसांत मला तुमच्या कटाचा पत्ता लागला होता.मी सर्व पुरावा गोळा केला होता.मला तुझ्या वर्तनाचा धक्का बसला होता.मी भाऊसाहेबांना सांगून सर्व कांही व्यवस्थित करणार होतो .परंतु त्याच रात्री माझा मृत्यू झाला.मी गोळा केलेला पुरावा तुला सापडला हे मला माहीत आहे.तू तो नष्ट केला आहेस.तुम्हा दोघांवर सूड उगवल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही.मी तुमच्या आसपास सतत वावरत आहे.मी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.तुला मी सावध करीत आहे."असे प्रदीर्घ भाषण करून रावसाहेब तिच्या स्वप्नातून अंतर्धान झाले.

कमल झोपेतून जागी झाली.नाइट लॅम्पच्या मंद प्रकाशात ती इकडेतिकडे पाहात होती.स्वप्नात दिसलेले रावसाहेब इतके खरे होते की ते खोलीत आपल्या समोर उभे आहेत असा तिला भास होत होता.तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता.तिचे शरीर थरथरत होते.तिने दिवा लावला.फ्रीज उघडून ती गार पाणी घटाघटा प्यायली.तिच्या शरीराचा कंप थांबत नव्हता.ती पांढरी फटक पडली होती.रावसाहेबांचा स्वभाव तिला माहीत होता.रावसाहेब आता आपल्या दोघांना त्यांच्या पध्दतीने कठोर शिक्षा केल्याशिवाय सोडत नाहीत याची तिला खात्री पटली.स्वप्नानंतर सकाळपर्यंत तिला झोप लागली नाही.

दिवस कसाबसा पार पडला.दुपारीही तिला विशेष झोप लागली नाही.रात्री झोपण्याची तिला भीती वाटत होती.झोपले की स्वप्न पडणार. रावसाहेब स्वप्नात येणार.तळमळत असताना तिला झोप लागली.थोडय़ाच वेळात रावसाहेब स्वप्नात आले.ते तिला  काय काय ऐकवत होते.रावसाहेब गेल्यावर ती स्वप्नातून दचकून जागी झाली.थरथर, कंप, घशाला शोष, पांढरी फटक पडणे,रात्रभर झोप न येणे,प्रचंड भीती, सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली.

ही गोष्ट आता रोजचीच झाली होती.अगोदर स्वप्न पडेल म्हणून झोप न येणे, तळमळ, शेवटी त्यातच झोप लागणे,नंतर स्वप्न,जागृती व पुन्हा झोप न येणे,या गोष्टींची रोज पुनरावृत्ती होत होती.झोपेअभावी कमलला वेड्यासारखे झाले होते.झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नव्हती.ड्रग्जचा डोस वाढवूनही शांती मिळत नव्हती.रावसाहेब स्वप्नात येण्यापुरतीच झोप लागत होती.

अशा परिस्थितीत ती फार दिवस जगेल असे वाटत नव्हते.रावसाहेबांना तिची परिस्थिती दिसत होती.तिचा खंगून खंगून मृत्यू त्यांना अपेक्षित नव्हता.याहूनही तिला कडक शिक्षा देण्याचे त्यांच्या मनात होते.त्यांनी तिच्या स्वप्नात येण्याचे बंद केले.कमलला बऱ्याच दिवसांत स्वप्न पडले नाही.भीतीने, निद्रानाशामुळे,झोपेच्या गोळ्यांच्या व ड्रग्जच्या अतिरेकामुळे खालावलेली तिची प्रकृती सुधारू लागली होती.रावसाहेब पुढील गतीला गेले असे तिला वाटू लागले होते.किंबहुना रावसाहेब प्रत्यक्षात भूत योनीत नाहीत.ते आपल्या स्वप्नात आले  नव्हतेच.आपलेच मन आपल्याला खात होते.स्वप्न हा त्याचा आविष्कार होता.आता सर्व काही आलबेल झाले आहे असे वाटू लागले होते.

इकडे परेशची स्थितीही कांही फार वेगळी नव्हती.त्याच्याही स्वप्नात रावसाहेब येत होते.कमलच्या स्वप्नातून बाहेर पडल्यावर ते परेशच्या स्वप्नात येत असत.केव्हां अगोदर परेशच्या स्वप्नात येऊन त्याला चार कठोर शब्द सुनावून नंतर ते कमलच्या स्वप्नात येत असत.परेशच्या स्वप्नात त्यांची वर्तणूक जास्त कठोर असे.स्त्रियांना नादी लावण्याचा त्याचा स्वभाव,पैशासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाण्याची त्यांची वृत्ती,त्याची स्त्री लालसा,खुनशी वृत्ती,पाताळयंत्रीपणा,या सर्वांवर ते कोरडे ओढीत असत.तुला मी तसा सोडणार नाही.तू माझ्या कमलला नादी लावलेस.तिला बिघडवलेस.जगातील कोणतीही कठोर शिक्षा तुझ्या गुन्ह्याला अपुरीच आहे असे बजावत असत.तुझ्या पाताळयंत्रीपणामुळे माझा अकाली मृत्यू झाला.मी व भाऊसाहेब इतके पावसाळे बघितलेले असूनही तुला ओळखू शकलो नाही. शेवटी शेवटी  तुझा कट मला समजला होता.मी त्यावर उपाययोजना करणार होतो.तुला जन्माची अद्दल घडविणार होतो.परंतु दुर्दैवाने त्याच रात्री माझा मृत्यू झाला.तुमचा सूड घेण्याची इच्छा मनात धगधगत असताना मला पुढील गती मिळणे,अशक्य होते.मी इथेच तुमच्या आसपास घोटाळत आहे.तुम्हाला जन्माची अद्दल घडविण्यासाठी मी स्वतःशीच वचनबद्ध आहे.कठोरातील कठोर शिक्षा तुला केल्यावरच मला मुक्ती मिळेल.इत्यादी गोष्टी रावसाहेब परेशला सुनावीत असत.

प्रत्येक क्रूर, दुष्ट, पाताळयंत्री, मनुष्याच्या मनातही कुठेतरी सत्प्रवृत्ती बीज रूपाने असते.तिची अंतर्गत टोचणी असते.

बाहेरील टोचणीपेक्षा ही अंतर्गत टोचणी त्याला जास्त त्रास देते.परेश दोन्ही बाजूंनी कातावला त्रासला होता.

रावसाहेब कोणती कठोर शिक्षा करणार याने तो धास्तावला होता.आपण केले ते योग्य नाही याची अंतर्गत टोचणीही त्याला अस्वस्थ करीत होती.

तोही निद्रानाशाने पछाडला गेला होता.बंगल्यावर यायला, कमलला भेटायला,त्याला भीती वाटत होती.दोघांना पूर्ण मोकळीक असूनही रावसाहेबांच्या भीतीमुळे त्यांची भेट होत नव्हती. परस्परांना फोन करायला, व्हिडिओ कॉल करायलासुद्धा, त्यांना भीती वाटत असे.

*रावसाहेब कुठेतरी आसपास असतील.त्यांच्या शक्ती अमर्याद असतील.ते ऐकतील.ते आणखी कठोर शिक्षा करतील या भीतीखाली दोघेही राहत होती.*

*रावसाहेबांच्या मनात काय होते.*

*त्यांच्या शक्ती कशा वाढत होत्या.*

*ते कोणती शिक्षा करणार होते.*

*ते भविष्यकाळातच कळणार होते.* 

(क्रमशः)

२५/६/२०२१©प्रभाकर  पटवर्धन