Get it on Google Play
Download on the App Store

१० ग्यानबाचा सूड १-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

नदीच्या काठी हिरवागार मळा फुलला होता.भरतीचे खारे पाणी मळ्यात येवू नये म्हणून अर्थातच भक्कम बांध घातलेला होता.त्याची डागडुजी करण्याचे काम सर्वच मळेकर्‍यांना करावे लागे.मळ्यातील जवळजवळ निम्मा भाग सदुभाऊ खोतांचा होता.उरलेल्या भागामध्ये अनेक पाट्या होत्या.पाटी म्हणजे सुमारे वीस फूट रुंदीचा मळ्याच्या लांबीइतका पसरलेला भाग.सदूखोत म्हणजे एक इरसाल असामी होती.ब्रिटिशपूर्व काळात खोत हा शासनाचा प्रतिनिधी असे.ब्रिटिश राज आल्यानंतरही तीच व्यवस्था कांही काळ चालू होती.खोत कोकणात असत.जसे घाटावर देशमुख देशपांडे पाटील मंडळी तसेच कोकणात खोत मंडळी.सरकारी सारा गोळा करावा त्यातील काही भाग आपण स्वत:ला मेहनताना म्हणून राखून ठेवावा उरलेला सरकार दरबारी जमा करावा अशी व्यवस्था होती.ब्रिटिश राज येण्यापूर्वी शासन बदलत असे.मराठे मुगल आणखी कुणी मुसलमान राजे असत.सामान्यतः खोत तोच असे.पूर्व निश्चित सारा त्याला शासन दरबारी जमा करावा लागे.समजा तितका पैसा वसूल झाला नाही तरी त्याला स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत.

मनुष्य स्वभावाप्रमाणे पाटील,देशमुख, देशपांडे, ही  मंडळी जशी प्रजाहितदक्ष, प्रेमळ किंवा अत्याचारी, वेळप्रसंगी क्रूर असत त्याप्रमाणेच खोत मंडळीही होती.थोडक्यात खोत हा गावाचा अनभिषिक्त राजा होता.त्याच्याकडे सारा गोळा करण्याचे अधिकार असल्यामुळे त्याला त्यासाठी हाताखाली मंडळी व सत्ताही दिलेली असे.

खोताची सत्ता गेली. सारा गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा ब्रिटिश सरकारने उभी केली.काप गेले आणि नुसती भोके राहिली.तरीही अंगात मुरलेली  पिढ्यानपिढ्याची मस्ती गेली नाही.

सदुभाऊ म्हणजे एक नंबरचा स्वार्थी जुलमी मनुष्य.त्यांंची सावकारी होती.अवर्षण, लग्नकार्य, अन्य समारंभ,गंभीर आजारपण, मृत्यूनंतरचा पारंपरिक खर्च,अशा अनेक कारणांसाठी पैसा लोकांना लागत असे.कांही जातीत लग्न, मृत्यू यानंतर, ज्ञाती बांधवाना गांवजेवण घालावे लागे.त्यासाठी पैसा लागे.लग्न कार्यातही तसाच अमाप पैसा खर्च करण्याची वाईट प्रथा होती.ती गरज भागविण्यासाठी सदू खोत उत्सुक असत.भरपूर व्याजदर आणि कर्जदारांकडून त्यांची जमीन तारण म्हणून लिहून घेतली जाई.ऋणको कर्ज फेडू शकत नसे.कांही वेळा व्याजही देऊ शकत नसे.जमीन अलगद सावकाराच्या म्हणजेच सदुभाऊ खोतांच्या घशात जात असे.अंथरूण पाहून हात पाय पसरावेत, कर्ज फेडण्याची क्षमता असेल तरच कर्ज घ्यावे, याचे भान लोकांना नसे.आता तर पैसा मिळत आहे पुढचे पुढे पाहू अशा विचाराने लोक पैसे कर्जाऊ घेत असत.

मळ्यामध्ये एकेकाळी खोताच्या केवळ पांच पाट्या होत्या. आता अर्धा मळा खोतांचा झाला होता.या सर्व पाट्या सलग नव्हत्या.ऋणकोची पाटी जिथे असे ती त्याच्या घशात जाई.सर्व पाट्या सलग असाव्यात या इच्छेने सदुभाऊ मधल्या पाट्या गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत असत. 

खोतांच्या पाट्या सलग करण्यामध्ये ग्यानबाची पाटी आडकाठी होती.ग्यानबा कधीतरी आपल्याकडे कर्ज मागायला येईल आणि आपण त्याची पाटी तारण   म्हणून लिहून घेऊ अशी आशा सदूखोताला होती.ज्ञानबा एक माळकरी होता.आषाढी कार्तिकी एकादशीला, न चुकता तो पंढरपूरला जात असे.तो शाकाहारी होता.जातीबांधव किंवा घरातील मंडळी जरी मांस मच्छी खात असले तरी तो त्याला स्पर्शही करीत नसे.  

हा ग्यानबा अंथरूण बघून हात पाय पसरावेत या विचाराचा होता.शक्य असेल तरच खर्च करावा या बाबतीत तो काटेकोर होता.पध्दत आहे, रीत आहे,लोक काय म्हणतील, जातिबांधव नावे ठेवतील म्हणून तो कधीही अवाजवी अवास्तव खर्च करीत नसे.ऋण काढून सण करावा असे त्याला कधीही वाटले नाही.

सदुभाऊ हा ज्ञानबा आपल्या पंजांखाली केव्हां येतो म्हणून वाट पाहात होते.आज ना उद्या त्याला पैशाची गरज लागेल आणि तो आपल्या कह्यात येईल म्हणून ते वाट पाहत होते.वर्षामागून वर्षे गेली.सदुभाऊ म्हातारे होत चालले.ग्यानबाही म्हातारा होत होता.सदूखोतांची इच्छा मात्र अतृप्तच राहिली होती.मळ्यातील ग्यानबाची पाटी सदूखोतांची होत नव्हती.आता मात्र सदाभाऊ खोतांचा धीर सुटत चालला होता.काय वाटेल ते करून ग्यानबाची मळ्यातील पाटी आपली करायचीच या ईर्षेने सदू खोत जळत होते.

सदूखोतानी ज्ञानबापुढे त्याची मळ्यातील पाटी विकण्याचा प्रस्ताव ठेवला.मळ्यातील पाटी म्हणजे सोन्याचा तुकडा होता.ज्ञानबा तो तुकडा कधीही विकणे शक्य नव्हते.त्याने गोल गोल न बोलता हा सोन्याचा तुकडा तुम्हाला कधीही विकणार नाही.तुमची इच्छा मला माहीत आहे. ती कधीही पूर्ण होणार नाही असे स्पष्टपणे ठणकावून सांगितले.ग्यानबाच्या स्पष्टोक्तीने सदाभाऊंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.सदू खोतांचा अहंकार उफाळून आला.काय वाट्टेल ते झाले तरी चालेल पण मी तो तुकडा मिळवणारच अशा ईर्षेने सदुभाऊ विचार करू लागले.

सदू खोतांच्या जमिनी सर्वत्र पसरलेल्या होत्या.त्यातील काही जमीन सदूखोतानी ग्यानबाला देऊ केली.मला तुझा मळ्यातील तुकडा (पाटी) दे म्हणून सांगितले.मळा दुबार पिकत होता.त्याला पाटाचे पाणी होते.छोट्या नदीवर म्हणजेच पर्ह्यावर एक तात्पुरते धरणे बांधत.उन्हाळयात त्याचे पाणी सर्व गावाला मिळत असे. अंगचे झरे बळकट असल्यामुळे पाटाचे पाणी मळ्यालाही मिळत असे.सदाभाऊ खोत देत असलेला जमिनीचा तुकडा जरी आकाराने मोठा असला तरी तो कोरडवाहू होता.त्याची उत्पन्नक्षमता कमी होती.ग्यानबाला अर्थातच हा सौदा मान्य नव्हता.

सदूखोतानी आणखी एक प्रपोजल ग्यानबापुढे ठेवले.अाकाराने जास्त कोरडवाहू(कुर्याठ) जमिनीबरोबरच, डोंगर उतारावरील दहा कलमे देतो असे सांगितले.हल्ली आंब्याला भाव चांगला येतो.कोरडवाहू कुर्याठाचा तुकडा आणि कलमे मिळून तुझा फायदाच होईल असे आमिष दाखविले.तरीही  ज्ञानबा जमिनीचा विनिमय करायला  तयार नव्हता.सदाभाऊ खोतानी तुला आणखी काय हवे असे विचारले.शेवटी वैतागून ज्ञानबा म्हणाला,तुम्ही तुमची सर्व जमीन दिली तरी मी तुम्हाला मळ्यातील तुकडा देणार नाही.याबाबतीत माझ्याकडे यापुढे अवाक्षरही काढू नका.तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत.चिडून पुढे ज्ञानबा म्हणाला,तुम्ही गावातील कितीतरी जणांच्या जमिनी घशात घातल्यात तरी तुमची भूक भागत नाही.तुमच्यामुळे कित्येक जण देशोधडीला लागले.येथे पोट भरत नाही म्हणून त्यांना मुंबई गाठावी लागली.सकस अन्न,शुद्ध पाणी,शुद्ध हवा, त्यागून त्यांना मुंबईसारख्या दूषित  हवेत जावे लागले. तुम्ही या सर्व जमिनी बरोबर घेऊन वरती जाणार आहात का? 

ग्यानबाचा हा सवाल सदुभाऊ खोतांच्या जिव्हारी लागला.वाट्टेल ते करून मी या उर्मट माणसाचा मळ्यातील तुकडा घेणारच अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. 

या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे जर त्यांना कळले असते तर ते या फंदात पडले नसते.परंतु जे होणारे आहे ते टळत नाही हेच खरे.पडोसन मध्ये म्हटलेच आहे "जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है।"

सदू खोताकडे त्यांच्या हाताखाली काही गुंड होतेच.तर त्यांनी आपल्या गुंडांना ज्ञानबाची झोपडी पेटवून द्यायला सांगितले.ग्यानबाचा मुलगा सून बायको झोपडीत झोपलेली होती.दोन्ही दरवाजांना बाहेरून  कडय़ा लावण्यात आल्या.झोपडीवर रॉकेल टाकून आग लावण्यात आली.समजा एखादा बाहेर आला असता तर त्याला पुन्हा आंत ढकलण्यासाठी गुंड तयारच होते.झोपडी धडाडून पेटली.झोपडी एका बाजूला असल्यामुळे झोपडी पेटल्याचे गावाला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता.तिघेही जळून ठार झाले.त्यांची अर्धवट जळालेली प्रेते सापडली.पोलिस केस झाली.चौकशी झाली.रात्री रॉकेलचा   दिवा भडकला असेल आणि आग लागली असेल असा अंदाज करण्यात आला.अपघात म्हणून फाईल बंद करण्यात आली.

आग लावताना ग्यानबाही झोपडीत असेल.तोही जळून जाईल असा हेतू होता.प्रत्यक्षात ग्यानबा झोपडीत नव्हता.तो त्याच्या पाव्हण्यांकडे(व्याह्यांकडे)  गेला होता.झोपडी जाळली त्याबरोबरच मुलगा सून पत्नी जळाली हे पाहून ज्ञानबा खचून गेला.

पंधरा दिवसांनी सदू खोत ग्यानबाला भेटला.कुत्सितपणे छद्मीपणे तो म्हणाला,आता तर तुझा सर्वनाश झाला.ती मळ्यातील जमीन ठेवून तू काय करतोस?मला विकून टाक.पंढरपूरला जाऊन विठ्ठल विठ्ठल करीत बस.

हा अपघात नाही. ही मुद्दाम लावलेली आग आहे हे ज्ञानबाला कळले.मी मरेपर्यंत तुम्हाला माझी जमीन मिळणार नाही.त्यानंतरही तुम्हाला ती मिळणार नाही.मी माझ्या लांबच्या पुतण्याला देईन.असे रागारागाने ज्ञानबा म्हणाला.

वाटेल ते करून जमीन मिळवणारच अशा हट्टाला सदू खोत पेटला होता.त्याने आपल्या गुंडांकरवी धरणामध्ये ग्यानबाला बुडवून ठार मारले.दु:खामुळे त्याने आत्महत्या केली.असा पंचनामा केला गेला.

ग्यानबाने ती जमीन सदू खोताकडे गहाण टाकून कर्ज घेतले होते.असे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले.कर्ज न फेडल्यामुळे गहाण जमीन सदू खोताच्या नावाने कागदोपत्री केली गेली.

*ग्यानबा माळकरी होता.तरीही प्रत्येकाच्या सहनशक्तीला मर्यादा असते.*

*काय झाले,कोणी केले ते सर्व चित्र ग्यानबाच्या डोळ्यांसमोर होते.त्याला गती मिळाली नाही.*

*सूडाने पेटलेला त्याचा आत्मा अधांतरी तरंगत होता.*

*सदू खोताचे पूर्ण वाटोळे केल्याशिवाय त्याला गती मिळणार नव्हती.*

(क्रमशः)

२६/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन