Get it on Google Play
Download on the App Store

७ जशास तसे ३-५

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

कमलने रावसाहेबांकडे कौशल्याने विषय काढून, त्यांनी मृत्युपत्रात तिचेच नांव टाकले आहे  याची खात्री करून घेतली.

एकदा ती माहिती परेशला कळल्यावर त्याने त्याच्या पुढील योजनेची आखणी करायला   सुरुवात केली.

प्रथम त्याने रावसाहेबांना कसे ठार मारता येईल याची योजना आखण्यास सुरुवात केली.कुणालाही संशय येऊ न देता त्यांचा मृत्यू होणे आवश्यक होते.त्यांचा खून झाला असा जरा जरी संशय आला असता तरी भाऊसाहेबांनी खुन्याचा शोध लावण्यासाठी आकाशपातळ एक केले असते.त्यातून परेश व कमल यांचे नाव पुढे आले असते.रावसाहेबांच्या इस्टेटीवर ऐषाराम करण्याऐवजी ,मजा  मारण्याऐवजी ,त्यांचा काळ तुरुंगात गेला असता.त्याची सर्व योजना अमलात येण्यासाठी रावसाहेबांचा मृत्यू नैसर्गिक वाटणे आवश्यक होते.

त्याने अनेक पुस्तके पालथी घातली.त्याने गुगलवर भरपूर संशोधन केले.त्याचा एक मित्र फार्मास्युटिकल कंपनीच्या रासायनिक प्रयोगशाळेत काम करीत होता.त्याच्याकडे तो वारंवार जाऊ लागला. त्याच्याकडून त्याने त्याला कसलाही सुगावा लागू न देता   निरनिराळ्या विषांसंबंधी बरीच माहिती गोळा केली.शेवटी त्याने असे एक विष निवडले कि ज्याच्या सेवनाने दीर्घकाळानंतर व्यक्तीचा मृत्यू होईल.रोज अल्पप्रमाणात विष घेणारी व्यक्ती क्रमशः खंगत खंगत जाईल.शेवटी तिचा मृत्यू होईल.मृत्यू नैसर्गिक वाटेल.कुणाही तज्ज्ञ डॉक्टरला कसलाही संशय येणार नाही.या सर्व गोष्टींची पूर्ण खात्री करून घेतल्यावर त्याने त्या विषाचा प्रयोग रावसाहेबांवर कमलच्या मार्फत करण्याचे ठरविले.प्रथम कमल तयार होणार नाही याची त्याला कल्पना होती.परंतु शेवटी कमलला आपण तयार करू याबद्दल त्याला आत्मविश्वास होता.                    

त्याने त्या विषाची माहिती कमलला दिली. ते रोज अल्पप्रमाणात रावसाहेबांना दिले तर हळूहळू खंगत जाऊन त्यांचा सहा महिने ते वर्ष या कालावधीत मृत्यू होईल.एकदा रावसाहेबांचा मृत्यू झाला की सर्व इस्टेटीची तू मालकीण   होशील.दोन तीन वर्षे आपण असेच संबंधात राहू.नंतर आपल्याला विवाह करता येईल.रोज रात्री झोपताना त्यांना दुधातून अल्पप्रमाणात विशिष्ट डोस या स्वरुपात तू विष दे.हे कुणालाही संशय येऊ न देता तूच करू शकशील.इत्यादी गोष्टी त्याने कमलला सांगितल्या.   

परेशची ही कल्पना ऐकल्याबरोबर कमलला प्रचंड धक्का बसला होता.ज्यांच्या बंगल्यावर लहानपणापासून आपण खेळलो बागडलो,जिथे आपल्याला विश्वास व प्रेम मिळाले,ज्यांच्या मांडीवर लहानपणी बसून आपण खेळलो ,ज्यांच्याबरोबर आपण विवाह केला,एकेकाळी जे आपल्याला पितृतुल्य होते, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ज्यांच्याशी विवाह केला,त्यांना विष देऊन ठार मारण्याची कल्पना तिला सहज पचण्यासारखे नव्हती.कमल मुळात उलटय़ा खोपडीची नव्हती.दुष्ट नव्हती.तिने रावसाहेबांबरोबर तीस वर्षांचे अंतर असूनही विवाह केला होता.दुर्दैवाने तिच्या शारीरिक  अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकल्या नाही.शेवटी वीस वर्षांची तरुणी व पन्नास वर्षांचा वयस्कर पुरुष यांतील प्रत्येकाच्या कांही अंगभूत मर्यादा होत्या.त्यातच तिला परेश भेटला.हळूहळू परेश बरोबर ती वाहवत गेली. 

सुरुवातीला तिने परेशची कल्पना झिडकारून लावली.

परेशला ती कल्पना हळूहळू कमलच्या मनावर बिंबवावी लागली.आपले दोघांचे हे संबंध केव्हां ना केव्हां उघडकीला  आल्याशिवाय राहणार नाहीत.त्यानंतर तुझी घरातून हकालपट्टी होईल.तुला सर्व इस्टेटीतून बेदखल केले जाईल.ज्यासाठी तू हा सर्व अट्टाहास केलास, विवाह केलास,योजना तयार केलीस,ज्या पैशाच्या मोहात तू पडलीस,ते सर्व तुझ्या हातातून निसटून जाईल.आपणा दोघांचे एकत्र राहण्याचे स्वप्न पुरे होईल.परंतु ऐषारामात वैभवात न राहता आपल्याला दारिद्र्यात दिवस काढावे लागतील. 

तू माझ्या मताप्रमाणे वागली नाहीस,माझी योजना स्वीकारलीस नाही,तर तुला, मला विसरून जावे लागेल.मी कांही ही चांगली नोकरी सोडणार नाही.रोज तुझ्यासमोर मी असणार.आपण एकत्र मात्र नसू.आपल्याला हल्लीसारखे संबंध ठेवता येणार नाहीत. हे सर्वच दु:खमय आहे.जो रस्ता आपण दोघांनी पकडला आहे त्याची परिणीती, त्याचा शेवट, मी जे सांगत आहे त्यामध्येच आहे.बघ नीट विचार कर आणि तुझा निर्णय घे. परेशने थोडे समजावले,थोडे धमकावले,आपले संबंध राहणार नाहीत अशी अप्रत्यक्ष भीती दाखविली.  

कमल घसरगुंडीला लागलीच होती.ती परेशच्या पाशात अडकली होती मोहपाश तोडणे सोपे नव्हते.उतारावरून वेगाने घसरत जात असताना स्वतःला रोखून कठोर निश्चयाने उलटे परत फिरून मूळ स्थान गाठणे जवळजवळ अशक्य असते.परेश रोज त्याची ही योजना कमलच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत होता.तिला परेशचा सहवास सोडवत नव्हता.परेशचा पाशात ती जास्त जास्त गुरफटत जात होती. शेवटी तो त्याची योजना कमलच्या गळी उतरविण्यामध्ये  सफल झाला.

कसलाही मोह एखाद्या  मजबूत तंतूंच्या जाळ्यासारखा असतो.एकदा त्यात अडकल्यावर त्यातून सुटका होणे कठीण असते.      कमल आठ पंधरा दिवसांत परेशच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागली.रावसाहेबांना संशय येऊ नये म्हणून ती त्यांच्याशी जास्तच प्रेमाने, जास्तच लाडाने वागू                              

लागली.मध्यंतरी दोघांच्या संबंधांमध्ये किंचित तेढ निर्माण झाली होती.त्याचे कारण मनोमन दोघांना माहीत असूनही कुणीही त्याचा उच्चार करीत नव्हते. कमलने शेवटी परिस्थितीचा स्वीकार केला आहे,असे रावसाहेबांना वाटत होते. खरी वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात येती, त्याना माहीत होती,तर कदाचित बसलेल्या धक्क्यानेच त्यांचा मृत्यू झाला असता.किंवा त्यांनी जन्मभर लक्षात राहील अशी शिक्षा कमल व परेश यांना केली असती .

विषाचा परिणाम थोड्याच दिवसांत दिसू लागला. दिवसेंदिवस रावसाहेब खंगू लागले.त्याना बारीक ताप येऊ लागला.त्यांची अन्नावरील वासना कमी झाली.त्यांना अन्न पचत नाहीसे झाले.पोट वारंवार बिघडू लागले. एकाएकी आपल्याला हे असे कां होत आहे ते त्यांच्या लक्षात येईना.याच्या पाठीमागे कमल आहे,  रोज दुधाचा ग्लास कमलच्या हातातून घेतो तो आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. डॉक्टर,वैद्य, झाले.जी जी अद्ययावत औषध प्रणाली होती तिचा उपयोग करण्यात आला.गूण कांही येत नव्हता.रोगाचे निदान होत नव्हते.रावसाहेब दिवसेंदिवस खंगत जात होते.विषप्रयोग इतका बेमालूम होता कि त्याची कल्पना कुणालाही आली नाही.डॉक्टरना त्यांच्या विविध चाचण्यांमध्ये कुठेही तशा प्रकारचा संशय आला नाही.

भाऊसाहेब, नोकरचाकर, हितसंबंधी, मित्र, सर्वांनाच रावसाहेबांकडे बघून वाईट वाटत होते.एवढा हत्तीसारखा देखणा तगडा मनुष्य खंगून खंगून हाडांचा सापळा होत होता.कुणाला कांही संशय न येता रावसाहेबांचा अंत तसाच एक दिवस झाला असता.परंतु विधिलिखित कांही निराळे होते. त्या दिवशी कमल रावसाहेबांजवळ बसली होती. त्यांच्या देखभालीत गुंग झाल्याचे ती दाखवत होती.तिच्याकडे बघून रावसाहेबांना वाईट वाटत होते.आपण तिच्याशी उगीच लग्न केले.आपल्यामुळे हे उमलते फूल कोमेजत आहे.आपण तिला मूलही देऊ शकलो नाही.मोहाला बळी पडून तिच्या आयुष्याचा आपण सर्वनाश केला.अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येत होते.

कमलला कुणाचा तरी फोन आला.फोनवर बोलत असतानाच तिला कुणीतरी हांक मारली.नंतर फोन करते असे म्हणून तिने घाईघाईत फोन तिथेच ठेवला.व ती बाहेर गेली.रावसाहेबांनी केवळ चाळा म्हणून फोन हातात घेतला. फोन बंद केलेला नव्हता.फोन पाहात असताना रावसाहेबांना परेश व कमल यांचा दिवसातून अनेकदा, निदान एकदातरी संवाद होतो असे लक्षात आले. दोघेही कितीतरी वेळ बोलत असतात हेही त्यांच्या लक्षात आले.रावसाहेबांच्या मनात संशयाचे बीज पेरले गेले.त्या दृष्टीने ते परेश व कमल यांची कांही वर्षांतील वर्तणूक पाहू लागले.त्यांच्या मनातील संशय दृढ होत गेला.त्यादृष्टीने ते कमलवर लक्ष ठेवू लागले.कमल परेशला आपल्याला कळू न देता भेटत असते हे त्यांना समजले.या भेटीमध्ये काय होत असेल त्याचीही त्याना कल्पना आली.तिच्या चेहऱ्यावरील काळजी व औदासीन्य फसवे आहे हे त्यांच्या लक्षात आले.भाऊसाहेबांजवळ त्यांच्या मनातील शंका बोलून दाखवावी असेही त्यांना वाटले.परंतु त्यांनी तसे केले नाही.आपली पूर्ण खात्री पटली की मगच काय ते करावे असे त्यांनी ठरविले.शेवटी पूर्ण खात्री पटल्यावर त्यांनी भाऊसाहेबांना विश्वासात घेत त्याना सर्व कांही सांगायचे ठरविले.  

दुर्दैवाने रावसाहेबांना ती संधी मिळाली नाही.आपल्यावर विषप्रयोग होत आहे याचा पुरावा त्यांना मिळाला होता.विषाचे नावही त्यांना कळले होते.कमल व परेश यांच्या संभाषणाचे काही भाग त्यांना मिळाले होते.त्यावर दुसर्‍या दिवशी ते कांहीतरी हालचाल(अॅक्शन) करणार होते.त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांना विधिवत अग्नी दिला गेला. रावसाहेबांनी गोळा केलेला पुरावा कमलला मिळाला.तिने तो नष्ट केला.

*पुढील पंधरा दिवस सर्व धार्मिक कार्ये करण्यात गेली.तरीही रावसाहेबांना गती मिळाली नव्हती.*

*सूडाच्या भावनेने, कमल व परेश यांना धडा शिकवण्याच्या हेतूने, ते तसेच भूतयोनीत तरंगत राहिले.अधांतरी लटकत होते.*

*सूड घेतल्याशिवाय त्यांना शांती, पुढील गती मिळणार नव्हती.*

*कमलेश व परेश यांना देहांत शासन केल्याशिवाय रावसाहेबांचा अस्वस्थ अतृप्त आत्मा थांबणार नव्हता.*

(क्रमशः)

२४/६/२०२१©प्रभाकर  पटवर्धन