मैत्री
प्रिया आणि सागरची खूप चांगली मैत्री जमली होती. सागर तेरा वर्षांचा झाला.
इतक्या वर्षात आशाची तब्बेत खालावत गेली होती. काहीच महिन्यापूर्वी आजारपणामुळे आशाचे निधन झाले होते. सागरचे आजोबाही आता राहिले नव्हते. इतक्या मोठ्या बंगल्यात फक्त रवी आणि सागर दोघेच राहत होते.
रवी एकटा ऑफिस, घर आणि सागरला सांभाळू शकत नव्हता. मोलकरीण मात्र रवी घरात असताना सागरची काळजी घेत असे. एकदा रवी कामावर निघून गेला कि, ती टंगळ मंगळ करायची आणि आपल्या इकडच्या तिकडच्या कामात गुंतून जायची. प्रियाचे कुटुंब याच दरम्यान शिफ्ट झाले होते. आता अगदी शेजारच्या बिल्डींग मध्ये राहायला आले होते म्हणून प्रिया वरचेवर सागरच्या बंगल्यात त्याच्याशी खेळायला यायची.
प्रिया आता दहा वर्षांची झाली होती. ती आपल्या वयाच्यामानाने बरीच समजूतदार होती. तिला हे ही कळले होते कि, इतरांसारखा सामान्य नाही. तिच्या हे हि लक्षात आलं होतं कि, सगळी मुलं सागरपासून दूर पळायची. त्याच्याशी कोणी बोलतही नसे. हे सगळे पाहून प्रियाचे मन दयेने भरून आले. लवकरच दोघांची खूप चांगली मैत्री झाली होती. प्रियाचे आई-वडील सुशिक्षित होते. त्यानां हि सागर आणि प्रियाच्या मैत्रीचा काही त्रास होत नव्हता. सागर आणि प्रिया दोघेही खूप वेळ एकत्र असत. प्रिया शाळेत गेल्यावर मात्र सागर एकटा असायचा. संपूर्ण दिवस सागर प्रियाची अधीरतेने वाट पाहत असायचा. प्रिया शाळेतून आल्यानंतर हात पाय धुवून लगेचच सागरसोबत खेळायला जायची. खेळता खेळता सागरला प्रिया तिने शाळेत शिकलेल्या खूप काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायची. सागरही ते सगळं उत्सुकतेने ऐकायचा. सागर सुद्धा प्रियाचे बोलणे खूप काळजीपूर्वक ऐकायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा.
सागरला एक चांगली मैत्रीण मिळाल्याने रवीलाही आनंद झाला होता.