निरोप
आता या गोष्टीला जवळपास दीड एक वर्ष झाले होते.
आता माधव आणि मेघनानी हे घर विकून गावी निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते जिथे ही जात होते तिथे, 'मुलगी पळाली' 'मुलीने नाक कापलं' हे ऐकायला लागत होते. त्यांना आता हे असहाय्य झाले होते.
रवीनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण माधवचा निर्णय बदलणार नव्हता. माधव आणि मेघनाचे आयुष्याच जणू बदलले होते. त्यांनी सोसायटी सोडायचा निर्णय घेतला होता. त्यांनी घरचे सगळे साहित्य गावी पाठवून दिले होते. प्रियाची रुम आवरता आवरता मात्र मेघनाच्या आणि माधवच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी रिकाम्या घराचे रिकामपण डोळ्यात भरून घेतले आणि तिथून निघाले.
जड पावलांनी ते सागर आणि रवीला शेवटचं भेटायला आले होते. सागर आणि रवीचा निरोप घेऊन ते तिथून निघाले.
ते गेल्यावर सागर निशब्दपणे बागेत येऊन बसला. आणि खताच्या खड्ड्याकडे बघत म्हणाला.
"हे बघ प्रिया, मी कोणालाच सांगितले नाही. आता तुला कोणी चोरुन नेणार नाही. मी तुला सुरक्षित ठेवलं आहे. आपल्या पिग्गी बँकबरोबर...!"
सागरच्या ओठांवर समाधानाचे हसू उमटले होते.