Get it on Google Play
Download on the App Store

लग्न

प्रियासाठी अनेक चांगली स्थळं सांगून येत होती. त्यात रवीचा अमेरिकेत राहणारा भाऊ चंद्रकांत याच्या ओळखीवर एक अमेरीकेमध्ये राहणाऱ्या मुलाचं स्थळ तिला सांगून आलं होतं. त्यानी अनेक स्थळांनंतर प्रियासाठी हे स्थळ निवडलं होतं. एके दिवशी सागर आणि प्रिया सागरच्या घराच्या बागेत बसून बागकाम करत होते. तेव्हा प्रियाने सागरला सांगितले.

"तुला माहित आहे का सागर...?? मी आता लग्न करणार आहे...!"

"अच्छा मग तू आता नवरी होशील का?? शेजारची मिली दीदी झाली तशी??” सागरने उत्साहाने विचारले.

काही दिवसांपूर्वी कॉलनीत एका मुलीचे लग्न झाले होते. त्यात प्रिया आणि सागर दोघांनी खूप मजा केली होती. सागरला बऱ्याच दिवसांनी लोकांमध्ये मिसळायला मिळालं होते. सागर जास्त वेळ प्रियासोबतच होता.

"हो. अगदी बरोबर." प्रिया हसून म्हणाली.

प्रियाने एका ठिकाणाहून सुकलेले जास्वंदाचे झाड उपटून टाकले आणि तिथे नवीन जास्वंदाचे रोप लावले. त्यांनी कंपोस्टच्या खड्ड्यातून थोडी माती आणली आणि ती जास्वंदाच्या झाडात टाकली.

“सागर हे बघ कंपोस्ट खूप झालंय आपण ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करू. हे शेजारच्या सोसायटीमध्ये विकू...  म्हणजे तुला पॉकेट मनी मिळेल.”

असं म्हणून त्यांनी ती दुपार कंपोस्टच्या दोन दोन किलोच्या पिशव्या करण्यात घालवली..! त्या दोघांनी मिळून बंगल्याच्या व्हरांड्यात कंपोस्टच्या भरलेल्या पिशव्या ठेवल्या.

तिथे सागरने एक बोर्ड बनवला. 

“येथे उत्तम दर्जाचं कंपोस्ट मिळेल ३० रु किलो...!”

प्रियाने त्याला शाबासकी दिली.

सागरला अचानक लक्षात आलं की आपण फार दिवस अशी मज्जा करू शकणार नाही कारण प्रिया लग्न करून जाणार होती.

त्याने प्रियाला विचारलं, "मग तू पण जाणार का?" सागर खूप दुःखी झाला होता. लग्नानंतर मिली दीदी निघून गेल्याची आठवण त्याला झाली होती.

"हो, मला जावं लागेल. माझा नवरा अमेरिकेला राहतो. त्याचा तिकडे मोठ्ठ घर आहे तू येत जा ना कधी कधी चंद्रकांत काकांकडे आणि मग माझ्याकडे पण ये...!" प्रिया म्हणाली

ती बागेतल्या झाडांची काही पिवळी आणि वाळलेली पाने तोडायला लागली.

सागर गप्प बसला होता. तो प्रियाला काम करताना बघत होता..