लग्नघर
"प्रिया, अगं पाणी आणून दे बेटा." प्रियाच्या आईने तिला हाक मारली.
प्रियाचे आई वडील तिच्या लग्नाच्या तयारीत पूर्णपणे गुंतले होते. आताही ते प्रियासाठी शॉपिंग करून परतले होते. आज तिला सागरबरोबर झाडांची मशागत करायची होती. शिवाय तिने त्याच्यासाठी आणलेले नवीन कपडेही दाखवायचे होते म्हणून ती आई बाबांबरोबर स्वतःच्या खरेदीला गेली नव्हती.
“प्रिया बेटा पाणी आण, मला खूप तहान लागली आहे. उन्हाने जीव गेला बाई.”
प्रिया कडून काहीच उत्तर न मिळाल्याने प्रियाच्या आईने तिला जोरात हाक मारली.
“अगं थांब, मी घेऊन येतो, ती झोपली असेल कदाचित." अस म्हणत प्रियाच्या बाबांनी स्वतः फ्रीजमधून पाण्याची बाटली बाहेर काढली. ते स्वयंपाक घरात जाऊन दोन ग्लास घेऊन आले.
पाणी पिऊन प्रियाची आई प्रियाच्या खोलीच्या दिशेने गेली. तिला प्रियाला लग्नाची खरेदी दाखवायची होती. मेघना दार उघडून आत आली पाहते तर काय...? प्रिया तिच्या रूममध्ये नव्हती.
आता संध्याकाळ हि होत आली होती इतक्या उशिरापर्यंत प्रिया कुठे थांबली असेल या काळजीने तिने माधवला सांगितलं..
"अरे प्रिया इथे पण नाहीये...! अरे आता आणि उशीरही झालाय जरा फोन कर बघू तिला आणि बोलव म्हणावं लग्न तोंडावर आलंय कुठे फिरतेस.!" प्रियाच्या रिकाम्या खोलीतून बाहेरयेत बघत मेघना म्हणाली.
"हो फोन करतो. तू शांत हो पाहू..." मेघनाला अस्वस्थ पाहून माधव ,म्हणाला.
"हि मुलगी काही सांगून ऐकणाऱ्यातली नाहीये." मेघना काळजीच्या स्वरात म्हणाली.
"अगं, कशाला काळजी करतेयस. रवीच्या बागेत सागरसोबत असेल. कुठे जाणार ती दुसरीकडे..!!" माधवने मेघनाचे सांत्वन केले.
"मी तरी तिला सांगितलं होतं त्या सागरसोबत मैत्री जरा कमी कर. पण ती अशी हट्टी मुलगी आहे ना की, अजिबात ऐकत नाही. जा आणि तुमच्या लाडकीला घेऊन या." मेघना नाराज होत म्हणाली.
"असु दे बाबा रागावू नकोस, मी तिला घेऊन येतो आणि रवीला पत्रिका पण देऊन येईन म्हणतो." माधव म्हणाला आणि रवीच्या घराकडे निघाला.
"प्रिया... प्रिया बेटा... अरे सागर बाळा कसा आहेस...??" माधव म्हणाला.
"हाय काका. मी मस्त आहे तुम्ही कसे आहात आणि काकू कशी आहे... झाली का लग्नाची खरेदी..??" बागेत बाकावर बसलेल्या सागरने माधवला इशाऱ्याने आत यायला सांगितले.
"हॅलो बेटा. प्रिया इथे आली नाही का?" सागरला एकटा बसलेला पाहून माधवनी विचारले.
"आलेली दुपारी. पण प्रिया संध्याकाळीच निघून गेली...!" सागर म्हणाला
कारण ती इथे असती तर सागरबरोबर गप्पा मारत बसलेली माधवला दिसली असती.
"कुठे गेली काही बोलली का? आमचा फोन उचलत नाहीये." माधव म्हणाला
"नाही. मला काहीच नाही म्हणाली" सागर बागेतून बाहेर येत म्हणाला.
"आज कुठे गेला होता तुम्ही काका..?" सागरने माधवला विचारले.
माधवने सागरचा प्रश्न दुर्लक्षित केला. तो प्रियाला भरपूर वेळा फोन करून शेवटी हताश झाला होता. तो काहीहि न बोलता शांतपणे तिथून निघून गेला. प्रियाच्या फोनवर फोन केले होते पण नुसतीच रिंग जात होती. ती मात्र फोन उचलत नव्हती.
माधव घरी गेला.