Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण दुसरे

सिद्धरामय्याची त्या दिवशी नाईट ड्युटी होती. संध्याकाळी सातच्या सुमारास जेवून खाऊन ते स्टेशनवर गेले. या चोवीस तासात त्यांची आणि रामचंद्र यांची चांगली मैत्री झाली होती. ड्युटीवर जाण्याआधी ते त्यांच्या पत्नीला रामचा व्यवस्थित पाहुणचार करण्याची सूचना देऊन गेले होते. असे असूनही रामने तिला पहिले नव्हते. कदाचित जुन्या विचारांची संस्कारी गृहिणी असेल असे रामला वाटले. सिद्धरामय्या गेल्यानंतर तो निवांतपणे आरामखुर्चीवर बसला आणि सोबत आणलेली एक कादंबरी वाचायला त्याने सुरुवात केली. जवळच सिद्धरामय्या यांचा मुलगा विठ्ठल खेळत बसला होता. काही वेळाने रामला तहान लागली म्हणून त्याने विठ्ठलला पाणी मागितले. तो धावतच आत गेला आणि लगेच परत आला.

“ काय रे पाणी नाही आणलं?” राम

“अव्वा आsणsते” विठ्ठल
 
मग राम वाचनात गढून गेला. काही वेळाने पुस्तकातून त्याची नजर विचलित झाली. दोन कोमल आणि गोरी पाउले त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली. तिच्या पायाची बोट रेखीव होती जी तिच्या खणाच्या साडीच्या सोनेरी किनारेनी अधूनमधून झाकली जात होती. त्याची त्या बोटांवरून दृष्टीच ढळेना काही समजायच्या आत ते दोन्ही सुंदर पाय त्याच्या जवळ येऊन थांबले आणि दुसऱ्याच क्षणी टेबलावर दोन सुंदर रेखीव हात दृष्टीस पडले. एका हातात पाण्याने भरलेला ग्लास होता आणि दुसऱ्या हातात होती एक प्लेट जिच्यात बेसनाचे लाडू, आणि चिवडा असे फराळाचे पदार्थ होते. दोन्ही हातात चांगल्या ठसठशीत सोन्याच्या पाटल्या होत्या आणि हिरवा चुडा भरला होता. तो त्या गोऱ्यापान हातांकडे एकटक पाहतच राहिला. इतक्यात त्याच्या कानावर गोड आणि लाघवी आवाज पडला,

“पाणी घ्या”

त्याने डोकं वर करून पाहिलं तर एक अत्यंत रूपसंपन्न युवती मान खाली घालून उभी होती. पहिल्याच नजरेत राम तिच्याकडे आकर्षित झाला होता. तिच्या यौवनात चंचलतेचा लवलेशही नव्हता. आरस्पानी सौंदर्य असून देखील उन्माद तसूभरही दिसून येत नव्हता. याउलट एखाद्या कुलीन गृहलक्ष्मीचे गांभीर्य, मातेचे माधुर्य, कमनीयता आणि लयीनता दिसून येत होती. हिरव्या साडीचा सोनेरी खणाचा रुंद पदर डोक्यावरून बोटभरही ढळला नव्हता. भव्य कपाळावर रेखीव भुवयांच्या मधोमध लाल कुंकू शोभून दिसत होतं. साक्षात देवीचे रूप! हे घरंदाज सौंदर्य पाहून रामच्या मनात अचानक भक्तीभाव उमटल्यागत झालं.

त्याने थोडा फराळ खाल्ला आणि पाणी प्यायले. परंतु नंतर त्याचं मन वाचनात रमेनासे झाले. त्या हास्यास्पद व्यक्तिमत्त्व असलेल्या वयस्कर आणि राठ दिसणाऱ्या त्या स्टेशन मास्तरड्याची पत्नी इतकी सुंदर रूपवती? या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. चमत्कारच म्हणायचा हा!

त्या गृहलक्ष्मीच नाव होतं “शची”. ती नावाप्रमाणे शची देवी दिसत होती पण सिद्धरामय्या कोणत्याही बाजूने इंद्रदेव वाटत नव्हता हे नक्की. शची नावाप्रमाणेच होती पवित्र, निश्चल आणि निर्विकार. ती आजिबात थांबली नाही. लगेच परत गेली. रामने तिच्यात एक हुशार आणि असाधारण स्त्रीला पाहिले होते. शची जात असताना राम पाहतच राहिला जणू एखादी देवी प्रकट झाली आणि दर्शन देऊन अदृश्य झाली.

क्रमश: