Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण पंधरावे

“कापालिक संन्यासी कलिमलनाथ कोण होते?” राम.

“मी त्यांच्याबद्दल इतकेच सांगू शकतो की कलिमलनाथ मृत शरीरात विविध प्रकारच्या आत्म्यांना आमंत्रण देत असत आणि त्यांच्याकडून भयंकर तांत्रिक विधी करून त्यांचे कार्य काढून घेत असत. त्यांच्यावर कालीची कृपा होती. आपल्या मनोकामनापूर्तीसाठी ते कधी-कधी पुरुष आणि अर्भकांचा बळी देत असत.” नेमीनाथ

“मग पुढे काय झाले?” राम

“संपूर्ण एक महिनाभराच्या कठोर तपानंतर अमावस्येच्या महारात्रीला मंदिरात बसवलेल्या देवीच्या पाषाणमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पण देवी जागृत झाली नाही.  

“माझ्या पीठ-साधनेमध्ये काही चूक झाली का?” कलिमलनाथ शांतपणे विचार करू लागला.

मग अचानक वैजयंती देवी चांदीच्या ताटात पुजेचे साहित्य घेऊन तेथे पोहोचली.

तिला येताना पाहून मोठे सरकार थक्क झाले. त्यावेळी मध्यरात्र झाली होती. वैजयंती एवढ्या काळ्या मिट्ट रात्री फक्त एका परिचारिकांसोबत आली होती. वैजयंती एकाग्र चित्ताने शिव महिम्न स्तोत्राचे पठण करत पायऱ्यांवर पुढे चालत राहिली. परिचारिका पूजेचे साहित्य घेऊन तिच्या मागे येत होत्या.

कलिमलनाथांनी मखमली आसन अंथरले. वैजयंतीला त्यावर बसण्यास सांगून त्यांनी धूप, दिवा, नारळ, पंचमुखी शंख यांचा स्वीकार केला. धूप दीप कापूर यांचे प्रज्वलन केल्यानंतर वैजयंतीने आणलेली फुले देवीला वाहिली. देवीचे आवाहन केले आणि काही क्षणातच देवीच्या डोळ्यात जागृती आली. तिचे डोळे अक्षरश: जिवंत भासू लागले. हे पाहून कलिमलनाथ आनंदी झाले. मागे वळून वैजयंती देवीचे पायावर त्याने डोके ठेवले आणि ते म्हणाले

“तू साक्षात कात्यायनी देवीचा अवतार आहेस. तुझ्यासाठी या मंदिराचे दरवाजे सदैव खुले आहेत, आई” कलिमलनाथ पुढे हात जोडून बोलत होते.

“तंत्र साधकाच्या मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. मात्र इतका वेळ खर्च करून देखील  मी देवीच्या मूर्तीची मी प्राणप्रतिष्ठा करू शकलो नाही. प्रत्येक वेळी मी चामुंडा देवीचे आवाहन करून पुष्प अर्पण केली आणि प्रत्येक वेळी  माझी पुष्पांजली नाकारली गेली. त्यामुळे मी काळजीत पडलो. मला वाटले एकाएकी देवी माझ्यावर का कोपली?”  

कलिमलनाथ संन्यासी यांच्याकडून तांत्रिक कार्य आणि मंत्रांमध्ये कधीही चूक होत नसे.मग चूक काय राहिली असेल? पुढे ते बोलू लागले

“मी ध्यान केले असता मला दिसले की आज आपण निर्जळी उपवास केला आहे आणि देवीला अर्पण करण्यासाठी स्वत: फुले आणली आहेत. तेव्हा देवीने मला आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याची आज्ञा केली आणि तुम्ही आणलेल्या पूजेच्या साहित्यासह आवाहन करताच देवीच्या पाषाण मूर्तीमध्ये हालचाल दिसून आली. उज्ज्वल आलोक छटा देवीच्या मुख कमलावर शोभून दिसत होत्या. तिच्या नेत्रांमध्ये जीवनाची चमक दिसून आली. व्यंकटअप्पय्या चुडामणी हेब्बर सरकारांच्या भूमीमध्ये साक्षात देवीचे आगमन झाले आहे.व्यंकटअप्पय्या चुडामणी हेब्बार, आपण आता निर्दोष आणि निष्कंटक आहात. मात्र या मंदिरात वैजयंती देवी व्यतिरिक्त कोणत्याही महिलेला प्रवेश करता येणार नाही."

उल्लालच्या पंचक्रोशीतील अत्यंत शांत असा परिसर पंचमुखी शंखाच्या सुरेल आवाजाने दुमदुमून गेला. पूजा झाल्यानंतर कलिमलनाथाने मोठे सरकार आणि वैजयंती देवी यांच्या कपाळावर यज्ञ तिलक लावला.  व्यंकटअप्पय्या चुडामणी हेब्बार आणि वैजयंती देवी पहाटे राजवाड्यात परतले. नशिबाने उपेक्षा केलेल्या वैजयंती देवीवर चामुंडा मातेची कृपादृष्टी पडली होती.

देवी वैजयंती दिवसभर मदनगोपालासमोर पूजा, दान आणि ध्यान करत असे आणि संध्याकाळ होताच सर्व परिचारिका आणि कालिकेसह चामुंडा देवीच्या मंदिरात जात असे. संध्याकाळच्या मंगल आरतीनंतर त्या वाड्यात परत येत असत. कलीमलनाथ त्यांना रोज चामुंडा देवीचे चरणामृत देत असत.

क्रमश: