प्रकरण चौथे
वैजयंती हे नाव ऐकताच ती एकदमच आश्चर्यचकित झाली त्याचे शब्द अविश्वसनीय वाटत असल्याच्या नजरेने ती म्हणाली,
“हो तुमचं बरोबर आहे त्या विधवा जमीनदारांच्या सुनेचं हेच नाव होतं. दीडशे वर्ष झाली या गोष्टीला पण ऐकलं आहे कि तिचा दु:खी आणि अतृप्त आत्मा त्यांच्या वाडयात फिरत असते. रात्रीच्या निरव शांततेमध्ये तिचा आर्त आवाज आणि करुण क्रंदन लोकांना ऐकू येत असतं. ईतकच नाही तर काही वेळेला लोकांना तिचा आत्मा दिसतो देखील. पण मला एक गोष्ट लक्षात नाही आली कि त्या विधवा हेब्बारांच्या सुनेचा आत्मा आणि तुमचा संपर्क नक्की कसा काय झाला? तुम्हालाच नेमकं तिचं स्वप्न का पडायला लागलं?”
तिचं हे बोलणे ऐकून राम क्षणभर हसला आणि म्हणाला “ज्याला मी सध्या भाषेत स्वप्न म्हणालो ते वास्तविक स्वप्न नाही तर ती एक विशेष अवस्था आहे ज्याला समाधी अवस्था असं म्हणतात.”
“अच्छा?...आणि तुम्हाला समाधी अवस्था कशी प्राप्त झाली?”
“साधनेने! मी रिसर्च तर करतोच पण अनेक रहस्यमय, गूढ आणि गोपनीय तथ्य जाणून घेण्यासाठी जारण-मारण-तारण यांचा अंतर्भाव असलेली कठोर योग तांत्रिक साधना सुद्धा करतो जिच्यामुळे मला समाधी अवस्था प्राप्त करून घेण्याची सिद्धी प्राप्त आहे.”
राम पुढे आणखी बोलणार होता इतक्यात विठ्ठल खोलीत आला,
“अsव्वा, अप्पा तुलाs बोलवsतात.”
बोलण्याच्या ओघात रात्रीचे ११ वाजले याचे देखील रामला भान राहिले नव्हते. ती विषण्ण मनाने उठली आणि निघून गेली. का कोण जाणे पण रामला सिद्धरामय्याची घृणा वाटू लागली होती. टकला,बुटका, बोद्ल्या, म्हातारा! त्यात सुद्धा रापलेला चेहरा आणि सुटलेली ढेरी यांचा विशेष राग येत होता. लाललाल डोळे त्या भोवती काळी वर्तुळ इतकी कि कसलीतरी नशा केली असावी. वयोमानानुसार हे तर नक्की झाले होते कि शची त्यांची दुसरी पत्नी असावी. पहिली पत्नी लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी वारली. तिच्यापासून सिद्धरामय्या यांना एक कन्या होती जिचे लग्न झाले होते आणि ती क्वचितच त्यांच्याकडे येत जात असे.
पण का कोण जाणे इतक्या बुद्धिमान, उच्चशिक्षित, हुशार स्त्रीचा पती असा कुरूप, बेवडा, तारवटलेल्या डोळ्यांचा पोट्या माणूस कसा काय असू शकतो हा प्रश्न रामला सारखा सतावत होता.
क्रमश: