श्याम 48
मित्रांनो ! त्या वेळेस मी लहान होतो; परंतु माणकताईचे सारे शब्द मला आठवताहेत. दु:खितांच्या कहाण्या कोण विसरेल ? दु:खितांचे, पीडितांचे आर्त स्वर कोणाच्या कानात घुमत राहणार नाहीत ? माणकची शोककथा जळजळीत निखा-याप्रमाणे माझ्या हृदयात कायमची लिहिली गेली आहे. त्या तेथील भयाण निराधार संसारात हा छोटा श्याम, हाच काय तो तिचा आधार, हा श्याम लहान आहे. याला स्त्रियांच्या वेदना काय कळतील, माझ्या हृदयातील अनंत यातना कशा समजतील ? याचा विचार माणकताई कधी करीत नसे. बुडत्याला काडीचाही आधार वाटतो. माणकताई या श्यामजवळ सा-या कथा येऊन सांगे. मी तिचा विश्वस्त भाऊ होतो. सा-या हृदयाच्या जखमा ती श्यामला येऊन दाखवी.
एके दिवशी ती म्हणाली, 'श्याम ! काय रे तुला सांगू ? काल मला असे म्हणत, 'तुझे नाकच कापून टाकतो. तुझे नाक चपटे आहे. मला नाही तुझे नाक पहावत ! तीन तीनदा कात्री घेऊन धावत व म्हणत छाटू का, उडवू नाकाची बोंडी ?' श्याम मला पुष्कळदा पडसे होते; तर म्हणतात, तू घाणेरडी आहेस. शेंबडाने भरलेले तुझे सदोदित नाक. मी रे काय करु ? नळावर धुण्याच्या मोटा धुवावयाच्या. मला लहानपणी आजोबा किती जपायचे ! पाण्यात वावरुन होते मला पडसे. माझा काय उपाय ? म्हणून का नाक कापून टाकीन, यांनी म्हणावे ? लग्न तरी कशाला रे यांनी केले ? मी का यांना दिसल्ये नव्हते ? परंतु पैसे पाहून त्यांनी मला केले पसंत. केव्हाही माहेरी गेले तर आजोबा काही ना काही मला नवीन दागिना करतात. यांच्याच घरात तो येतो आहे. यासाठी तर त्यांनी मला जिवंत ठेवले आहे. माहेरची ईस्टेट इकडे आणण्यासाठी मी जिवंत तर पाहिजे ना ? नाही तर त्यांनी मला कधीच मारुन टाकले असते ! गिधाडे आहेत मेली सारी ! बोलू नये मी; पण बोलल्ये तर ते खोटे का आहे ? माझे नुसते धिंडवडे चालवले आहेत यांनी.'
माणकला छळावयाच्या निरनिराळया युक्त्या तिचा नवरा योजी. एके दिवशी संध्याकाळी एकदम आपले चार-पाच गलेलठ्ठ मित्र घेऊन तो आला. व माणकला म्हणाला, 'आत्ताच्या आत्ता आम्हाला पिठले भाकरी वाढ.' माणकने चूल पेटविली. पिठले केले. भाक-या भाजल्या. परंतु त्या मंडळींनी माणकची सत्त्वपरीक्षा चालविली होती. कितीही भाक-या भाजल्या तरी त्यांची पोटे भरत नाही. जवळजवळ नऊ वाजेपर्यंत तो प्रकार चालला. चुलीजवळ भाक-या भाजून भाजून बिचारी माणक घामाघूम झाली. शेवटी 'चला, उठा. आता येथे काही पोटे भरावयाची नाहीत.' असा वर्मी घाव मारुन मिष्किलपणे हसत ते भारत-मातेचे सत्पुत्र हात धुवावयास उठले. लांडग्यांच्या हातातून हरणी सुटली एकदाची ! इतकेही करुन तिचे सत्व गेले ते गेले. गरीब बिचारी माणक !
एके दिवशी तर माणकने फारच किळसवाणी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, 'श्याम ! अरे हल्ली ते शौचाला संडासात जातच नाहीत. वरती तिस-या मजल्यावर शौचास बसतात. म्हणतात, 'काढ सारे.' काय रे हा श्याम छळ ! का रे असे मला छळतात ? मला यांनी नीट वागवावे म्हणून यांना आजोबा नेहमी काही ना काही देत असतात. तो तो यांचा त-हेवाईकपणा व छळवादीपणा वाढतच आहे. निमूटपणे तो नरक मी भरीत असते. मुलाची वेटोळी आई नाही का काढीत ? मग मुलाच्या बापाची काढली म्हणून काय झाले, असे मनात येते. पण श्याम ! अरे आजारी वगैरे असते तर नाही का मी करणार ? परंतु काही होत तर नाही आणि असे करतात ! केवळ छळायचे, दुसरे काय !'