श्याम 55
एके दिवशी या बेलफळाचा आमचा चेंडू वाडयातील एका मुलाला लागला. झाले. आमचा खेळ बंद पडला ! असल्या टणक चेंडूंनी वाडयात खेळावयाचे नाही, असा वटहुकूम निघाला. या कायद्याचे उल्लंघन करणारास घरोघर मार मिळेल अशीही दवंडी झाली. टणक चेंडूंनी खेळावयाचे नाही, मग मऊ चेंडू कोठून आणावयाचे ? रबरी चेंडू तर लवकर फुटले असते. आडदांड बॅटीसमोर का रबरी चेंडू टिकतील ?
ती श्रीमंत मुले एके दिवशी मला चिडवीत होती. ती आपसांत बोलत होती.
एक : आणा रे बेलफळ.
दुसरा : कशाला ते ? काढा करावयाचा आहे की काय ?
तिसरा : नाही रे ! त्याचा करु आपण चेंडू.
दुसरा : लागला तर मग खेळ खलास होईल. खेळायला बंदी होईल.
तिसरा : मग आम्ही चुरमुरे खात बसू.
मला त्याचा राग आला. त्याच्या अंगावर धावून जावे, असे वाटले. इतक्यात त्यांतील एक म्हणाला, 'सांभाळा रे, राग आला तर मी पळून जाईन. कोकणात जाईन. ताक-भात आणि अळूची भाजी.' हे शब्द त्याने नाकात उच्चारिले. माझ्याकडे पाहून हसत हसत ती मुले निघून गेली.
माझ्या पळण्याचा उल्लेख निघताच मी जागच्या जागी थिजलो. मी रागावलेला होतो; परंतु आता मी एकदम ओशाळलो. क्रोध जाऊन लज्जा उत्पन्न झाली. माझी मान खाली झाली. मी रडू लागलो. मी भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. माझे अश्रू गळत होते.
त्या भिंतीजवळ शिवराम नावाचा गवंडी काम करीत होता. त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. माझ्या डोळयांतील पाणी पाहून त्या शिवरामाचे मन पाझरले. दगड फोडणारा शिवराम हृदयाचा मृदू होता. तो दगड जोडणारा होता, हृदय तोडणारा नव्हता.
"श्याम ! का रे रडतोस ?' त्याने मला विचारले.
मला जास्तच हुंदका आला. शिवराम काम सोडून माझ्याजवळ आला.
"श्याम ! हा वेडया ! रडू नको. काय झाले ?' त्याने प्रेमाने विचारले. 'ती मुले मला चिडवतात. माझ्याजवळ चेंडू नाही म्हणून मला नावे ठेवतात,' मी रडत रडत सांगितले.
"मी विकत नाही आणणार ! चिंध्यांचा चेंडू शिवून तुला आणून देईन. मग कोणी रागे भरणार नाही. तुझ्या मामांना सांगेन.' शिवरामने समजावून सांगितले.
'चिंध्यांचा चेंडू ! मग तर छानच ! तो फार टणक होणार नाही. कोणाला लागला तर दुखापत होणार नाही. चिंध्यांचाच चेंडू चांगला', मी टाळी वाजवून म्हटले. "आणि शिवाय तो देशी असतो. स्वदेशी चेंडू. परदेशी कशाला घ्यावयाचा ? परदेशी घेऊ नये.' शिवराम गवंडी म्हणाला.