श्याम 58
"पण तो मला फसवणार नाही.' मी म्हटले.
मी माझी आशा ढळू दिली नाही. निश्चय चळू दिला नाही. एक दिवस शिवराम येईल अशी भरताप्रमाणे मी वाट पाहात होतो.
आणि एक दिवस शिवराम आला. खरेच आला. दारु पिणारा शिवराम आला. स्वदेशीचा भक्त शिवराम आला. लोकमान्यांना काम करताना हात जोडणारा माझा शिवराम आला.
"श्याम !' त्याने हाक मारली.
"शिवराम ! मी पंधरा दिवस तुझी वाट पहात आहे. रोज येथे तुझी वाट पहात बसतो.' मी म्हटले.
"श्याम ! माझा आजारी मुलगा मरण पावला ! माझा बाळ गेला !' शिवराम काप-या स्वरात म्हणाला.
"काय रे झाले त्याला ?' मी विचारले.
"खोकला, ताप ! दुसरे काय !' शिवराम सद्गदित होऊन म्हणाला.
"शिवराम ! मला नको तुझा चेंडू. तुला वाईट वाटते ना ? मला नको हो चेंडू !' मी म्हटले.
"श्याम ! मी चेंडू करुन आणला आहे. मी दोनचार दिवस कामावर गेलो नाही. कामावर जावेचना. तुझा चेंडू करीत असे. तुझ्या चेंडूने दु:ख हलके केले.' शिवराम म्हणाला.
शिवरामने माझ्या हातात चेंडू दिला. पुत्रनिधनाचे दु:ख मनात गिळून तयार केलेला तो चेंडू मी माझ्या हातात घेतला. त्या चेंडूवर शिवरामाच्या डोळयांतील पाणी पडले असेल, तो चेंडू पवित्र झाला असेल ! किती गोड दिसत होता चेंडू ! गोल वाटोळा काळासावळा चेंडू ! त्या चेंडूवर काळे फडके होते. त्याच्यावर पांढरी नक्षी होती. आकाशातील तारे, वेलीवरची जशी फुले ! किती प्रेमाने, उत्सुकतेने, आस्थेने व कौशल्याने तो चेंडू शिवण्यात आला होता !
"शिवराम ! मी तुला काय देऊ ?' मी विचारले.
"श्याम ! तो का मी विकण्यासाठी आणला आहे ? मला काही नको. तुझ्या डोळयांतून पाणी येऊ नये म्हणून मी तो तुला देत आहे. तुझे बाब तुरुंगात आहेत. तुला कोण देणार चेंडू ? श्यामच्या डोळयांतून पाणी येऊ नये म्हणून मी प्रार्थना करीन.' शिवराम म्हणाला.
"शिवराम ! तू दारु नाही ना रे पीत ? मी विचारले.
"का रे श्याम ?' शिवरामने खिन्न होऊन केला.
"दादा म्हणत होता की तू दारु पितोस. मी म्हटले, शिवराम चांगला आहे. तू आहेसच चांगला !' मी म्हटले.