श्याम 113
मी म्हटले, 'आज उंबरठा आहे. उंबरठयाची बायका पूजा करतात. उंबरठा म्हणजे देवच. आज देवाच्या मांडीवर डोके ठेविले.'
गंगू म्हणाली, 'उंबरठा तर टणक असतो. तुझे डोके दुखेल.'
मी म्हटले, 'माझे डोके कधी दुखत नाही. मुले म्हणतात, 'श्यामचे डोके भक्कम आहे.' गंगू ! माझे डोके कधी दुखत नाही आहे का ठाऊक ?'
गंगू म्हणाली, 'दुखेल कशाला ? डोक्यात काही ठेवले नाही म्हणजे डोके दुखत नाही. तू अभ्यास करीत नाहीस. रिकामे तुझे डोके.'
मी म्हटले, 'नंबर तर वर असतो ना ? गंगू तुला एक गंमत सांगू !'
गंगू म्हणाली, 'सांग.'
मी म्हटले, 'लहानपणी घरी आम्ही मुले तिन्हीसांज होताच जेवत असू. मुलांची जेवणे शाळा सुटताच संपायची. आठ नाही वाजले तो मी झोपून जात असे. परंतु रात्री एकदोन वाजता मी जागा होत असे व रडत असे. माझी एक चुलती होती. ती मला थोपटून निजवी. एके दिवशी आजी म्हणाली, 'हा श्याम रोज उठून रात्री रडतो. पोराला भूकबीक तर नाही ना लागत ! त्याच्या उशाशी दहीभात कालवून वाटीत ठेवून देत जा, उठला रडत तर खाईल व झोपेल.' माझ्या उशाशी दहीभात कालवून ठेवण्यात येऊ लागला. मी रात्री जागा झालो की, भुतासारखा मी भात खात असे व पाणी पिऊन निजत असे. पुन्हा श्याम रात्री कधी रडला नाही. त्या रात्रीच्या थंड दहीभातामुळे माझे डोके कधी दुखत नाही.'
गंगू म्हणाली, 'पण आता थोडाच आहे रात्री थंड दहीभात. ?'
दिगंबराची आई म्हणाली, 'थोडा भात उरला आहे. जेवतोस का श्याम ?'
गंगू म्हणाली, 'बारा वाजले आहेत. दुसरा दिवस सुरु झाला. खायला हरकत नाही. खातोस श्याम ?'
मी म्हटले, 'मी आता मोठा झालो आहे.'
गंगू म्हणाली, 'ओहो ! किती पण मोठा ! चौदा वर्षांचा म्हातारा.'
मी म्हटले, 'चौदा वर्षे म्हणजे लहान वाटते ? शिवाजीमहाराजांनी चौदाव्या वर्षी तोरणा घेतला.'
गंगू म्हणाली, 'पण तू म्हणजे शिवाजी नाहीस. तू आहेस शेंबडा श्याम.'
मी म्हटले, 'गंगू ! माझ्या नाकाला कधीही शेंबूड येत नाही हो.'
दिगंबराची आई म्हणाली, 'श्याम ! ऊठ. चल देत्ये दहीभात.'
गंगू म्हणाली, 'आई मला पण !'
आई म्हणाली, 'तू का लहान आहेस ?'
गंगू म्हणाली, 'मी सासरच्यांना मोठी आहे; परंतु तुला लहानच आहे.'