म्हातारा आणि त्याचा घोडा
एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्याला म्हणाला, 'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.' ते ऐकताच म्हातार्याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, 'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?' ते ऐकताच म्हातार्याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?' ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, 'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?' ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले. ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.
तात्पर्य
- प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.