विभाग तिसरा - पौराणिक संस्कृति 38
श्रमणांची अवनति
१७५. श्रमणांच्या अवनतीचें बीज त्यांनी अंगीकारिलेल्या राजाश्रयांत होतें. राजा म्हटला म्हणजे जो क्वचितच हिंसेशिवाय गादीवर येत असे. अशोकानें आपल्या अनेक भावांना मारल्याच्या कथा बौद्ध ग्रन्थांत सांपडतात. त्या खर्या नसाव्या असें विन्सेन्ट स्मिथ इत्यादिक पाश्चात्य विद्वानांचें म्हणणें आहे. तरी पण आपणाला विरोध करणार्या बांधवांचा उच्छेद करूनच अशोक गादीवर आला असला पाहिजे. कलिंग देशाला जिंकीपर्यंत त्यानें लढण्याचें तर सोडलेंच नव्हतें. त्या लढाईनंतर अशोकाला पश्चात्ताप झाला; व तो बुद्धोपासक बनला. बौद्ध ग्रंथकारांनी त्याची अतोनात स्तुति केली आहे. त्यांच्या मतें जगांत कोणी धर्मराजा झाला असेल, तर तो राजा अशोकच होय; आणि कांहीं अंशीं तें खरेंहि आहे. एवढ्या मोठ्या पदावर चढलेल्या माणसानें अत्यन्त इन्द्रियनिग्रहानें व संयमानें वागणें अशोकाशिवाय दुसर्या कोणत्याहि राजाला शक्य झालें असेल, असें वाटत नाहीं. परन्तु या अशोकाच्या सद्गुणांचा बौद्ध संघाला कितपत फायदा झाला हें सांगतां येत नाहीं. मोठमोठे विहार बनले, बौद्ध भिक्षु चारी दिशांना जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला; हें सगळें झालें खरें, पण त्यामुळें भिक्षूंना राजाश्रयाची चट लागील. किंबहुना राजाश्रयावांचून त्यांचें कांहींच चालेनासें झालें.
१७६. मौर्यांचें राज्य त्यांचा सेनापति पुष्यमित्र यानें हिरावून घेतलें, व ब्राह्मणांच्या यज्ञयागांचें पुनरुज्जीवन केलें. एवढेंच नव्हे, तर त्यानें आसपासच्या बौद्धांना बराच त्रास दिला, भिक्षूंचे कांही मठ मोडून टाकले, इत्यादि कथा उत्तरेकडील बौद्ध ग्रंथांमध्यें सांपडतात. अशा वेळीं बौद्ध भिक्षूंनी मगध देश सोडून दूरदूरच्या देशांचा आश्रय धरला असल्यास आश्चर्य नाहीं. त्या प्रसंगी भिक्षूंनी आत्मनिरीक्षण करावयास हवें होतें. ‘अशोकाच्या आश्रयानें आपणाला मोठमोठाले विहार बांधतां आले, पण त्यामुळें परिग्रहवान् बनलों, व बहुतांशीं कष्टी जनतेच्या कल्याणाचा मार्ग आपण सोडून दिला,’ असें त्यांस दिसून आलें असतें, आणि ते पुन्हा राजाश्रय मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले नसते; व त्यायोगें हिंदुस्थानच्या इतिहासाला निराळीच गति मिळाली असती.
१७७. मौर्यांचें राज्य मोडल्यावर पुष्यमित्राला मौर्यांप्रमाणें साम्राज्य स्थापतां येणें शक्य नव्हतें. वायव्येकडून यवनांच्या आणि शकांच्या स्वार्या त्याला थांबवतां येईनात; व त्यामुळें ह्या परकीय लोकांचें हिंदुस्थानांत एकसारखें पाऊल पुढें पडत गेलें. अशा वेळीं बौद्ध भिक्षूंनी ह्या परकीय लोकांची मर्जी संपादण्याचा सारखा प्रयत्न चालविला, व त्यांत त्यांना बरेंच यश आलें, असें मिलिन्दपञ्ह इत्यादिक ग्रन्थांवरून दिसून येतें.
१७८. ह्या परकीय लोकांना भिक्षूंचे आचार-विचार मानवले. परन्तु आपल्या देवतांना सोडून एका बुद्धाला शरण जाण्याला ते तयार नव्हते. अशोकाएवढीच कनिष्काची महती महायान पंथांत आहे. परन्तु त्यानेंहि आपल्या कुलदेवतांना फांटा दिला नाहीं, हें त्याच्या नाण्यांवरून स्पष्ट दिसून येतें. कांहीं नाण्यांवर त्यानें बुद्धाचेंहि चित्र छापलें, एवढीच काय ती बौद्ध धर्मावर त्याची मेहरबानी. परन्तु अशोकासारखा राजा मिळणें शक्य नसल्यामुळें बौद्ध भिक्षूंनी एवढ्यांतच संतोष मानून घेतला.
१७९. शके राजे मोठे शूर होते; व शौर्याची त्यांना फार चाड असे. त्यांना प्रसन्न करण्यासाठीं बौद्ध भिक्षूंनी बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या कथा पुढें आणल्या. ह्या कथांत नवरसांपैकी रौद्र आणि बीभत्स रस मुळींच नाहीं म्हटलें तरी चालेल. बाकी रस मित प्रमाणांत सांपडतात. साहित्य ग्रंथांत दानवीर, दयावीर, धर्मवीर व युद्धवीर असे वीर रसाचे चार भाग आहेत. त्यांत पहिल्या तिहींना ह्या जातककथांत विशेष महत्त्व दिलें आहे, असें दिसून येतें. ह्या कथा केवळ राजे लोकांनाच नव्हे, तर सामान्य लोकांनाहि फार प्रिय झाल्या. पण त्यांमुळें लोकांचीं मनें पौराणिक बनलीं.