विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा 9
३१. उदाहरणार्थ भिक्षुसंघाचीच गोष्ट घ्या. भिक्षूची वैयक्तिक संपत्ति म्हटली म्हणजे तीन चीवरें व एक भिक्षापात्र; तेंहि मातीचें किंवा फारच झालें तर लोखंडाचें असावयाचें. पण रहाण्याला निवार्याची जागा घेण्यास मनाई नव्हती; म्हणून श्रद्धाळू लोक विहार बांधूं लागले; व भिक्षूंची वासना बळावत जाऊन तिचें पर्यवसान परिग्रहांत झालें. म्हणजे विहाराच्या सेवेसाठीं नोकरचाकर, जमीनजुमला इत्यादिक सर्व कांहीं ठेवावें लागलें; आणि त्याची आरक्षा करण्यासाठीं राजांची मदत घ्यावी लागली. तिबेटसारख्या ठिकाणीं राजांना बाजूला सारून भिक्षुसंघानें हें काम आपल्याच हातीं घेतलें. केवळ शस्त्रानेंच शत्रूचा प्रतिंकार शक्य नसल्यामुळें भिक्षूंना खोट्यानाट्या गोष्टी रचाव्या लागल्या; व राजकारणाच्या रूपानें पैशुन्यहि अंगिकारावें लागलें. भिक्षुसंघाचा इतका अध:पात झाला असतांहि त्यांतील व्यक्तींना आपली अवनति होत आहे, हें समजणें कठिण झालें. ‘मी माझे आचार नीट ठेवीत आहें, शीलाचे नियम पूर्णपणें पाळीत आहें, ध्यान-समाधींत दक्ष आहें, व कधीं कधीं जर थोडीशी दंतकथा रचतों, तर ती केवळ संघाच्या फायद्यासाठीं, त्यांत माझा स्वार्थ नाहीं,’ अशा विचारानें विद्वान भिक्षुहि खोट्यानाट्या गोष्टी रचण्यास प्रवृत्त होत असावेत. म्हणजे, सांघिक तृष्णेमुळें आपला हा अघ:पात होत आहे, याची त्यांना जाणीव होणें कठिण पडे.
३२. ‘उंट सूईच्या छेदांतून जाऊं शकेल, परंतु श्रीमंत स्वर्गांत जाऊं शकणार नाहीं’, असा उपदेश करणार्या ख्रिस्ताचे भक्त कसे परिग्रहवान् बनले हेंहि बुद्धाच्या भिक्षुसंघाच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येणार आहे. पाद्रींच्या संघानें या बाबतींत भिक्षुसंघावर ताण केली यांत शंका नाहीं. भिक्षु केवळ आपल्या विहारांच्या रक्षणापुरतेंच पुराण रचीत असत. पण ह्या पाद्री लोकांनी तर सगळ्या जगाचें साम्राज्य कमावण्याचा घाट घातला; व क्रुसेडसारखीं भयंकर युद्धें सुरू केलीं! तात्पर्य हें कीं, जी तृष्णा व्यक्तीमध्यें परिणत झाली असतां लवकरच कुरूप दिसते व अपायकारक होते, तीच सांघिक स्वरूपानें परिणत झाली, तर तिचें सौंदर्य लवकर नष्ट होत नाहीं; व तिचें भयंकर परिणाम समजण्यास कालावधि लागतो.
३३. पाद्री लोकांचीं दुष्कृत्यें बाहेर येऊं लागलीं. प्रसिद्ध फ्रेंच ग्रंथकार व्हाल्टेर यानें तर त्यांचा एकसारखा पिच्छाच पुरवला. त्यांच्याविषयीं बहुजनसमाजाची श्रद्धा नष्ट होत चालली. तेव्हां तृष्णेला पाद्रींच्या संघाचें आश्रयस्थान सतत वास करण्याला धोक्याचें वाटूं लागलें. तिनें एक नवीन स्थान शोधून काढलें; व उतारवयाची वेश्या जशी श्रृंगारभूषणांच्या साहाय्यानें तरुण बनते व स्थानांतर करून पुरुषांना मोह पाडते, तसा तिनें आपल्या अभिनव वेशाच्या आश्रयानें लोकांना मोह पाडण्यास सुरुवात केली. तिचें हें नवें स्थळ म्हटलें म्हणजे राष्ट्रीयत्व होतें. येथें तिचा प्रभाव विशेष पडला. पाद्रींचा संघ म्हटला म्हणजे सामान्य जनतेपासून अलिप्त असावयाचा. तेव्हां त्याच्याविषयीं सामान्य जनतेंत अनादर उत्पन्न करणें सोपें होतें. पण ह्या राष्ट्रीयत्वाचा प्रकार तसा नाहीं. राष्ट्र म्हटलें म्हणजे लहानमोठ्या सर्व लोकांचें. तेव्हां तृष्णेला हें स्थान चांगलें मिळालें; व परवांच्या महायुद्धापर्यंत तिची या स्थळीं चांगली चंगळ चालली.
३४. महानिदान सुत्तांतील कार्यपरंपरा सध्याच्या राष्ट्रीयत्वाला कशी लागू पडते, ह्याचें एक उदाहरण देणें योग्य वाटतें; व तें आम्ही आमच्याशीं ज्यांचा निकट संबंध आहे, अशा इंग्रजांच्या राष्ट्रीयत्वाच्या आधारें दाखवूं इच्छितों.