विभाग चौथा - पाश्चात्य संस्कृति 15
जपानी व रशियन क्रान्तीची तुलना
६३. सरदारी सत्तेंतून वर डोकें काढून मध्यमवर्गीय सत्ता स्थापन करण्याला इंग्लंड, फ्रांस वगैरे देशांना शेंकडो वर्षें लागलीं. पण तेंच काम जपाननें अवघ्या तीस बत्तीस वर्षांत केलें. १८५३ सालापर्यंत जपानचा आणि इतर राष्ट्रांचा संबंध मुळींच नव्हता म्हटलें तरी चालेल. एका तेवढ्या डच कंपनीला कडक अटींवर जपानशीं व्यापार करण्यास मोकळीक होती. पण त्या सालीं अमेरिकन आरमाराचा अधिकारी कमोडोर पेरी (Commodore Perry) कांहीं लढाऊ जहाजें घेऊन जपानी बंदरांत आला व त्यानें १८५४ सालीं जबरदस्तीनें जपानी शोगनकडून व्यापारी तह करून घेतला. त्यानंतर त्याचेंच अनुकरण करून ब्रिटिशांनीहि १८६३ सालीं जपानांत प्रवेश केला. सरते शेवटीं ब्रिटीश, फ्रेंच, डच व अमेरिकन राष्ट्रांनी १८६५ सालीं जपानकडून पूर्वीं झालेल्या सर्व तहांना मान्यता मिळवली. त्यामुळें जपानच्या मानहानीला पारावार राहिला नाहीं. १८६६ सालापासून आपल्या देशाला वर आणण्यासाठीं जपानी तरुण पिढीनें कंबर बांधली. अत्यंत हालअपेष्टा सोसून चांगल्या चांगल्या घराण्यांतील तरुण अमेरिकेला व युरोपला जाऊन सर्व प्रकारच्या कौशल्यांत - विशेषत: युद्धकलेंत-निपुण झाले. त्याचा परिणाम असा झाला कीं, अवघ्या तीस वर्षांच्या आंत जपाननें एवढ्या मोठ्या चीन देशाचा पराजय करून फोरमोसा बेट काबीज केलें; व कोरियाला चीनपासून मोकळें करून आपल्या कह्यांत आणलें. तेव्हांपासून जपानची सत्ता कशी वाढत चालली आहे, हें सांगणेंच नलगे.
६४. परंतु जपानी क्रान्तींत आणि रशियन क्रान्तींत महदंतर आहे. जपानी संस्थानिकांनी जवळ जवळ राजीखुषीनेंच आपली सत्ता मिक्याडोच्या हवालीं केली; व मिक्याडोनेंहि आपल्या सत्तेला आळा घालून घेऊन मध्यमवर्गाच्या हातांत सत्ता सोंपविली. अमेरिकन व युरोपियन राष्ट्रांनी जपानच्या राज्य-क्रान्तीला विरोध न करतां तिचें अभिनंदन केलें, व शिक्षणाच्या कामीं जपानला शक्य ती मदत केली. बोल्शेव्हिकांचा प्रकार याच्या अगदीं उलट. रशियांतील सत्ताधिकारी जमीनदार आणि श्रीमंत लोक दोस्त राष्ट्रांच्या मदतीनेंच त्यांच्यावर उठलेले. सर्व जग त्यांच्या विरुद्ध. एवढेंच नव्हे तर बलाढ्य दोस्त राष्ट्रांनी त्यांचा एकसारखा कोंडमारा केलेला. या सर्व आपत्तींतून बोल्शेव्हिक निभावून बाहेर पडले, हा एक इतिहांसांतील मोठा अद्भुत चमत्कारच गणला पाहिजे. युरोपियन आणि अमेरिकन मजूरवर्गाची सहानुभूति जर बोल्शेव्हिकांना मिळाली नसती, तर तो चमत्कार घडून आला असता कीं नाहीं याची शंका वाटतें.