Get it on Google Play
Download on the App Store

१५ दिवसांनंतर

इम्रान, अॅंजेलिना आणि डॉ.मार्को यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतो. डॉ.एरिक त्यांना घ्यायला येतात.

"हाय डॉक्टर, तुम्हाला बघून आनंद झाला. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन नाही दिसत." गाडीमध्ये बसत अॅंजेलिना म्हणते.

"ते दोघे जॉर्जियाला गेले आहेत, आज संध्याकाळ पर्यंत ते भारतात येतील. त्या दिवशी भूकंप झाल्यानंतर भारत आणि चीन यांच्यातला रेल्वेचा प्रस्ताव तेथेच थांबला. त्या ठिकाणी नंतर अनेक वेळा भूकंपाचे धक्के बसले म्हणून भारतीय गृहमंत्रालयाने आपल्याला ती मोहीम बंद करायला सांगितली. डॉ.अभिजीत यांची जॉर्जियामधील लिसा यांच्याशी बातचीत झाली होती म्हणून ते आणि जॉर्डन ८ दिवसांसाठी तेथे गेले होते." डॉ.एरिक गाडी चालवत म्हणतात.

"म्हणजे? यापुढे आपण त्या मोहिमेवर काम नाही करणार का?" अॅंजेलिना आश्चर्याने विचारते.

"तसं नाहीये, सरकारने मोहीम बंद करायला सांगितली होती आणि आपण फक्त औपचारिकता म्हणून मोहीम बंद केली आहे. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन यांचा अभ्यास सुरुच आहे. आपल्याला हिमालयात जे अवशेष मिळाले तशा प्रकारचे अवशेष जगभरात अनेक ठिकाणी आढळून आले आहेत. ही गोष्ट गुप्त ठेवण्यात आली होती. जॉर्जियातील लिसा यांनी अशा प्रकारच्या अनेक अवशेषांचे शोध लावले होते. त्यांना मिळालेले अवशेषांपैकी आपल्याला मिळालेले अवशेष आकाराने मोठे आहेत आणि ही गोष्ट त्यांनी लिसा यांना ई-मेल ने सांगितली असता त्यांनी त्या दोघांना लगेचच बोलावून घेतलं." डॉ.एरिक म्हणतात.

"भूतकाळात नक्की काय झालं होतं या गोष्टीची आता मला खरंच खूप उत्सुकता आहे." अॅंजेलिना म्हणते. बोलता बोलता गाडी हॉटेलमध्ये पोहोचते. डॉ.एरिक त्या तिघांना घेऊन त्यांच्या खोलीमध्ये जातात. तिथे त्या तिघांना त्यांच्या मोहिमेचे अनेक कागदपत्रे दिसतात. त्या खोलीमध्ये स्टडी नोट्स, नकाशे आणि अनेक स्केचेस होते.

"तुम्ही तिघे फ्रेश होऊन जरा आराम करा. संध्याकाळपर्यंत जॉर्डन आणि डॉक्टर येतीलच." डॉ.एरिक म्हणतात.

"हॉस्पिटलमध्ये अगोदरच भरपूर आराम झाला आहे. अजून किती आराम करू? आम्ही केसपेपर स्टडी करतो." डॉ.एरिकच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अॅंजेलिना म्हणते. डॉ.एरिक तिला काही बोलत नाही. फ्रेश झाल्यावर नाश्ता करून सगळे कामाला लागतात. बघता बघता संध्याकाळ होते. जॉर्डन आणि डॉ.अभिजीत हॉटेलमध्ये पोहोचतात. लिसा देखील त्यांच्याबरोबर आलेली असते. डॉ.अभिजीत त्यांची संपूर्ण टीमबरोबर ओळख करून देत लिसा देखील या मोहिमेमध्ये आपल्याबरोबर असणार आहे असे नमूद करतो.

अॅंजेलिनाने काही नोट्स तयार केलेल्या असतात. लिसासह जॉर्डनची टीम रात्रभर त्या प्रोजेक्टवर चर्चा करते. पण काही निष्पन्न होत नाही.

"जवळ जवळ महिना होत आला या मोहिमेला सुरुवात करून, पण काही निष्पन्न होत नाहीये. प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे येउन थांबते आहे. कुठे जातोय, कसला शोध लावतोय काही समजत नाहीये. फक्त एक लिंक लागली पाहिजे, बस्स... मग आपल्याला पुढे जायला दिशा मिळेल." जॉर्डन म्हणतो.

"मी देखील अनेक वर्षांपासून अशा अर्ध मानवी सापांचा अभ्यास करत आहे. पण त्यांचा नाश का झाला याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. जगातील प्रत्येक देशामध्ये यांचे अवशेष आढळून आले आहेत पण त्यांच्या वास्तव्याचे पुरावे नाहीच्या बरोबर आहेत." जॉर्डनच्या शब्दाला दुजोरा देत लिसा म्हणते.

"लिंक लागायला जास्त वेळ लागणार नाही. आपण फक्त जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा." अॅंजेलिना म्हणते. सगळे तिच्याकडे बघू लागतात. अॅंजेलिना पुढे म्हणते, "हे पहा, लिसा ने जगातील प्रत्येक देशामध्ये या प्रजातीचा अभ्यास केला आहे. आणि तिला त्यांचे अवशेष मिळाले देखील आहेत. संपूर्ण जगभरात फक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आइसलंड आणि जपान या चार देशांमध्येच या प्रजातीचे अवशेष सापडले नाहीत." अॅंजेलिना म्हणते. डॉ.अभिजीतला चट्कन काहीतरी आठवतं आणि तो त्याचा लॅपटॉप सुरु करतो.

"हो, नाही सापडले. पण यातून काय सिद्ध होतंय?" डॉ.मार्को म्हणतात.

"कदाचित आपल्यात आणि त्या प्रजातीमध्ये युद्ध झालं असावं ज्यामध्ये ते प्राणी मारले गेले असावे." अॅंजेलिना म्हणते.

"कदाचित असं देखील झालं असेल, ते प्राणी आपल्या पूर्वजांचे पाळीव असतील." डॉ.एरिक म्हणतात.

"कदाचित ते आपले पूर्वज असतील." इम्रान मध्येच म्हणतो.

"नाही बाळा, ते आपले पूर्वज नाहीत. आपले पूर्वज तेव्हा विकसित झाले होते." लिसा म्हणते.

डॉ.अभिजीत हसू लागतो.

"डॉक्टर? यात हसण्यासारखं काय आहे?" महत्वाच्या कामात जॉर्डनला डॉ.अभिजीत कडून अशी अपेक्षा नसते.

"माफ करा, फोटो सर्च करत असताना मला हसू आलं." डॉ.अभिजीत हसू आवरत म्हणतो.

"अभिजीत, ही फोटो सर्च करायची वेळ आहे का?" डॉ.एरिक म्हणतात.

"नाही, मगाशी जेव्हा अॅंजेलिनाने वेगळ्या पद्धतीने शोध घेण्याबद्दल सांगितलं, तेव्हा आपल्याला हिमालयामध्ये मिळालेल्या आकृतीमध्ये मला थोडं वेगळेपण जाणवलं. मी गुगलवर जेव्हा तशा पद्धतीची कीवर्ड टाकली तेव्हा खूप गमतीदार निकाल माझ्यासमोर आला." एवढं बोलून तो त्याचा लॅपटॉप सर्वांना दाखवत पुढे म्हणतो, "सध्या पृथ्वीवर देशांची रचना विविध प्रकारे झाली आहे. पण काही क्रिएटीव्ह लोकांनी त्या देशांच्या नकाशांपासून प्राण्यांच्या आकृत्या तयार केल्या आहेत. जसं की बेल्जियम देशाचा नकाशा एखाद्या डायनोसोरसारखा दिसतो, आफ्रिका खंडाचा नकाशा गेंड्याच्या चेहऱ्याप्रमाणे. प्रत्येक देशाचा नकाशा विचित्र प्रकारे दिसतो. त्यातून एखादी आकृती तयार होते. जास्त उदाहरणं देत बसत नाही आपल्याला जी पानघोड्याची आकृती सापडली ती जपान देशासारखी दिसते. हे बघा." अभिजीत म्हणतो. इम्रान जपानचा नकाशा बारकाईने बघतो.

"हो. ती आकृती अगदी अशीच दिसत होती." इम्रान म्हणतो.

"याचा अर्थ पुढचा शोध घेण्यासाठी आपल्याला जपानला जायला हवं." जॉर्डनच्या संपूर्ण समूहाला उद्देशून लिसा म्हणते.

"आपल्यापैकी जपानला येण्यासाठी कोण-कोण तयार आहेत?" जॉर्डन म्हणतो. सर्वजण जपानला येण्याची तयारी दर्शवतात. "छान! उद्या संध्याकाळच्या फ्लाईटने जपानला जाऊया. तिथल्या मोहिमेसाठी जितकी सामुग्री लागतील त्याची आतापासूनच तयारी करून ठेवा." असं म्हणत जॉर्डनसह सगळे तयारीला लागतात.

(क्रमशः)